Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
Menu

चक्रीवादळांचा हंगाम

Posted on December 6, 2022

– मयुरेश प्रभुणे 
बंगालच्या उपसागरात सात डिसेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ आठ डिसेंबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहचू शकते. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याला ‘मंदौस’ असे नाव देण्यात येईल. या आधी २०२२ मध्ये ‘असानी’ आणि ‘सीत्रांग’ अशी दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झाली होती. आगामी चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मोठा पाऊस अपेक्षित असून, महाराष्ट्रात या काळात किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे. चक्रीवादळ म्हणजे काय, त्यांना नाव कसे देण्यात येते, त्यांच्यामुळे नुकसान कसे होते, चक्रीवादळांचा अंदाज कसा दिला जातो याविषयीचा हा सविस्तर लेख.     

भारतीय उपखंडातील चक्रीवादळांची निर्मिती  
भारतीय उपखंडाचे पावसाळ्यातील हवामान हे मुख्यतः विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि काही प्रमाणात अरबी समुद्रात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. उत्तर गोलार्धात सूर्याचा आकाशातील प्रवास हा २१ मार्च ते २२ सप्टेंबर (या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो) या कालावधीत होतो. २१ जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धातील आपली परिसीमा गाठतो (२३.५ अंश- कर्कवृत्त). या वेळी उत्तर गोलार्धात उन्हाळ्याने उच्चांक गाठलेला असतो. या कालावधीत भारतीय उपखंड आणि लगतच्या समुद्रावर सूर्याची किरणे अधिकाधिक लंबरूप पडल्यामुळे भारताला मान्सून अनुभवायला मिळतो (समुद्र आणि जमिनीतील दाबाच्या फरकामुळे समुद्रावरून बाष्पयुक्त वारे भूप्रदेशात वाहू लागतात). सूर्याचा दक्षिण दिशेने विषुववृत्ताजवळून प्रवास होत असताना (सप्टेंबरनंतर) त्या भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढून कमी दाबाची क्षेत्रे (१ हेक्टो पास्कल- दाबाच्या फरकाचे एकक) निर्माण होऊ लागतात. कमी दाबाच्या क्षेत्रात रिकामी झालेली जागा बाजूच्या जास्त दाबातील हवा भरून काढण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीच्या परिवलानामुळे त्या हवेला वक्राकार गती प्राप्त होते आणि कमी दाबाभोवती वारे चक्राकार गतीने फिरू लागतात (उत्तर गोलार्धात त्यांची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने). चक्राकार गती आणि कमी दाब यांच्या प्रभावामुळे उबदार समुद्राकडून मिळणारे बाष्प त्या क्षेत्रामध्ये वातावरणात वर वर सरकू लागते. या बाष्पाने १२ ते १५ किलोमीटरची उंची गाठली की त्याचे दवबिंदूत रुपांतर होते (कंडेन्सेशन). या प्रक्रियेत मुक्त होणारी ऊर्जा कमी दाबाच्या क्षेत्राला प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप आणखी विस्तारू लागते. 

ही प्रक्रिया जितकी जास्त काळ चालेल तितके हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करते. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याच्या मध्य भागातील दाब ४.५ ते ८.५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो. तर त्याच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांची गती ताशी ६० ते ९० किलोमीटर इतकी होते. वादळ जर अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो आणि चक्रीवादळाचा घेरा शेकडो किलोमीटर पर्यंत पसरतो. ‘सुपर सायक्लोन’मध्ये तर दाब ६५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो, तर केंद्राभोवती फिरणारे वारे ताशी २५० किलोमीटरचा वेग गाठतात आणि या महाचक्रीवादळाचा घेरा तब्बल दोन हजार किलोमीटरपर्यंत विस्तारतो. (प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अशा महाचक्रीवादळांना ‘टायफून’, तर अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या महाचक्रीवादळांना ‘हरिकेन’ म्हणतात.) 

