Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
Menu

जाळ्यात अडकले आकाश !

Posted on June 4, 2019
– मयुरेश प्रभुणे

‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर आपण शाळेत निबंध लिहिले असतीलच. विसाव्या शतकातील विज्ञान कथांमधून किंवा साय-फाय चित्रपटांमधून एकविसाव्या शतकात यंत्रे मानवांवर कसा विजय मिळवतील याच्या रंगवलेल्या ‘अतिशयोक्त’ कल्पनाही आपल्याला आठवत असतील. अशीच एक ‘अतिशयोक्त’ वाटणारी कल्पना नुकतीच प्रत्यक्षात उतरली. अगदी मागच्या आठवड्यात. एखादी विज्ञान कथा वाटावी असा घटनाक्रम सध्या घडतोय. पुढील काही दिवस, काही महिने, कदाचित काही वर्षे हा पेटलेला वाद आपल्याला वाचायला, बघायला मिळेल. यावरही मग चित्रपट येतील. पण ते साय – फायसारखे काल्पनिक नसतील. ते असतील सत्य घटनेवर आधारीत.

एक घटना घडली अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरच्या स्मिथ कॉलेजमध्ये. जेम्स लॉवेनथल नावाचे खगोलशास्त्राचे प्राध्यापक पदवीच्या काही विद्यार्थ्यांना आकाशनिरीक्षणाचे प्रशिक्षण देत होते. वेधशाळेच्या टेलिस्कोपभोवती सगळे जमले होते. अचानक एक विद्यार्थी ओरडला – “ते काय आहे?” प्रा. लॉवेनथल यांनी ते दृश्य पाहताच खरोखर त्यांच्या डोळ्यासमोर ‘तारे चमकले’. ही घटना घडत असतानाच दुसरीकडे  ॲरिझोनामधील लॉवेल वेधशाळेच्या टेलिस्कोपमधून आकाशातील एनजीसी ५३५३/४ या दीर्घिकांच्या (गॅलेक्झी) समूहाचे छायाचित्रण सुरु होते. स्क्रीनवर फोटो उमटला, तो पाहून निरीक्षक चक्रावून गेले. तात्काळ त्यांनी तो फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध केला. बघता बघता तो सगळीकडे व्हायरल झाला. इतका, की जगभरातील तेरा हजार खगोलशास्त्रज्ञांची मध्यवर्ती संघटना असलेल्या इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनने (आयएयू) एक पत्रक काढून या विषयावर मोठी चिंता व्यक्त केली. एका नव्या वादाची सुरुवात झाली. आणि या ठिकाणी विज्ञान विरुद्ध तंत्रज्ञान आणि बिझनेस एकमेकांसमोर उभे आहेत.
लॉवेल वेधशाळेमधून घेतलेले एनजीसी ५३५३/४ या दीर्घिकांच्या (गॅलेक्झी) समूहाचे छायाचित्र. छायाचित्रात दिसणाऱ्या रेषा स्टारलिंक उपग्रहांच्या आहेत
लॉवेल वेधशाळेने लॉन्ग एक्स्पोजर (ताऱ्यांचा मंद प्रकाश सेन्सरवर व्यवस्थित उमटावा यासाठी कॅमेराची झडप काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत उघडी ठेवण्यात येते. या काळात सेन्सरवर पडणाऱ्या सगळ्या प्रकाशाचे मिळून एक छायाचित्र तयार होते) तंत्राने घेतलेल्या दीर्घिका समूहांच्या फोटोमध्ये दीर्घिकांच्या समोर तब्बल २५ प्रकाशमान रेषा उमटल्या होत्या. या रेषा म्हणजे आकाशातील एखादा अज्ञात ग्रह किंवा ताऱ्याच्या प्रकाशाच्या नसून, स्पेस एक्स कंपनीने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या समूहाच्या होत्या. या उपग्रहांवर बसवलेल्या सोलार पॅनलवरून, तसेच उपग्रहाच्या पृष्ठभागावरून सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊन ते उपग्रह ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसले. उपग्रह जसे पुढे सरकले, त्यांच्या प्रकाशित रेषा दीर्घिकांच्या छायाचित्रात उमटल्या. अर्थात या प्रकाशमान रेषांमुळे दीर्घिकांचे ते छायाचित्र वाया गेले. २३ मे रोजी स्पेस एक्स कंपनीने एकाच वेळी ६० उपग्रहांचा समूह पृथ्वीजवळच्या कक्षेत पाठवला. या कामगिरीबद्दल कंपनीचे मोठे कौतुक झाले. स्टारलिंक नावाच्या या उपग्रह समूहातील काही उपग्रह आकाशातून वेगाने सरकताना पाहिल्याचे रिपोर्ट अनेक देशांमधून आले. मात्र, ज्या आकाश निरीक्षकांनी हा समूह पाहिला, त्यांच्या मनात आपले आकाशच आपल्यापासून हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली.
स्पेस एक्सचा फक्त साठ उपग्रहांचा समूह जगभरातील आकाश निरीक्षकांच्या निरीक्षणांमध्ये अडथळा ठरू लागला आहे. अमेरिकी सरकारने स्पेस एक्सला पुढील काही वर्षांत पृथ्वी जवळच्या कक्षेत तब्बल सात हजार कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करण्याची परवानगी दिली आहे. ही गोष्ट झाली एका स्पेस एक्सची. इरिडियम, वनवेब, ग्लोबलस्टार, अमेझॉनचा प्रोजेक्ट क्युइपर, फेसबुक अथेना या कंपन्याही रांगेत आहेत. याचा अर्थ येत्या काही वर्षांत पृथ्वी जवळच्या कक्षेत कित्येक हजार कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित होणार आहेत. एकप्रकारे पृथ्वीभोवती उपग्रहांचे जाळे विणण्यात येत असून, खगोलशास्त्रज्ञांना त्या पलीकडचे आकाश विनाअडथळा बघायचे असेल, तर त्यांना अवकाशात पाठवण्यात आलेल्या टेलिस्कोपवरच अवलंबून राहावे लागेल. जमिनीवरील कोणत्याही वेधशाळेमधील टेलिस्कोपने सलग काही मिनिटे विनाअडथळा निरीक्षण करणे शक्य होणार नाही. या उपग्रहांकडून येणाऱ्या रेडिओ लहरी, जगभरातील रेडिओ टेलिस्कोपच्या निरीक्षणांमध्ये अडथळा ठरणार आहेत. याचा अर्थ जगभरात जमिनीवर उभारण्यात आलेल्या बहुतेक वेधशाळा आकाशातील उपग्रहांच्या ट्राफिकमुळे निकामी ठरणार आहेत.
आयएयूने याबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत उपग्रह समूहांबाबत पत्रक काढून चिंता व्यक्त केली आहे. आयएयूच्या म्हणण्यानुसार, अगदी आत्तापर्यंत पृथ्वीजवळच्या कक्षेत सगळे मिळून दोनशे पेक्षा कमी उपग्रह होते. पण येत्या दशकात त्यांची संख्या कित्येक हजार होणार आहे. या उपग्रहांकडून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे मोठ्या टेलिस्कोप मधून निरीक्षणे घेणे शक्य होणार नाही. खगोलशास्त्रज्ञांना रेडिओ टेलिस्कोपच्या साह्याने ब्लॅकहोलची प्रतिमा तयार करण्यात नुकतेच यश आले होते. मात्र, उपग्रह समूहांमुळे होणाऱ्या अडथळ्यामुळे यापुढे असे शोध आपल्याला लावता येणार नाहीत. पृथ्वीवरून दिसणारे आकाश हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. या ठेव्यामुळेच आपल्याला विश्वाचा शोध घेता येतोय. त्या आकाशाच्या आणि आपल्यामध्ये येणाऱ्या या हजारो उपग्रहांच्या समूहांमुळे भविष्यातील पिढ्यांचा अनंताचा शोध घेण्याचा अधिकारच आपण हिरावून घेत आहोत. विश्वाच्या अभ्यासासाठी अनेक देशांच्या एकत्रित प्रयत्नांतून, कित्येक अब्ज डॉलर्स खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येत आहेत. आकाश स्वच्छ नसेल, तर हा सगळा खटाटोप व्यर्थ ठरेल.
खगोलशास्त्रज्ञांनी एकीकडे आपली भूमिका स्पष्ट केली असताना, दुसरी बाजूही तितकीच प्रभावी आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने जगातील अगदी दुर्गम भागांत वेगवान इंटरनेट पोचवण्यासाठी यांतील बहुतेक उपग्रह पाठवण्यात येत आहेत. उपग्रहांपासून मिळणाऱ्या सुविधा सर्वांसाठी स्वस्त होतानाच, ते उपग्रह पाठवणाऱ्या कंपन्या आणि देशांना मोठा आर्थिक फायदाही होणार आहे. यात कोणाची बाजू प्रभावी ठरते त्यावर पृथ्वीवरून दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशाचे दृश्य अवलंबून आहे. विश्वाचे अंतरंग अभ्यासणारे विज्ञान प्रभावी ठरते की, सर्वसामान्यांना स्वस्तात इंटरनेट देणारे तंत्रज्ञान.. सध्याच्या मानवाच्या सद्सद्विवेकबुद्धीची ही परीक्षाच आहे. ‘जाळ्यात अडकले आकाश’ असे या लेखाचे शीर्षक असले तरी, खरेतर उपग्रहांच्या जाळ्यात आपण अडकतोय. आपणच अनंत आकाशाची खिडकी बंद करतोय. आभासी जगासाठी.
—–
Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Upcoming: Lonar Study Tour

Registration open

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=tqoud4CUbg0&t=100s

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2023 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme