उष्णतेची लाट कशी पसरते?

संशोधन, २६ मे २०२०
महाराष्ट्रासह मध्य, वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा चाळीशीच्या वर आणखी किमान तीन दिवस राहण्याची शक्यता असून, या काळात नागरिकांनी दिवसा घरातच थांबून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्णतेची लाट कधी जाहीर केली जाते?
एखाद्या भागात उष्णतेची लाट पसरली आहे हे जाहीर करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) काही निकष लावले जातात. मैदानी प्रदेशात दिवसाच्या तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात ३७ अंश सेल्सिअस आणि पर्वतीय क्षेत्रात ३० अंश सेल्सिअस तापमान ओलांडले की खालील निकषांनुसार संबंधित भागांत उष्णतेची लाट जाहीर केली जाते.

१) संबंधित भागातील कमाल तापमान हे त्या काळातील कमाल सरासरी तापमानापेक्षा ४.५ ते ६. ४ अंश सेल्सिअसने जास्त असेल तर त्या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे असे मानले जाते. जर तेथील कमाल तापमान हे त्या भागातील कमाल सरासरी तापमानापेक्षा ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर ती स्थिती तीव्र उष्णतेच्या लाटेची मानली जाते.

२) मैदानी प्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोचला, तर त्या भागात उष्णतेची लाट, तर ४७ अंश किंवा त्या पेक्षा जास्त तापमान असेल तर ती तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती मानली जाते.

एका हवामानशास्त्रीय उपविभागामधील (उदा. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आदी) किमान दोन हवामान केंद्रांवर, सलग दोन दिवस वरील निकषांनुसार तापमान नोंदले गेले असेल, तर दुसऱ्या दिवशी त्या भागात उष्णतेची किंवा तीव्र उष्णतेची लाट जाहीर केली जाते.

उष्णतेच्या लाटेची कारणे –
१) एप्रिल- मे महिन्यांत उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येणे ही असामान्य बाब नाही. २१ मार्च ते २१ जून या कालावधीत सूर्याचा विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत (२३.५ अक्षांश) प्रवास होत असतो. तर २१ जून ते २२ सप्टेंबर हाच प्रवास उलट्या दिशेने होतो. या कालावधीत सूर्याची किरणे बराच काळ लंबरूप पडल्यामुळे उत्तर उष्णकटिबंधीय पट्ट्यात तीव्र उन्हाळा असतो. भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनमुळे बाष्पयुक्त वारे आणि ढगाळ हवामान असल्यामुळे या कालावधीतील उन्हाळ्याचा दाह जाणवत नाही. मात्र, एप्रिल- मेमध्ये ज्या दिवसांमध्ये कोरडे हवामान असेल त्यावेळी दिवसाचे तापमान वाढत जाते आणि उष्णतेची लाट पसरते.

२) सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात भारताच्या दक्षिण आणि मध्य भागांत ढगाळ हवामान सुरु होते आणि पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडू लागतात. या स्थितीमुळे कमाल तापमानावर काही प्रमाणात अंकुश बसतो. यंदा मात्र, अम्फन चक्रीवादळासोबत बरेच बाष्प निघून गेल्यामुळे वादळानंतर देशाच्या मोठ्या भागावरील हवा कोरडी झाली आहे. आकाशात ढग नसल्यामुळे सूर्यकिरणांना कोणताही अडथळा राहिला नाही आणि कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर सरकत राहिला.
३) या स्थितीत भर घातली ती पाकिस्तान, पश्चिम आणि वायव्य भारताकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांनी (ज्यांना उत्तर भारतात ‘लू’ म्हणतात). या कालावधीत बाष्पयुक्त वाऱ्यांचा अभाव राहिल्यामुळे कमाल तापमानाचा पारा अधिकच वर चढत गेला आणि महाराष्ट्रासह वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट तीव्र बनली.
४) सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांच्यावर वातावरणात साडेपाच किलोमीटर उंचीवर अँटीसायक्लोनची स्थिती आहे. या ठिकाणी वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असतात आणि हवेची दिशा वरून खाली असते. अशा ठिकाणी ढगांची निर्मिती होत नाही. याच उंचीवर बाष्पाचाही पूर्णपणे अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या भागावरील सध्याच्या कोरड्या हवामानासाठी अँटीसायक्लोनची स्थिती जबाबदार आहे, असे म्हणता येईल.

येत्या २९ मेपर्यंत उष्णतेच्या लाटांची तीव्रता कायम राहण्याची चिन्हे असून, त्यानंतर कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत उतरण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अंदाजातून दिसून येत आहे.

——
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email