‘इस्रो’च्या शास्त्रज्ञाला ‘देशद्रोही’ ठरवण्यात आले होते.. त्याची गोष्ट !

मयुरेश प्रभुणे, ५ मार्च २०२१

नंबी नारायणन

२४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यान प्रस्थापित करणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला. त्याआधी २००८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर यान पाठवण्याचा विक्रमही भारताने केला होता. हे शक्य झाले आपल्या पीएसएलव्ही रॉकेटमुळे. पीएसएलव्हीला जगात अचूक आणि किफायतशीर रॉकेट म्हणून ओळखले जाते. पीएसएलव्हीला ही ओळख निर्माण करून देण्यामागे द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या ‘विकास इंजिन’चा मोठा वाटा आहे. इस्रोचे हे भरवशाचे इंजिन तयार झाले होते, नंबी नारायणन या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली.
नंबी यांचे हेच काम बघून १९९१ मध्ये स्वदेशी क्रायोजिनिक इंजिन विकसित करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. पण…
१९९४ मध्ये देशाच्या रॉकेट आणि उपग्रहांच्या चाचण्यांची महत्वाची माहिती शत्रू देशांना पुरवल्याच्या आरोपाखाली नंबी आणि डी. शशीकुमारन या इस्रोच्या शास्त्रज्ञांना केरळ पोलिसांनी अटक केली. ४८ दिवस जेलमध्ये डांबून त्यांचा इतका छळ करण्यात आला की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. हे आरोप स्वीकारावे आणि वरिष्ठही यात सामील आहेत असे कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यात आयबीचे अधिकारीही सामील होते.
पुढे १९९६ मध्ये हे सर्व आरोप खोटे असल्याचे सीबीआयने सिद्ध केले. केरळ उच्च न्यायालयाने केरळ सरकारला नंबी यांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. नंबी आणि शशिधरन यांना इस्रोने पुन्हा कामावर घेतले, मात्र, त्यांना कार्यालयीन जबाबदारी देण्यात आली. २००१ मध्ये नंबी नारायण निवृत्त झाले.
इथून पुढे सुरू झाला अन्याय झालेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञाचा लढा. तो लढा फक्त स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्धचा नव्हता. स्वदेशी क्रायोजिनिक कार्यक्रम थांबवण्यासाठी रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचे धागेदोरे समोर यावेत यासाठीचा तो प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुढे केरळ सरकारने नंबी यांना एक कोटी ३० लाखांची भरपाई दिली. २०१९ मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण सन्मान दिला. दुसरीकडे नंबी यांना खोट्या केसमध्ये गोवणारा पोलीस अधिकारी सीबी मॅथ्यूज केरळ सरकारचा मुख्य माहिती अधिकारी म्हणून नेमला गेला.
परदेशात चांगल्या पगारावर आणि पदावर काम करण्याची संधी असताना एक तरुण शास्त्रज्ञ द्रवरूप इंधनावर आधारीत स्वदेशी इंजिन विकसित करण्यासाठी भारतात येतो. त्या इंजिनाच्या जोरावर देशाचे रॉकेट एकापाठोपाठ एक उड्डाणे घेऊ लागते. मग त्या शास्त्रज्ञाकडे क्रायोजिनिक इंजिन तयार करण्याची जबाबदारी येते. खोट्या केसमध्ये त्या शास्त्रज्ञाला गोवले जाते. त्याचे करिअर संपवले जाते. त्याची स्वतःची संस्था इस्रो त्याच्या पाठीशी उभी राहत नाही. या सर्व प्रकारात देशाची क्रायोजिनिक इंजिन निर्मिती वीस वर्षे मागे पडते. आणि त्याची किंमत देशाला आपल्या उपग्रहांची परदेशातून उड्डाणे करून कित्येक शे कोटींनी मोजावी लागते.
नंबी नारायण यांनी आत्मवृत्तात हे सर्व प्रकरण सविस्तर मांडले आहे. त्यावर आधारित चित्रपट – ‘रॉकेट्री- द नंबी इफेक्ट’ येत्या ३० एप्रिलला प्रदर्शित होणार अशा बातम्या येत आहेत. आर. माधवन याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात तो स्वतः नंबी यांची भूमिका साकारत आहे. उशिरा का होईना देशाच्या या हिरोचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा आणि ‘तो’ आंतरराष्ट्रीय कट कोणी रचला तेही देशाला समजायला हवे.

(व्हिडीओ: ‘रॉकेट्री- द नंबी इफेक्ट’चे टिझर. लवकरच नवी पोस्टर आणि ट्रेलर प्रसिद्ध होतील असे समजते.) 

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email