Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
Menu

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?

Posted on May 28, 2020

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार?

संशोधन, २८ मे २०२०

पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे, तसेच मुख्य केंद्रातून निघणाऱ्या उष्णतेमुळे या धातुरसामध्ये उसळते प्रवाह तयार होतात. या प्रवाहांमुळे वीज निर्मिती होते. आणि या विजेतून चुंबकीय क्षेत्र तयार होते. नैसर्गिकपणे, अखंड सुरू राहणारी ही प्रक्रिया आहे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे अगदी भूकवचाच्या अंतर्गत भागापासून ते अवकाशात सुमारे साठ हजार किलोमीटरपर्यंत पसरले आहे. हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचे सुरक्षा कवच म्हणूनही काम करते. सूर्यापासून आणि दूरच्या खगोलीय घटकांपासून येणारे विद्युतभारित कण अवकाशातच थोपवण्याचे काम हे क्षेत्र करीत असते.

अवकाशातून येणारे विद्युतभारित कण पृथ्वीभोवतीच्या चुंबकीय क्षेत्रात अडकल्यामुळे पृथ्वीभोवती विद्युतभारित कणांचे पट्टे तयार होतात. यात बहुतांश सूर्याकडून आलेल्या कणांचाच समावेश असतो. या पट्ट्यांना व्हॅन ॲलन बेल्ट म्हणतात. या व्हॅन ॲलन बेल्टचेही दोन भाग पडतात. आतील आणि बाहेरील. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या सक्रियतेनुसार आणि रचनेनुसार त्यात विद्युतभारित कण अडकत असल्यामुळे जिथे चुंबकीय क्षेत्र क्षीण असेल, तिथून विद्युतभारित कण पृथ्वीपासून कमी अंतरावर आलेले दिसून येतात. पृथ्वीच्या परिवलन अक्षाच्या तुलनेत पृथ्वीचा चुंबकीय अक्ष हा ११ अंशांनी कललेला आहे. त्यातही या दोन अक्षांचे मिलन अचूकपणे पृथ्वीच्या केंद्रात होत नाही, तर ते ठिकाण केंद्रापासून चार- पाचशे किलोमीटर दूर आहे. या रचनेमुळे व्हॅन ॲलन बेल्टचे अंतर एके ठिकाणी जमिनीपासून जवळ, तर विरुद्ध बाजूला जमिनीपासून दूर आहे. जिथे व्हॅन ॲलन बेल्ट जमिनीच्या जवळ येतो, तिथे अवकाशातील विद्युतभारित कण जमिनीपासून दोनशे किलोमीटर उंचीपर्यंत येऊन पोचतात. भौगोलिकदृष्ट्या या क्षेत्राचे स्थान दक्षिण अटलांटिक समुद्राच्यावर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान वातावरणात आहे. याच क्षेत्राला साऊथ अटलांटिक ॲनोमली म्हणतात.

पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना या क्षेत्रावरून जाताना इतर भागांच्या तुलनेत अवकाशातील विद्युतभारित कणांचे प्रमाण एकाएकी वाढले असल्याचा अनुभव येतो.   अवकाश युग सुरू झाल्यापासून अनेक उपग्रह, अवकाशातील वेधशाळा, स्पेस स्टेशन यांना या क्षेत्रावरून जाताना येथील विद्युतभारित कणांच्या माऱ्यामुळे काहीना काही बिघाडाचा सामना करावा लागला आहे. काही उपग्रह बंद पडले. काहींचे सेन्सर जळाले, बॅटरी बंद पडल्या, स्पेस स्टेशनवरील लॅपटॉप बंद पडल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे साऊथ अटलांटिक ॲनोमलीवरून प्रवास करताना काम बंद ठेवण्याचा किंवा विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या स्वार्म या उपग्रहाने पृथ्वीभोवतीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बारकाईने नोंदी घेतल्या. या उपग्रहाच्या नोंदी वापरून शास्त्रज्ञांनी गेल्या काही दशकांत आणि गेल्या दोन शतकांत साऊथ अटलांटिक ॲनोमलीमध्ये झालेल्या बदलांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभ्यासानुसार गेल्या दोन शतकांमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सुमारे नऊ टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच, साऊथ अटलांटिक ॲनोमलीमधील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता गेल्या ५० वर्षांत २४००० नॅनोटेस्लावरून २२००० नॅनोटेस्लापर्यंत कमी झाली. त्याचप्रमाणे साऊथ अटलांटिक ॲनोमलीचे क्षेत्र विस्तारत असल्याचे आणि त्याचे स्थान बदलत असल्याचे निरीक्षणही स्वार्म उपग्रहाने नोंदवले आहे. पुढील अनेक वर्षे हा ट्रेंड असाच राहणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्याचा जमिनीवर धोका नसला तरी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना त्यापासून धोका पोहचू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. साऊथ अटलांटिक ॲनोमलीवरून जाणाऱ्या उपग्रहांना धोका आधीही होताच आणि त्यासाठी काळजीही घेतली जाते. त्यामुळे या बातमीत नवे असे काही नाही.

हे का घडत असावे याची कारणमीमांसा करताना पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल होण्याची वेळ जवळ आली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण ती घटना कधीही घडू शकेल. पुढील काही वर्षांपासून ते पुढील काही हजार वर्षांमध्ये. आणि साधारणपणे दर अडीच लाख वर्षांनी पृथ्वीच्या उत्तर – दक्षिण चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल होत असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत.    थोडक्यात सध्याच्या बातमीमुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. जी बाब स्वार्म उपग्रहाने दाखवून दिली, ती सुद्धा विज्ञानाला नवी नाही. उपग्रहाने घेतलेल्या अचूक नोंदींचा वापर करून शास्त्रज्ञांनी मॉडेलच्या साह्याने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित अंदाज लावला इतकेच.

——–

Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Upcoming: Lonar Study Tour

Registration open

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=tqoud4CUbg0&t=100s

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2023 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme