‘बायोलॉजिकल क्लॉक’वरील संशोधनाला नोबेल

सजीवांनी पृथ्वीच्या परिवलनाला अनुसरून स्वतःचे दैनंदिन चक्र अनुकूल करून घेतले आहे. आपण दिवसभर जागतो, रात्री झोपतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ठराविक प्रक्रिया या चोवीस तासांच्या चक्राला अनुसरून त्या त्या वेळेलाच पार पडतात. शास्त्रीय भाषेत याला ‘सरकॅडियन रिदम’ म्हणतात. माणसाप्रमाणेच इतर प्राणी, वनस्पती हे बहुपेशीय सजीवही पृथ्वीच्या परिवलनानुसार होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्राला अनुसरून जगत असतात. हे वर्षानुवर्षे एक सारखेच कसे होत राहते असा प्रश्न अनेक वर्षे जीवशास्त्रज्ञांना सतावत होता. पृथ्वीच्या परिवलनाला अनुसरून आपल्या शरीराला ठराविक क्रिया ठराविक वेळेत करण्यासाठी भाग पडणाऱ्या जनुकांचा शोध लावणाऱ्या तीन अमेरिकी शास्त्रज्ञांना यंदाचे फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या विभागातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

nobel physiology

जेफ्री सी. हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल डब्ल्यू. यंग या तिघा अमेरिकी शास्त्रज्ञांनी मिळून फळमाशीच्या दैनंदिन शारीरिक प्रक्रियांचे वेळापत्रक निश्चित करणाऱ्या जनुकाचा शोध लावून माणसाच्याही दिवस- रात्रीच्या चक्राचे कोडे उलगडले. सध्याच्या जीवनशैलीत दिवस- रात्रीचे वेळापत्रक न पाळल्यामुळे होऊ शकणाऱ्या विकारांवरही या शोधामुळे प्रकाश पडणार आहे. सजीवांमधील दिवस- रात्रीच्या चक्राचे कोडे उलगडण्यासाठी तिघा शास्त्रज्ञांनी फळमाशीच्या चोवीस तासांतील शारीरिक नित्यप्रक्रियांचा रेणवीय पातळीवर अभ्यास सुरु केला. या संशोधनामध्ये त्यांना असे जनुक सापडले, जे रात्रीच्या वेळेस विशिष्ट प्रोटीनची निर्मिती करते. या प्रोटीनचे दिवसा विघटन होते. ही प्रक्रिया चोवीस तासांमध्ये चपखल बसून सातत्याने घडत राहते. हे एक प्रकारे आपल्या शरीरातील जनुकीय घड्याळच असून, या जनुकामुळे आपले शरीर चोवीस तासांमधील विशिष्ट वेळांमध्ये ठराविक प्रक्रिया पार पाडते.

संशोधन, २ ऑक्टोबर २०१७

नोंद: २०१७ च्या नोबेल पारितोषिकांवरील विस्तृत लेख ‘संशोधन’च्या आगामी अंकात वाचा.
——————————————-

 

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email