चिनी शास्त्रज्ञांनी केले माकडांचे क्लोनिंग

संशोधन, २७ जानेवारी २०१८
माकडांचे क्लोनिंग करण्यात चिनी शास्त्रज्ञांना नुकतेच यश आले आहे. डॉली या मेंढीप्रमाणे गेल्या वीस वर्षांत गाय, मांजर, कुत्रा, हरीण, घोडा, ससा, उंदीर आदी २३ सस्तन प्राण्यांचे क्लोनिंग करण्यात आले होते. मात्र, Primate वर्गातील (माकड, चिंपांझी, मनुष्य यांचा यात समावेश होतो) प्राण्याचे क्लोनिंग करण्यातील अडथळे शास्त्रज्ञांनी प्रथमच पार केले आहेत. मानवाच्या क्लोनिंगसाठी आवश्यक तंत्र विकसित होण्यामधील ही पहिली पायरी असल्याचे मानले जात आहे.
चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शांघाई येथील प्रयोगशाळेत लांब शेपटीच्या माकडांची जनुकीयदृष्ट्या जुळी पिले निर्माण करण्यात असून, त्यांची नावे झॉग झॉग आणि हुआ हुआ अशी ठेवण्यात आली आहेत. यांपैकी एका पिलाचे वय आठ आठवडे, तर दुसऱ्याचे वय सहा आठवडे आहे. या दोन्ही पिलांसाठी माकडाच्या एकाच गर्भाच्या पेशीचा वापर करण्यात आला. सोमॅटीक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर (एससीएनटी) या तंत्राद्वारे माकडाच्या गर्भाच्या पेशीतील केंद्रक (cell nucleus- ज्यामध्ये गर्भाच्या डीएनएचा समावेश होता) मादीच्या केंद्रक काढलेल्या अंडाणूमध्ये (egg) प्रस्थापित करण्यात आला. या प्रक्रियेतून प्रयोगशाळेत एकसारखे १४९ गर्भ तयार करण्यात आले. मात्र त्यांपैकी फक्त ७९ गर्भच माकडिणीच्या गर्भाशयात वाढवण्या योग्य होते. त्यांपैकीही शेवटी फक्त दोनच पिलांचा जन्म यशस्वी झाला.
‘सेल’ या नियतकालिकात यासंबंधीचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकी जनुकीय शास्त्रज्ञांच्या मते Primate वर्गातील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांच्या पेशी वापरून जनुकीयदृष्ट्या त्यासारखाच प्राणी निर्माण करणे अद्यापही अवघड आहे. चायनीज प्रयोगामध्ये माकडाच्या एका गर्भाची पेशी वापरण्यात आली आहे. त्यातही त्या पेशीपासून निर्माण केलेल्या ७९ गर्भांचे तितक्याच माकडिणींच्या गर्भाशयात रोपण केल्यानंतर फक्त चार माकडीणी गर्भवती राहिल्या. त्यांपैकीही फक्त दोन पिलांचा जन्म यशस्वी झाला. मानवी क्लोनिंग ही अद्याप खूप दूरची गोष्ट आहे.
चिनी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘एकसारख्या जनुकीय रचना असणाऱ्या माकडांच्या आवृत्त्या या मानवासाठी लागणाऱ्या औषधांच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरू शकतात. हा प्रयोग करताना आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यात आले असून, मानवी क्लोनिंग करण्याची आमची कोणतीही योजना नाही.’

—–
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Facebook
Twitter