विमानाला जोडलेल्या रॉकेटने केले उपग्रहांचे प्रक्षेपण 

संशोधन अपडेट, १९ जानेवारी २०२०

अमेरिकेतील व्हर्जिन ऑर्बिट या कंपनीने विमानाला जोडलेल्या रॉकेटच्या साह्याने नुकतेच दहा क्यूब सॅटेलाईटचे हवेतून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. लाँच डेमो २ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले होते. रॉकेटच्या हवाई प्रक्षेपणाचे हे नाविन्यपूर्ण तंत्र लहान उपग्रहांना स्वस्तात अवकाशात पाठवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कॅलिफोर्नियातील मोजावे एअर अँड स्पेस पोर्ट येथून व्हर्जिन ऑर्बिटच्या कॉस्मिक गर्ल नावाच्या बोईंग ७४७ विमानाने १७ डिसेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री बारा वाजून २० मिनिटांनी उड्डाण केले. उड्डाणापासून साधारण तासाभराने जमिनीपासून १०७०० मीटर उंचीवर असताना विमानाच्या डाव्या पंखाला खालच्या बाजूला बसवलेल्या ‘लाँचरवन’ या रॉकेटला विलग करण्यात आले. दोन भागांच्या या रॉकेटने अवकाशाच्या दिशेने सुमारे ५० मिनिटे प्रवास करून दहा क्यूब सॅटेलाईटना पृथ्वीनजीकच्या कक्षेत पोचवले. अमेरिकेतील विविध आठ विद्यापीठे, तसेच नासाने बनवलेले हे लघु उपग्रह आहेत. 

विमानातून कसे झाले रॉकेटचे प्रक्षेपण – व्हिडीओ पाहा 

‘लाँचरवन’ हे २१ मीटर लांबीचे आणि विमानाला जोडले जाणारे रॉकेट सुमारे ५०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करू शकते. या रॉकेटचे पहिले प्रायोगिक उड्डाण मे २०२० मध्ये अयशस्वी ठरले होते. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात व्हर्जिन ऑर्बिटने हवाई प्रक्षेपणातून उपग्रहांना यशस्वीपणे अवकाशात प्रस्थापित केले. लहान उपग्रहांची अमेरिकेत, तसेच जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ असून, भारताच्या इस्रोतर्फेही त्यासाठी स्वतंत्र स्मॉल सॅटेलाईट लाँच वेहिकल (एसएसएलव्ही) हे रॉकेट विकसित करण्यात येत आहे.

———–                

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email