अवकाशवीरांचा बचाव करणारी इस्रोची चाचणी यशस्वी

मानवी अवकाश मोहिमेसाठी आवश्यक ‘क्रू एस्केप सिस्टीम’ विकसित

संशोधन, ५ जुलै, २०१८
—–

मानवी अवकाश मोहीमेच्या सुरक्षेचा महत्वाचा भाग असणाऱ्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’च्या तंत्रज्ञानाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) श्रीहरीकोटा येथे गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. मानवी अवकाशयान अवकाशात उड्डाण करताना लाँचपॅडवर त्यात काही तांत्रिक दोष निर्माण झाला तर, अवकाशवीरांच्या सुरक्षेसाठी अवकाशकुपीला क्षणार्धात रॉकेटपासून विलग करून, सुरक्षित अंतरावर नेऊन पॅराशूटद्वारे ती कुपी समुद्रात उतरवण्याची प्रक्रिया ‘क्रू एस्केप सिस्टीम’च्या चाचणीमधून तपासण्यात आली.

मानवी अवकाश मोहिम राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नसली, तरी त्या संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मानवी मोहिमेला अधिकृत परवानगी मिळाल्यावर अवकाशात मानवाला पाठवण्याची प्रक्रिया वेगाने राबवण्याच्या दृष्टीने इस्रोची तयारी सुरु आहे. मानवी अवकाश मोहीम राबवण्यासाठी आवश्यक जीएसएलव्ही मार्क -३ हे अजस्त्र रॉकेट आता कार्यरत असून, तीन अवकाशवीरांना अवकाशात नेऊ शकेल अशी कुपीही पूर्णपणे विकसित करण्यात आली आहे. रॉकेट आणि अवकाश कुपी यांच्या चाचण्या या आधीच यशस्वी झाल्या आहेत. या प्रक्रियेचा पुढील टप्पा गुरुवारच्या चाचणीतून पार पडला. मानवी अवकाश मोहिमेमध्ये मानवी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. उड्डाणामध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाला तर अवकाशवीरांच्या तत्काळ सुटकेसाठी ‘क्रू एस्केप सिस्टीम’ असणे आवश्यक असते. भारताकडे ही सिस्टीम आता तयार असल्याचे इस्रोने गुरुवारच्या चाचणीतून दाखवून दिले.
पाच तासांच्या काउंट डाऊननंतर श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून गुरुवारी सकाळी सात वाजता ‘क्रू एस्केप सिस्टीम’ने तब्बल १२.६ टन वजनाच्या मानवी कुपीच्या प्रतिकृतीला घेऊन उड्डाण केले. जमिनीपासून २.७ किलोमीटर उंची गाठताना सिस्टीम बंगालच्या उपसागराच्या दिशेने वळाली आणि त्यातून मानवीकुपीला विलग केले. श्रीहरीकोटापासून २.९ किलोमीटर अंतरावर ही कुपी अलगद समुद्रावर उतरली. ही प्रक्रिया २५९ सेकंदात पार पडली. त्यानंतर बचाव करणाऱ्या तीन बोटींनी अवकाश कुपीला पुन्हा सतीश धवन अवकाश केंद्रावर आणले.
‘क्रू एस्केप सिस्टीम’मध्ये त्वरीत कार्यरत होणारी अशी सात छोटी रॉकेट बूस्टर वापरण्यात आली असून, रॉकेटपासून क्षणार्धात मानवी कुपीला दूर नेण्याचे ते कार्य करतात. मात्र, असे करताना अवकाशवीरांवरील पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सुरक्षित मर्यादेतच राहील याचीही काळजी घेतली गेली आहे. ‘क्रू एस्केप सिस्टीम’चे काम कसे सुरु आहे हे तपासण्यासाठी तब्बल ३०० वेगवेगळे सेन्सर वापरण्यात आले. आजची चाचणी ही लाँचपॅड वरून सुरक्षितपणे वेगळे होण्याची होती. येत्या काळात प्रत्यक्ष रॉकेटच्या उड्डाणादरम्यानही या सिस्टीमची चाचणी घेण्यात येईल.
—–
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email