याच काळात चक्रीवादळाच्या मधोमध ऊर्ध्वगामी बलामुळे (सेंट्रीफ्युजल फोर्स) मोकळी गोलाकार जागा निर्माण होते ज्याला ‘सायक्लोन आय’ (चक्रीवादळाचा डोळा) म्हणतात. त्याचा आकार साधारणपणे ३० ते ६० किलोमीटर इतका असतो. या ‘आय’ मध्ये वातावरण अगदी स्वच्छ असते (अगदी दिवसा निरभ्र आकाश, तर रात्री तारे पाहता येऊ शकतील इतकी) आणि तेथील तापमान बाजूच्या वातावरणाच्या तुलनेत आठ ते दहा अंशांनी अधिक असते. ‘सायक्लोन आय’च्या भोवती अतिशय वेगवान वाऱ्यांची आणि ढगांची फिरती भिंत असते, जिला ‘आयवॉल’ म्हणतात. चक्रीवादळामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या ‘आयवॉल’मुळेच होत असते. वाऱ्यांचा प्रचंड वेग (ताशी ९० ते २५०) आणि प्रचंड पाऊस (चोवीस तासांत ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक) यांमुळे या फिरत्या भिंतीची धडक ही प्रलय घडवून आणते. या भिंतीच्या बाहेर चक्रीवादळाला ढगांनी बनलेल्या काही शाखाही असतात. त्यांची घनता केंद्रापासून बाहेरील भागात कमी कमी होत जाते. त्यांच्या घनतेप्रमाणे त्या त्या भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त असते.        

मान्सून आणि चक्रीवादळ  मान्सून काळात समुद्रपृष्ठावरून नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्यामुळे समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरी २६.५ अंश इतके असते. तसेच, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर पाच ते बारा किलोमीटर पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय असतो. या दोन वाऱ्यांच्या प्रवाहाची रचना आणि समुद्रपृष्ठाचे सरासरी २६.५ अंश हे तापमान यांमुळे मान्सून सक्रीय असताना चक्रीवादळांची निर्मिती होऊ शकत नाही (कमी दाबाच्या क्षेत्रांची तीव्रता डीप डिप्रेशन पेक्षा अधिक वाढत नाही). त्यामुळे भारतात मॉन्सून पूर्व (एप्रिल ते जूनची सुरुवात) आणि मॉन्सूनोत्तर (सप्टेंबर अखेर ते डिसेंबर) हा चक्रीवादळांचा हंगाम मानला जातो.    

भारतात सर्वसाधारणपणे वर्षाला पाच चक्रीवादळे निर्माण होतात (जगभरात ८०). त्या पाचपैकी चार चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात, तर एक अरबी समुद्रात निर्माण होते. बंगालच्या उपसागरात अनेकदा प्रशांत महासागराकडून अतिरिक्त बाष्प येत असल्यामुळे त्यांपासून या भागात चक्रीवादळे तुलनेने अधिक निर्माण होतात, तर अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागाराकडून क्वचितच मिळणाऱ्या अतिरिक्त बाष्पाच्या आधारे तयार होतात. त्याच प्रमाणे अरबी समुद्राच्या पृष्ठाचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा कमी असल्यामुळेही तिथे तुलनेने कमी वादळे निर्माण होतात.
भारतीय उपखंडात १९७० पासून १३ विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक होता. १९७० मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये १५ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.                         

               
‘लँडफॉल’ आणि प्रलय पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते दोन हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी दोनशे किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळांचा लँडफॉल म्हणतात. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. एवढी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते. चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात. दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त (पुण्यातील हंगामातील सरासरीइतका) पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते. 

चक्रीवादळ तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत देते. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे लँडफॉलदरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेकडो हेक्टरची जमीन काही काळ नापीक होते. वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्याचे, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे असते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.      

आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज     चक्रीवादळाचा मार्ग आणि त्याची तीव्रता या विषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाने तीन -चार दिवस आधीच वर्तवलेल्या अंदाजांमुळे किनारपट्टीच्या भागात प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळतो. देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना होऊ शकतात. आज हे घडू शकले याला कारण भारताकडे असणारे कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणारी मॉडेल. या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात आले. यांमुळे या आधीच्या महाचक्रीवादळांच्या तुलनेत नुकसान कमी करणे भारताला शक्य होत आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचे स्वरूप—————– वाऱ्यांचा ताशी वेग   
कमी दाबाचे क्षेत्र——————————- ३२ किलोमीटरपेक्षा कमी  डिप्रेशन —————————————- ३२-५०
डीप डिप्रेशन ———————————– ५१- ५९  सायक्लोन ————————————- ६०- ९० सिव्हिअर सायक्लोन————————– ९०- ११९  व्हेरी सिव्हिअर सायक्लोन——————- ११९-२२०  सुपर सायक्लोन——————————– २२० पेक्षा अधिक 

भारतात ‘सुपर सायक्लोन’ दुर्मिळच 
भारतीय उपखंडातील समुद्रांची रचना पाहता कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन त्यांच्या जमिनीवरील प्रवेशाचा कालावधी तुलनेने कमी असतो त्यामुळे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात ‘सायक्लोन’ पातळी पर्यंतची कमी दाबाची क्षेत्रेच निर्माण होतात. मात्र क्वचित प्रसंगी कमी दाबाची क्षेत्रे अधिक काळ समुद्रावर राहिल्यास सिव्हिअर सायक्लोन किंवा व्हेरी सिव्हिअर सायक्लोन पातळीही गाठली जाते. या आधी १९७१ आणि १९९९ मध्ये सुपरसायक्लोन भारतीय किनारपट्टीला धडकले होते. सुपर सायक्लोनमुळे होणारी हानी चक्रीवादळापेक्षा कित्येक पटींनी अधिक असते.  

चक्रीवादळांचे नामकरण  उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) प्रसिद्ध केली आहे. नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या १३ देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी १३ अशा एकूण १६९ नावांचा समावेश करण्यात आला आहे. २०२१ पासून नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येत आहेत. उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे यासाठी २००४ पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण ६४ नावांच्या यादीचा वापर करण्यात आला. या यादीमधील अखेरचे अंपन हे नाव वगळता सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली. त्यामुळे आयएमडीच्या पुढाकाराने चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये पूर्वीच्या आठ देशांसह आणखी पाच देशांनी सुचवलेल्या नावांचाही समावेश करण्यात आला. 

बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमन, पाकीस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरातीज (युएई) आणि येमेन अशा १३ देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी १३ नावांचा नव्या यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांनी सुचवलेली नावे १३ रकान्यांमध्ये मांडण्यात आली आहेत. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एका पाठोपाठ एक नाव देण्यात येईल. १३ देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येतील. 

चक्रीवादळांना नाव देण्यासाठी सर्व १३ देशांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. चक्रीवादळाचे नाव उच्चारास सोपे आणि लहान असावे. नाव राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि लैंगिकदृष्ट्या तटस्थ असावे. या नावाचा अर्थ जगभरातील कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारा नसावा. चक्रीवादळाला एकदा देण्यात आलेले नाव पुन्हा वापरता येणार नाही. तसेच दक्षिण चीनच्या समुद्रातून थायलंडची किनारपट्टी ओलांडून बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळाचे पूर्वीचे नाव बदलण्यात येणार नाही. आगामी चक्रीवादळाला ‘मंदौस’ असे नाव देण्यात येणार असून, हे नाव यूएई या देशाने सुचवले आहे. या यादीत भारताने सुचवलेली नावे पुढील प्रमाणे- गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घुरनी, अंबुड, जलाधी आणि वेग. 

————————

Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Upcoming: Lonar Study Tour

Registration open

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=tqoud4CUbg0&t=100s

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2023 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme