चांदोमामा ते चांद्रयान

मयुरेश प्रभुणे

आजपर्यंतच्या इतिहासात माणसाकडून सर्वाधिक वेळेला पाहिले गेलेले आकाशातील घटक म्हणजे सूर्य आणि चंद्र. इतर ग्रह- ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य- चंद्राचा मोठा आकार, प्रखर तेजस्विता यांमुळे स्वाभाविकपणे जमिनीवर राहणाऱ्या माणसाचे आकाशाकडे लक्ष्य वेधले जाते. गुहेत राहणाऱ्या माणसाने दगडावर पहिली चित्रे काढली त्यांमध्येही त्याने सूर्य आणि चंद्रच रेखाटले. पुढे सूर्य आणि चंद्राच्या गती अभ्यासून त्यांच्या आकाशातील भ्रमणानुसार विविध संस्कृतींनी कॅलेंडर बनवली. त्यात प्रामुख्याने भारतीयांनी चंद्राला महत्व दिले. चंद्राच्या रोज बदलणाऱ्या कलांवर आधारीत कॅलेंडर शेकडो वर्षांनंतर आजही भारतात प्रचलित आहे. चंद्र- सूर्याच्या आकाशातील भ्रमणाचा नेमका अंदाज लावून सूर्य आणि चंद्रग्रहणाचे कालावधीही निश्चित करण्यात अभ्यासकांना यश आले. मात्र, जमिनीवरून साध्या डोळ्यांनी केल्या गेलेल्या या निरीक्षणांना मर्यादा होत्या. म्हणूनच चंद्रावर काहींना हरीण तर काहींना ससा दिसत असे. काहीजणांना चंद्रावर समुद्र असल्याचाही भास होत असे. लहान मुलांना तर चंद्राच्या रूपात चांदोमामा दिसतो. फलज्योतिषामध्येही चंद्राला महत्व दिले गेले. एखाद्याची रास निश्चित करण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे हे पाहिले जाते. कधी ना कधी चंद्रावर जावे असे स्वप्न प्रत्येक पिढीतील माणसाने पाहिले.

