– डॉ. प्रमोद काळे ( माजी संचालक, विक्रम साराभाई स्पेस सेंटर)
डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या दूरदर्शी शास्त्रज्ञाविषयी लिहायला मिळणे हे मी स्वतःचे भाग्य समजतो. ते थोर शास्त्रज्ञ तर होतेच, पण देशातील अनेक संस्थांचे शिल्पकारही होते. डॉ. विक्रम साराभाईंचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. दुर्दैवाने ३० डिसेंबर १९७१ ला तुलनेने तरुण वयातच त्यांचे निधन झाले. ते जाऊन आता ५३ वर्षे झाली असली तरी, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांच्या संकल्पना आजही आम्हाला प्रेरणा देतात. त्यांच्या मृत्यूसमयी ते भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. याच विभागांचे सचिव म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. देशातील अनेक संस्थांच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
सन २०१९ मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्या निमित्ताने देशभर अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या प्रगतीची ओळख करून देणाऱ्या अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मला त्यांचा सहवास जेमतेम अकरा वर्षे लाभला. मे १९६० मध्ये बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून माझी बीएस्सी पूर्ण झाली. त्यानंतर फिजिक्स, स्पेस सायन्स किंवा इलेक्रॉनिक्स या विषयांमध्ये पुढील शिक्षणाच्या संधी मी तपासत होतो. आमच्या विद्यापीठात सर सी. व्ही रामन यांचे एकदा ‘हिरा’ या विषयावरील व्याख्यान ऐकण्याची मला संधी मिळाली होती. तेव्हापासून फिजिक्स हा माझ्या विशेष आवडीचा विषय बनला. माझे फिजिक्सचे प्राध्यापक डॉ. एन. एस. पंड्या यांनी मला अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल- या संस्थेची स्थापना डॉ. साराभाई यांनी केली होती. ) येथे डॉ. विक्रम साराभाईंची भेट घेण्याचे सुचविले.
भेटीसाठी मी डॉ. साराभाईंची वेळ मागितली आणि योगायोगाने ते तेव्हा अह्मदाबादमध्येच होते. मी त्यांना त्यांच्या कॅलिको मिल्समधील कार्यालयात भेटलो. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला भेटायचे म्हणून मी मनातून थोडा घाबरलोही होतो. पण त्यांनी माझ्या संशोधनाबद्दलच्या कल्पना शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल मला आश्चर्य वाटले आणि भीतीही दूर झाली. मी गुजरात विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण करावे आणि त्यासोबत पीआरएलमध्ये येऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभवही घ्यावा असे त्यांनी सुचवले. त्यांची सूचना तात्काळ मान्य करून मी पीआरएलमध्ये काम सुरु केले. तेथील काम सुरु असतानाच डॉ. साराभाईंच्या कामाशी माझा जवळून परिचय झाला. डॉ. साराभाई यांचा विवाह प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी झाला होता. त्या तेव्हा दर्पण डान्स अकादमी चालवत होत्या. डॉ. साराभाई यांना कला म्हणून संगीत आणि नृत्याबाबत विशेष रुची होती.
पीआरएलमध्ये संशोधनाच्या दोन मुख्य शाखा होत्या – डॉ. के. आर. रामनाथन यांच्या नेतृत्वाखाली वातावरणाच्या वरच्या थराबद्दल आणि ओझोनबद्दलचे संशोधन सुरु होते, तर डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखालील गट पृथ्वीवर येणाऱ्या वैश्विक किरणांबद्दल संशोधन करीत होता.
१९५७ – ५८ मध्ये जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय भू – भौतिकी वर्षानिमित्त पीआरएलमधील संशोधनाने जोर धरला होता. सूर्यावरील काळ्या डागांच्या अकरा वर्षांच्या चक्रानुसार त्याचवर्षी सर्वाधिक प्रमाणात सौरडाग अपेक्षित होते. या सौरडागांना अनुसरून सूर्याकडून अवकाशात मोठ्याप्रमाणात झोतही उसळतात. सूर्यावरील या घडामोडींचा पृथ्वीच्या बाह्य वातावरणावर, तसेच चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो याबाबत वैज्ञानिक जगतात औत्सुक्य होते. पीआरएलप्रमाणेच मुंबईची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), तसेच अनेक विद्यापीठांच्या समन्वयातून या विषयावर प्रायोगिक काम सुरु होते. पीआरएलमध्ये तिसरा एक गट डॉ. सुधीर पंड्या यांच्या नेतृत्वाखाली न्यूक्लिअर फिजिक्स विषयात काम करीत होता.
डॉ. साराभाई तेव्हा अमेरिकेतील आयोवा विद्यापीठाच्या प्रा. व्हॅन अॅलन यांच्या संपर्कात होते. अमेरिकेने अवकाशात पाठवलेल्या एक्सप्लोरर या उपग्रहाचा मागोवा भारतातूनही घ्यावा असे १९६० मध्ये त्यांच्या चर्चेतून निश्चित झाले. आम्ही त्या उपग्रहाचा मागोवा घेऊन त्याच्या कक्षेतील स्थानाविषयीची माहिती मिळवण्यात यशस्वी झालो.
१९६१ मध्ये डॉ. साराभाई आणि डॉ. ई. व्ही. चिटणीस यांच्या प्रयत्नांतून नासाच्या सहकार्याने पीआरएलमध्ये उपग्रहाचा मागोवा घेणारे केंद्र उभारण्यात आले. आम्ही अनेक रात्री जागून अमेरिकी उपग्रहांचा वेध घेत असू. आमच्या केंद्रावर डॉ. साराभाई अनेकदा कोणतीही पूर्वकल्पना न देता भेट देत. तेव्हा डॉ. साराभाईंची कार्यशैली पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटत असे. दिवस – रात्र ते कामातच असत. प्रवासात असतानाही ते त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्कात राहून चर्चा करीत. आमच्या कामाविषयी त्यांना असणारी विशेष रुची तेव्हा जाणवत असे.
त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शास्त्रज्ञांच्या परिचयामुळे पीआरएलमध्ये सतत नामवंत शास्त्रज्ञांच्या भेटी घडत. असे शास्त्रज्ञ पीआरएलमध्ये आले, की त्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळे. असेच एकदा नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ. डोनाल्ड ग्लेसर यांनी ‘बबल चेंबर’ या विषयावर दिलेले व्याख्यान मला अजूनही आठवते. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. चंद्रशेखर यांची ताऱ्याच्या अंतर्गत भागात चालणाऱ्या रेडिएटिव्ह हिट ट्रान्सफर या विषयावर व्याख्यानमालाही स्मरणात आहे. अशा जागतिक ख्यातीच्या शास्त्रज्ञांसोबत, तसेच डॉ. साराभाई, डॉ. रामनाथन यांच्यासोबत होणारा संवाद आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीपूर्ण असायचा.
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सुरु असणाऱ्या विकासाचे महत्व ओळखून भारत सरकारने डॉ. साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची (इन्कोस्पार) १९६२ मध्ये स्थापना केली. डॉ. चिटणीस या समितीचे सभासद सचिव होते. इन्कोस्पारअंतर्गत पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ साऊंडिंग रॉकेटच्या (वातावरणात साधारण दोनशे किलोमीटर उंची गाठताना शास्त्रीय नोंदी घेऊ शकणारे रॉकेट) प्रक्षेपणाचे केंद्र उभारण्याचा पहिला महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अमेरिकेत नासामध्ये प्रशिक्षणासाठी जानेवारी ते मार्च १९६३ मध्ये संशोधकांची पहिली तुकडी पाठवण्यात आली. त्या तुकडीमध्ये माझ्यासह एच. जी. एस. मूर्ती, बी. रामकृष्ण राव, प्रकाश राव, अरवमुदन, एम. एस. व्ही. राव, ईश्वरदास आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा समावेश होता. साऊंडिंग रॉकेटच्या प्रक्षेपणाचे केंद्र तिरुअनंतपुरमच्या थोडेसे उत्तरेला केरळच्या किनाऱ्यावर उभारण्यात आले होते. त्यासाठी थुम्बा आणि पल्लिथुरा या गावांमधील जमीन संपादीत करण्यात आली होती. या प्रक्षेपण केंद्राचे नामकरण थुम्बा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (टर्ल्स) असे करण्यात आले.
हे केंद्र लगेचच कार्यान्वित झाले आणि थुम्बावरून आणि पहिले नाइके अपाचे रॉकेट २१ नोव्हेंबर १९६३ रोजी यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. या पहिल्या प्रक्षेपणाचे रॉकेट नासाने, तर त्यावरील सोडियमचा धूर निर्माण करणारे वैज्ञानिक उपकरण (पेलोड) फ्रान्सने दिले होते. पीआरएलमधील प्रा पी. डी. भावसार आणि फ्रान्समधील प्रा. ब्लामोंट हे पेलोडसंबंधीचे शास्त्रज्ञ होते. आम्हा सर्वांसाठीच ते क्षण रोमांचित करणारे होते. डॉ. होमी भाभाही तेव्हा उपस्थित होते.
या केंद्रावरून रॉकेटची प्रक्षेपणे सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय सहकार्यही वाढत होते. साउंडिंग रॉकेट बनवण्याच्या आपल्या उपक्रमाला गती मिळावी यासाठी फ्रान्समधील सूद एव्हिएशनकडून अशा प्रकारची रॉकेट बनवण्याचे तंत्रज्ञान घेण्याचे निश्चित झाले. त्या तंत्रज्ञानाच्या साह्याने बेलियर सेंटॉर रॉकेटचे भारतात उत्पादन करण्यात येणार होते. स्वदेशी घन इंधन बनवण्यासाठी आम्हाला त्या तंत्रज्ञानाचा खूप उपयोग झाला. तेव्हा रशियानेही आपल्या उपक्रमांना मोठी मदत केली. प्रक्षेपण तळाच्या सुरक्षा पाहणीसाठी रशियाने एक हेलिकॉप्टर दिले. तसेच एक व्हायब्रेशन टेबल आणि ‘मिन्स्क २’ हा एक कम्प्युटरही दिला.
डॉ. साराभाईंनी जपानमधून प्रा. इटोकावा यांना आमच्या संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केले. १९६७ मध्ये रोहिणी शृंखलेतील पहिले रॉकेट – आरएच ७५ विकसित करण्यात आणि प्रक्षेपित करण्यात आम्हाला यश आले.
या केंद्रावर अमेरीका, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, जर्मनी आणि जपान या देशांचे शास्त्रज्ञ एकत्र काम करीत होते. थुम्ब्याचे टर्ल्स हे केंद्र दोन फेब्रुवारी १९६८ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्रांना समर्पित करण्यात आले. यातून अवकाश क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य मिळण्यासाठी द्वार खुले झाले. यंदा दोन फेब्रुवारी २०१८ ला या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा टर्ल्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली टर्ल्सजवळच्या वेली टेकडीवर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (स्पेस सायन्स अँड टेकनॉलॉजी सेंटर – एसएसटीसी) उभारण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्यासाठी या दोघाही शास्त्रज्ञांचा दूरदर्शीपणा महत्वाचा ठरला. दुर्दैवाने जानेवारी १९६६ मध्ये डॉ. भाभांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यानंतर देशाच्या अवकाश कार्यक्रमासोबत अणु कार्यक्रमाचीही धुरा डॉ. साराभाई यांच्या खांद्यावर आली. याच काळात १९६५ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा. सतीश धवन हे इन्कोस्पारचे सभासद म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासून तेही आमच्या कामांमध्ये रुची दाखवू लागले.
