भारतीय विद्यार्थी घेणार गुरुत्वीय लहरींचा वेध 

आयसरच्या विद्यार्थ्यांना लायगोमध्ये संशोधनाची संधी
‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७
 ———-
गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) दोन जुळ्या वेधशाळांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतातील आगामी लायगो वेधशाळेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लायगोच्या शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत आयसर- पुणेच्या निवडक विद्यार्थ्यांना वर्षभर लायगोच्या अमेरिकेतील वेधशाळांमध्ये संशोधन प्रकल्प करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती लायगो हॅनफर्ड ऑब्झर्वेटरीचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक राब यांनी ‘संशोधन’ला दिली.

raab-1डॉ. राब आणि लायगो लॅबोरेटरीचे उपसंचालक डॉ. अल्बर्ट लॅझॅरीनी हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले असताना भारतातील लायगो प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मिती कशी करता येईल, यासाठी देशभरातील संशोधन संस्थांशी त्यांनी संवाद साधला. सैद्धांतिक खगोलशास्त्रात पारंगत असणाऱ्या भारतीय संशोधन संस्थांमधून प्रयोगात्मक खगोलशास्त्रज्ञ निर्माण करणे हे मोठे आव्हान असल्याचे मत डॉ. राब यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘लायगो प्रकल्पामध्ये प्रामुख्याने प्रयोगात्मक आणि अत्याधुनिक यंत्रणेवर आधारीत संशोधनाचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भारतातील लायगोच्या उभारणीच्या अगदी प्राथमिक टप्प्यापासून उपलब्ध असणे आवश्यक आहे. अमेरिकेतील लायगो वेधशाळांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना आणि तरुण संशोधकांना प्रत्यक्ष संशोधन करण्याची आणि तेथील यंत्रणांचा जवळून अभ्यास करण्याची आम्ही संधी देणार आहोत.’

‘याच उपक्रमाचा भाग म्हणून आयसर- पुणेमधील फिजिक्सच्या निवडक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लायगोमध्ये संशोधन प्रकल्प करण्याची संधी देण्यात येणार आहे. याशिवाय लायगोमध्ये सहभागी जगभरातील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याचीही संधी पुढील तीन वर्षांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.’
गुरुत्वीय लहरींची निरीक्षणे पुन्हा सुरु
गेल्या वर्षी लायगोच्या वेधशाळांमधून केल्या गेलेल्या निरीक्षणांमधून गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचे दोनदा पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले होते. यंदा पुन्हा लायगोची निरीक्षणे सुरु झाली असल्याची माहिती डॉ. अल्बर्ट लॅझॅरीनी यांनी दिली. ते म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये तीन आठवडे दोन्ही वेधशाळांनी अखंड निरीक्षणे घेतली. पाच जानेवारीपासून पुन्हा निरीक्षणे सुरु करण्यात आली आहेत. यावर्षी एकूण सहा महिने निरीक्षणे घेण्यात येणार आहेत. यंदा डिटेक्टरही अधिक संवेदनशील करण्यात आले आहेत. या वर्षीच्या निरीक्षणांमधून गुरुत्वीय लहरींचे आणखी नवे पैलू समोर येण्याची आम्हाला आशा आहे.’
—-
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email