मंगळाभोवती हजार दिवस

मंगळयानाचा नवा विक्रम

१९ जून २०१७
mccsnap3dview01
भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात कमी खर्चाची मंगळ मोहीम असणाऱ्या मार्स ऑर्बायटर मिशनने मंगळाभोवती हजार दिवस पूर्ण करून आणखी एक विक्रम केला आहे. या कालावधीत मंगळयानाने मंगळाभोवती ३८८ फेऱ्या पूर्ण केल्या असून यानावर बसवलेल्या पाच वैज्ञानिक उपकरणांनी मंगळाचे अनेक अज्ञात पैलू उलगडण्यास सुरुवात केली आहे.
मंगळाच्या कक्षेत शिरल्यापासून यानाचा कार्यकाळ फक्त सहा महिने अपेक्षित असताना हजार दिवसांचा टप्पा ओलांडल्याने भारतीय यानाचा उच्च दर्जा सिद्ध झाला आहे. पूर्णतः स्वयंचलित असणाऱ्या मंगळयानाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक कठीण प्रसंगी स्वतःची काळजी घेत मंगळाविषयी शास्त्रीय माहिती पुरवण्याचे काम सुरु ठेवले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) यानावरील पंधरा किलो वजनाच्या उपकरणांनी गेल्या हजार दिवसांत केलेल्या कामगिरीचा अहवाल सोमवारी जाहीर केला.
pslv-c25-23पाच नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर २४ सप्टेंबर २०१४ ला भारताची पहिली मंगळ मोहीम यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत पोचली. वजनाच्या मर्यादेमुळे मंगळयानावर पंधरा किलो वजनाची फक्त पाच वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली होती. या सर्व उपकरणांचा कार्यकाळ आणि यानावर उपलब्ध असणारे इंधन लक्षात घेऊन मंगळ मोहिमेचा अपेक्षित कार्यकाळ सहा महिने निश्चित करण्यात आला होता. मात्र, तब्बल हजार दिवस मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे फिरते राहून यानाने अपेक्षेपेक्षाही उच्च कामगिरी करून दाखवली. या कालावधीत यानाने मंगळाभोवती ३८८ फेऱ्या पूर्ण केल्या असून यानावरील उपकरणांनी मंगळाविषयीची बहुमूल्य माहिती पृथ्वीकडे पाठवली. या माहितीचा उपयोग करून आतापर्यंत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
मंगळयानाने मंगळाच्या पृष्ठभागावरून अवकाशात परावर्तित होणाऱ्या उष्णतेचा प्रथमच जागतिक नकाशा तयार केला आहे. या अभ्यासातून मंगळावरील ऋतू, वाऱ्यांचे प्रवाह आणि वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी उपयोग होत आहे. यानावरील मार्स कलर कॅमेराचा उपयोग करून मंगळाची एकूण ७१५ छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या साह्याने मंगळाचा जागतिक नकाशा बनवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. मंगळाच्या ध्रुवीय भागांतील बर्फाचे बदलते प्रमाण, धुळीची वादळे, डोंगर- दऱ्या यांची हाय रिझोल्युशन छायाचित्रे मंगळयानाने प्रथमच जगासमोर आणली. मंगळाच्या बाह्य वातावरणातून अवकाशात मुक्त होणाऱ्या वायूंचा वेग हा पूर्वीच्या माहितीपेक्षा अधिक असल्याचेही मंगळयानाने दाखवून दिले. मंगळयानाने जमा केलेली सर्व माहिती भारताच्या नागरीकांसाठी खुली करण्यात आली असून, आतापर्यंत १३८१ अभ्यासकांनी ३८० जीबीची माहिती डाउनलोड केली आहे.
slide0004_image010
Global albeda of Mars using MSM data
डाऊनलोड– मार्स अॅटलास  Mars-atlas-MOM
दोन वर्षांत मॉमने उलगडलेले मंगळाचे पैलू 
– मंगळाच्या भूपृष्ठाचा छायाचित्रांच्या आधारे सर्वंकष नकाशा
– मंगळाच्या विषुववृत्तीय आणि ध्रुवीय प्रदेशात ऋतूनुसार होणारे बदल
– मंगळाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या उष्णतेचा जागतिक नकाशा
– मंगळाच्या उत्तर ध्रुवावर उन्हाळ्यात बर्फ वितळण्यामुळे पाणी आणि कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात होणारे बदल
– मंगळाचे उपग्रह असणाऱ्या फोबॉस आणि डिमॉसचे तपशील दाखवणारी छायाचित्रे
– मंगळाच्या वातावरणात उंचावर जाणाऱ्या धुळीच्या वादळांचा वेध
– मंगळाच्या भूपृष्ठावरील खनिजांची ठिकाणे आणि त्यांच्या प्रमाणाची तपशीलवार माहिती
– भूपृष्ठावरील सल्फेट आणि लोहमिश्रित संयुगांचे नेमके प्रमाण
1396815_763419613683878_2096621222_o
——————————————————
माहिती आणि फोटो : इस्रोकडून साभार
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Facebook
Twitter