अवकाश तंत्रज्ञानाच्या साह्याने आपल्या नागरीकांच्या दैनंदिन आयुष्यात कसा बदल घडवून आणता येईल याबाबत डॉ. साराभाईंच्या मनात स्पष्ट योजना होती. १९६२ ते ६४ या कालावधीत हे स्पष्ट झाले की, हवामानासाठी पृथ्वी निरीक्षण करणारे, तसेच दूरसंपर्काचे कृत्रिम उपग्रह केवळ विकसितच नाही, तर विकसनशील देशांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. डॉ. साराभाईंनी अवकाश तंत्रज्ञानाच्या या व्यावहारिक उपयोगांवर आपले लक्ष्य केंद्रित केले. आपण स्वतः उपग्रह बनवावेत आणि स्वतःच्या प्रक्षेपकांच्या साह्याने ते अवकाशात पाठवावेत असा त्यांचा संकल्प होता. तेव्हा देशात आणि देशाबाहेर असे अनेक लोक होते, ज्यांना अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांबाबत साशंकता होती.
डॉ साराभाईंच्या शब्दात सांगायचे तर, ‘काही लोकांना प्रश्न पडतो की विकसनशील देशांमध्ये अवकाश कार्यक्रम हवाच कशासाठी. आमच्या हेतूविषयी आमच्या मनात कोणतीही संदिग्धता नाही. चंद्रावर, इतर ग्रहांवर किंवा अवकाशात मानवाला पाठवण्यासाठी आम्हाला कोणत्याही विकसित राष्ट्रांसोबत स्पर्धा करायची नाही. अवकाश तंत्रज्ञानातून निर्माण होणारे अत्याधुनिक व्यावहारीक उपयोग आम्हाला देशाच्या, समाजाच्या विकासासाठी, माणसांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. आणि त्यामध्ये आम्ही कोठेही मागे राहता कामा नये.’
देशात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विकास व्हावा या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या समितीचे नेतृत्व डॉ. भाभा करीत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर डॉ. साराभाईंनी ती जबाबदारी पार पाडली. यातूनच १९७० मध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेकट्रोनिक्सची स्थापना झाली. डॉ. साराभाई आणि डॉ. ए. एस. राव यांच्या पुढाकाराने हैदराबाद येथे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची (ईसीआयएल) सुरुवात झाली. डॉ. साराभाईंच्या प्रोत्साहनामुळे ईसीआयएल येथे मोठ्या संगणकांची निर्मिती केली जाऊ लागली. भाभा अणु संशोधन केंद्रात (बीएआरसी) विकसित करण्यात आलेले रिअल टाइम कम्प्युटरचे तंत्रज्ञान ईसीआयएलकडे हस्तांतरीत करण्यात आले. यातून टीडीएस शृंखलेतील कम्प्युटर प्रत्यक्षात आले. हे कम्प्युटर स्पेस अॅप्लिकेशन सेंटर आणि श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रांवर अत्यंत उपयुक्त ठरले.
ईसीआयएलकडून एकीकडे अणु शक्ती केंद्रांसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती सुरु असताना दुसरीकडे उपग्रहांशी संपर्क साधणारी केंद्रेही विकसित केली जात होती. या केंद्रांचा वापर इस्रो आणि दूरसंचार मंत्रालयाकडून केला जात होता. उपग्रहावर आधारीत दूरसंपर्कासंबंधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ (इंटेलसॅट) तयार झाले तेव्हा त्यामध्ये हस्ताक्षर करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. उपग्रहीय दळणवळणाचे महत्व ओळखून आपल्या देशात त्यासंबंधीचे प्रशिक्षण केंद्र असण्याची गरज त्यांनी ओळखली. त्यातूनच १९६७ मध्ये उपग्रहाशी संपर्क साधणारे देशातील पहिले प्रायोगिक केंद्र- एक्सपिरिमेंटल सॅटेलाईट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन – ईएससीईएस अहमदाबादमध्ये उभारण्यात आले.
या केंद्रातून भारतातील आणि अनेक विकसनशील देशांमधील अनेकांना उपग्रहीय दळणवळणासंबंधीचे ज्ञान मिळाले. या ज्ञानाचा उपयोग करून १९७१ मध्ये पूर्णतः स्वदेशी बनावटीचे उपग्रहाशी संपर्क साधणारे जमिनीवरील केंद्र नारायणगावजवळील आर्वी येथे उभारण्यात आले. इसरोचे स्पेस अॅप्लिकेशन सेंटर ईएससीईएसच्याच आवारात उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे पन्नास वर्षांनंतरही ईएससीईएस सुरळीतपणे कार्यरत आहे.
सर्व पातळ्यांवरील शिक्षणासाठी डॉ. साराभाई आग्रही होते. टीव्हीचा वापर शिक्षणासाठी आणि सूचना प्रसारणासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो याबाबत त्यांचे ठाम मत होते. संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांमधील माहिती टीव्हीच्या साह्याने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याची ते योजना आखू लागले. १९६८ मध्ये देशातील एकमेव दूरदर्शन केंद्र असणाऱ्या दिल्ली केंद्रावरून ‘कृषिदर्शन’ हा कार्यक्रम प्रसारीत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आपल्या देशात मायक्रोवेव्ह कम्युनिकेशनचे मोठे जाळे नसल्यामुळे उपग्रहाच्या माध्यमातून भारतात टीव्ही आणणे शक्य होऊ शकेल असे त्यांचे म्हणणे होते. देशात टेलिकम्युनिकेशन नेटवर्क नसणे ही बाब त्यांनी उपग्रहीय दूरसंपर्कासाठी संधी मानली. डॉ. ई. व्ही. चिटणीस आणि डॉ. साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्स्पेरिमेंटची (साईट) आखणी करण्यात आली. त्यासाठी १९६९ मध्ये नासासोबत करारही करण्यात आला. या प्रयोगांतर्गत नासाच्या एटीएस ६ उपग्रहाचा वापर करून देशातील सहा राज्यांमधील २४०० खेड्यांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम दाखवण्याचे निश्चित करण्यात आले.
नासाच्या उपग्रहाचा वापर संपल्यावर दूरसंपर्क साधणारे आपले स्वतःचे उपग्रह बांधण्यासाठीचा आम्ही अभ्यास सुरु केला. १९७५- ७६ मध्ये साईट प्रकल्प राबवण्यात आला. त्यातूनच देशाच्या इन्सॅट उपग्रह शृंखलेची पायाभरणी झाली. १९८३ मध्ये पहिला इन्सॅट उपग्रह तयारही झाला. इन्सॅट यशस्वीपणे प्रस्थापित केल्यामुळे जगात आज टीव्हीचे सर्वात मोठे जाळे भारतात आहे. इन्सॅट २ नंतरचे सर्व कार्यरत उपग्रह पूर्णपणे भारतात बनवण्यात आले आहेत.
देशातील भूसंसाधनांचा उपग्रहाच्या साह्याने वेध घेणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर १९६९ मध्ये अशा उपग्रहाच्या बांधणीच्या अभ्यासासाठी माझ्यासह प्रा. पी. आर. पिशारोटी, डॉ दक्षिणामूर्ती, कृष्णमूर्ती या शास्त्रज्ञांची एक समिती नेमण्यात आली. इसरोने विकसित केलेले रिमोट सेन्सिंग उपग्रह आज सर्वच क्षेत्रांसाठी महत्वाची आणि उपयुक्त माहिती मिळवून देत आहेत. अर्थ ऑबझर्वेशन सॅटेलाईट हा इस्रोच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे.
देशाच्या अणु आणि अवकाश कार्यक्रमाची आगामी वाटचाल कशी असेल हे सरकार, उद्योग, राजकारणी आणि सर्वसामान्य नागरीक अशा सर्वांनाच समजावे या हेतूने ‘अणु आणि अवकाश कार्यक्रमाच्या दशकाचा आराखडा’ डॉ साराभाई यांनी स्वतः तयार करून १९६९ मध्ये प्रसिद्ध केला. या आराखड्यामधून आपण आपले दूरसंपर्क उपग्रह स्वतः तयार करून स्वतः प्रक्षेपित करण्याची क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.
त्यांच्या या नेमक्या दिशादर्शनामुळे अवकाश कार्यक्रमाच्या विकासात उद्योग क्षेत्राकडूनही मोठे सहकार्य मिळाले. डॉ. साराभाईंच्या मार्गदर्शनाखाली सॅटेलाईट लाँच वेहिकल प्रोग्रॅम सुरु झाला. अवकाशात उपग्रहाला यशस्वीपणे पोचवणारे एसएलव्ही ३ हे इसरोने विकसित केलेले पहिले स्वदेशी रॉकेट होते. त्यानंतर चढ- उतार अनुभवत भारताचा उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम उत्तरोत्तर विकसित होत राहिला. ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच वेहिकल (एएसएलव्ही), पोलार सॅटेलाईट लाँच वेहिकल (पीएसएलव्ही), जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच वेहिकल (जीएसएलव्ही – मार्क २ आणि मार्क ३) ही इसरोने विकसित केलेली रॉकेट आहेत.
त्यांनी १९४७ मध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली, याच प्रयोगशाळेने पुढे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) निर्मितीत महत्वाची भूमिका निभावली. देशासाठी आज महत्वाच्या असणाऱ्या अनेक संस्थांच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद, कम्युनिटी सायन्स सेंटर या त्यांपैकी काही संस्था.
अहमदाबादमध्ये त्यांनी सुरु केलेले कम्युनिटी सायन्स सेंटर हे अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. या केंद्रातून विद्यार्थी आणि नागरीकांना विज्ञानाच्या विविध शाखांबद्दलची माहिती सोप्या आणि रंजक पद्धतीने दिली जाते. या केंद्रातून विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा महत्वाचा कार्यक्रम राबवला जातो. कम्युनिटी सायन्स सेंटरचे भूमिपूजन डॉ. सी. व्ही. रामन यांच्या हस्ते झाले होते. याच प्रसंगी ‘आकाश निळे का असते’ हे त्यांचे प्रसिद्ध व्याख्यान त्यांनी दिले होते.
आज जेव्हा डॉ. साराभाईं आठवतात ते फक्त एक शास्त्रज्ञ म्हणून नाही. बहुआयामी असणारे डॉ साराभाई उत्तम शिक्षक, मार्गदर्शक, नेते आणि दूरदर्शी संस्था निर्मातेही होते. त्यांचे लिखाण आजही आम्हाला प्रेरणा देते. ते अत्यंत सकारात्मक आणि आशावादी होते. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि त्यांच्या क्षमतांवर खूप विश्वास होता. सुरुवातीच्या वर्षांमध्ये प्रा. ई. व्ही चिटणीस आणि डॉ. उपेंद्र देसाई यांनी टर्ल्स आणि एसएसटीसीच्या कामात डॉ. साराभाईंना खूप मदत केली. आम्ही आमच्या कामात स्वयंपूर्ण असावे याबाबत ते सतत आग्रही असायचे. त्यांच्यासोबत काम करताना आम्हा सर्वांसाठीच ‘मेक इन इंडिया’ ही केवळ घोषणा नाही, तर ती एक जीवन पद्धती होती.
आज जेव्हा मी मागे पाहतो; १९६९ मध्ये त्यांनी आराखड्यामध्ये निश्चित केलेली बहुतेक लक्ष्ये इसरो गाठली आहेत. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची क्षितिजे दिवसेंदिवस विस्तारत आहेत. चंद्र आणि मंगळ मोहिमांनंतर आता भारतीय भूमीवरून माणसाला अवकाशात पाठवण्याची तयारी सुरु आहे. डॉ. साराभाईंनी रचलेल्या भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या भक्कम पायामुळेच आज हे सर्व शक्य होत आहे.
———