टेलिस्कोपच्या शोधानंतर प्रथमच माणसाला चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याची कल्पना आली. गॅलिलिओने चंद्राच्या पृष्ठभागाची चित्रे रेखाटून डोळ्यांना दिसणाऱ्या चंद्रापेक्षा वेगळीच दृश्ये दाखवली. त्या चित्रांवरून चंद्रावर विवरे, दऱ्या, डोंगर असल्याचे बघून तत्कालीन धर्मपंडितांना धक्का बसला. पुढे छायाचित्रणाचे तंत्र विकसित झाले, तेव्हा अभ्यासकांनी मोठ्या दुर्बिणीच्या साह्याने चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूचा नकाशा तयार केला. चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही, वाहते पाणी नाही, चंद्र वाळवंटासारखा रखरखीत आहे, चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो, तो पृथ्वीभोवती २७.३ दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि साधारण तेवढ्याच कालावधीत स्वतःभोवतीही फिरतो म्हणून त्याची कायम एकच बाजू आपल्याला दिसते आदी मूलभूत गोष्टी अगदी सर्वसामान्यांनाही माहित झाल्या. मात्र, यापलीकडे चंद्राची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष चंद्रावरच जाणेच आवश्यक होते. आणि ही संधी १९५९ मध्ये मिळाली.
रशियाचे ल्यूना १ हे यान प्रथमच चंद्राजवळून निघून गेले. यावेळी चंद्राला पृथ्वीसारखे चुंबकीय क्षेत्र नाही आणि अवकाशात सूर्याकडून येणाऱ्या विद्युतभारित कणांचे अस्तित्व असते हे शास्त्रज्ञांना सर्वप्रथम समजले. १४ सप्टेंबर १९५९ रोजी ल्यूना २ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळवण्यात आले. माणसाने बनवलेली वस्तू इतिहासात प्रथमच सुमारे साडेतीन लाख किलोमीटर दूर असणाऱ्या चंद्रावर जाऊन पोचली. ल्यूना ३ या अवकाश मोहिमेद्वारे चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाचे पृथ्वीवासीयांना प्रथमच दर्शन घडले. रशियाचेच ल्यूना ९ हे यान ३ फेब्रुवारी १९६६ मध्ये चंद्रावर अलगद उतरले. या यानाने प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेली छायाचित्रे रेडिओ संदेशाद्वारे पृथ्वीवर पाठवली. चंद्राच्या पृष्ठभागावर मातीचे जाड थर असतील, ज्यामध्ये यान जाऊन अडकेल अशी शास्त्रज्ञांना असणारी भिती ल्यूना ९ ने खोटी ठरवली. ल्यूना १० हे यान चंद्राभोवतीच्या कक्षेत फिरणारे पहिले यान ठरले, ज्यामुळे चंद्राचा संबंध पृष्ठभाग जवळून अभ्यासण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळाली.
दुसरीकडे अमेरिकेच्या अपोलो यांनांच्या साह्याने माणसाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. १९६९ ते ७२ या कालावधीत सहा मोहिमांमधून अमेरिकेचे १२ अॅस्ट्रोनॉट चांद्रभूमीवर प्रत्यक्ष उतरून पृथ्वीवर परत आले. या मोहिमांमधून त्यांनी चंद्रावरील माती, दगडांचे नमुने पृथ्वीवर आणले. चंद्राच्या भूमीवर मुक्त संचार केला, तिथे प्रत्यक्ष बग्गीही चालवली. चंद्रावरील भूकंप मोजण्यासाठीची, तसेच पृथ्वीपासून चंद्राचे नेमके अंतर मोजण्यासाठीची उपकरणे बसवली. पुढे युरोप, जपान, चीन आणि भारतानेही चंद्रावर आपली याने पाठवली. पृथ्वीवरील निरीक्षणांतून कधीही समजू न शकणारी तथ्ये या मोहिमांमधून समोर आली.
चंद्र हा आकाराने सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकाचा उपग्रह असून, घनतेच्या दृष्टीने गुरूचा उपग्रह आयोनंतर त्याचा दुसरा क्रमांक लागतो. चंद्राचे केंद्र सुमारे पाचशे किलोमीटरचे असून, त्याचा सर्वात आतील भाग घन, तर त्याबाहेरील भाग द्रव स्वरूपात आहे. केंद्राच्या बाहेर १२०५ किलोमीटरपर्यंत मँटल असून, त्यावर ५२ किलोमीटरचे कवच आहे. सातत्याने होणाऱ्या उल्कांच्या आघातामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर रेगोलीथ ही रेती तयार झाली आहे. पृथ्वीवरून चंद्राच्या दिसणाऱ्या बाजूवर एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची सुमारे तीन लाख विवरे असल्याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे चंद्राच्या दिशेने जाणारे अशनी थेट पृष्ठभागावर जाऊन आदळतात आणि त्यातून विवरांची निर्मिती होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असणारे ऐटकेन बेसिन हे एक विवर असून, त्याचा व्यास २२४० किलोमीटर आहे.
चंद्रावर पाण्याचेही अंश असल्याचा प्रत्यक्ष पुरावा भारताच्या चांद्रयान १ ने २००८ मध्ये सर्वप्रथम दिला. चंद्राच्या मातीत काही मिलीमीटर खोलीवर अगदी नगण्य प्रमाणात बर्फाचे अंश असल्याचे समोर आले आहे. एक टन माती मधून एक लिटर पाणी निघू शकेल इतके ते कमी प्रमाणात आहे. सूर्याकडून येणारे हायड्रोजनचे अणू आणि चंद्राच्या मातीत असणाऱ्या ऑक्सिजनच्या संयोगातून हे पाण्याचे अंश तयार झाले असावेत असा अंदाज आहे. चंद्रावर आजही भूकंपाचे धक्के बसतात हाही चांद्रयानाने लावलेला एक नवा शोध होता.
चंद्राची निर्मिती कशी झाली असावी हा आजही एक अनुत्तरित प्रश्न आहे. सूर्यमालेची निर्मिती सुरु असताना मंगळाच्या आकाराच्या ग्रहाने पृथ्वीला दिलेल्या धडकेतून चंद्राची निर्मिती झाली असावी असा एक सिद्धांत आहे. चंद्राच्या मातीत सूर्याकडून आलेले हेलियम ३ हा ऊर्जेचा स्रोत पृथ्वीवर आणता येईल का, चंद्रावर कायमस्वरूपी खगोलीय वेधशाळा उभारता येईल का, असे प्रश्न घेऊन पुढील दहा वर्षांत माणूस पुन्हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे.
भारताच्या चांद्रयान २ या मोहिमेतून विक्रम नावाचे लँडर आणि प्रग्यान हे रोव्हर चंद्रावर उतरवण्यात येणार असून, मुख्य यान चंद्राभोवती १०० किलोमीटरच्या कक्षेत एक वर्ष फिरत राहील. येत्या १५ जुलैच्या पहाटे चांद्रयान २ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी विक्रम आणि प्रग्यान प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून १४ दिवस शास्त्रीय नोंदी घेतील. चंद्राची उत्पत्ती कशी झाली, सूर्यमालेच्या सुरुवातीला पृथ्वीजवळच्या भागात काय काय घडले, चंद्रावर पाणी कोणत्या स्वरूपात आणि किती प्रमाणात आहे, आदी संबंध विज्ञान जगताला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम भारताची दुसरी चांद्रमोहीम करणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *