ताऱ्याला नष्ट करणाऱ्या पल्सारचा शोध
पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समधील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी सूर्यापेक्षा दहा पटींनी कमी वस्तुमानाच्या ताऱ्याला नष्ट करणाऱ्या पल्सारची दुर्मीळ घटना समोर आणली आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांसोबत केलेल्या या संशोधनासाठी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) नोंदींचा वापर करण्यात आला आहे.
पल्सार हा आकाराने लहान, अतिशय घन आणि अधिक वयाचा न्यूट्रॉन तारा असून, तो अत्यंत वेगाने स्वतःभोवती फिरत असतो. या ताऱ्यामधून उत्सर्जित होणारे रेडिओ संदेश पृथ्वीवर विशिष्ट कालावधीने नोंदले जात असल्यामुळे त्याला पल्सार म्हणतात. काही पल्सार एका सेकंदामध्ये शेकडो वेळा स्वतःभोवती फिरतात, अशांना मिलिसेकंद पल्सार म्हणतात. २०१६ मध्ये एनसीआरएमधील प्रा. भासवती भट्टाचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीएमआरटीच्या नोंदींच्या साह्याने ‘जे १२४२-४७१२’ या मिलीसेकंदचा शोध लावला होता.
आता संस्थेतील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या अंकिता घोषच्या पुढाकाराने झालेल्या संशोधनातून खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने ‘जे १२४२-४७१२’ या पल्सारच्या क्षेत्रातील घडामोडी समोर आणल्या आहेत. एनसीआरएने दिलेल्या माहितीनुसार, अद्ययावत जीएमआरटीच्या साह्याने शास्त्रज्ञांनी ४०० आणि ६५० मेगाहर्टझ फ्रिक्वेन्सीवर या पल्सारच्या २.४ मायक्रोसेकंदच्या अचूकतेने नोंदी घेतल्या. या नोंदींमधून पल्सारच्या संदेशांमध्ये होणारा सूक्ष्म बदल टिपण्यात आला.
‘जे १२४२-४७१२’ पल्सारला आपल्या सूर्यापेक्षा दहा पटींनी कमी वजन असलेला जोडीदार असून, हे दोन्ही तारे एकमेकांभोवती ७.७ तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. या काळात काही वेळा या जोडीकडून येणाऱ्या संदेशांची तीव्रता कमी होते. पल्सारकडून मुक्त होणाऱ्या तीव्र ऊर्जेमुळे त्याच्या जोडीदार ताऱ्याच्या वस्तुमानाचा ऱ्हास होत असून, एकप्रकारे पल्सार त्याच्या जोडीदाराला नष्ट करत आहे. जोडीदार ताऱ्यातून बाहेर पडलेल्या वस्तुमानामुळे पल्सारकडून येणाऱ्या रेडिओ संदेशांची तीव्रता कमी होते, असे या संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन ॲस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
————
श्वसन करणाऱ्या रॉकेटची चाचणी यशस्वी
भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) श्वसन करणाऱ्या इंधन यंत्रणेची (एअर ब्रीदिंग प्रॉपल्शन टेक्नॉलॉजी) श्रीहरीकोटा येथे नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी आरएच ५६० हे साऊंडिंग रॉकेट वापरण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यातील कमी खर्चाच्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेटमध्ये केला जाणार आहे.
इस्रोतर्फे जूनमध्ये भविष्यवेधी रियुजेबल लाँच वेहिकलच्या (आरएलव्ही) लँडिंग एक्सप्रिमेन्टची (लेक्स) तिसरी आणि अखेरची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमधून अमेरिकी स्पेस शटलसारख्या दिसणाऱ्या पुष्पक यानाला जमिनीपासून चार किलोमीटर उंचावर नेऊन स्वयंचलित पद्धतीने धावपट्टीवर विमानासारखे उतरवण्यात आले. आता या यानाला कमी खर्चात अवकाशात नेऊ शकणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची दुसरी चाचणीही यशस्वी झाली आहे.
श्रीहरीकोटा येथे पार पडलेल्या चाचणीत रोहिणी साऊंडिंग रॉकेटला इस्रोने विकसित केलेले स्क्रॅमजेट इंजिन जोडण्यात आले होते. रॉकेट वातावरणातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असताना स्क्रॅमजेट इंजिनाच्या साह्याने वातावरणातील ऑक्सिजन शोषला जाऊन त्याचा वापर ऑक्सिडायझर म्हणून केला जातो. या तंत्रज्ञानामुळे रॉकेटमधील इंधनाच्या मिश्रणात वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिडायझरचे वजन कमी होऊन रॉकेट हलके होते आणि खर्चातही मोठी बचत होते.
नुकत्याच पार पडलेल्या चाचणीत विविध ११० प्रकारच्या घटकांची पडताळणी करण्यात आली. हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वातावरणात वापरण्याआधी विक्रम साराभाई अवकाश केंद्र (व्हीएसएससी), लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) आणि नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरी (एनएएल) येथे जमिनीवरील चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या होत्या. या आधी या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी २८ ऑगस्ट २०१६ रोजी यशस्वी झाली होती. भविष्यात श्वसन करणारे रॉकेट आणि पुनर्वापर करता येणारे यान यांच्या साह्याने कमी खर्चात अवकाश प्रवास किंवा उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची योजना आहे. स्क्रॅमजेट तंत्रज्ञान अवगत असलेला भारत हा जगातील चौथा देश आहे.
—————
वायनाडची दरड कमी वेळातील अतिवृष्टीमुळे
केरळच्या वायनाड क्षेत्रांत झालेल्या दरडींमागे काही दिवसांचा संततधार पाऊस आणि मध्यरात्री कमी वेळात झालेली अतिवृष्टी कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. ३० जुलैला सकाळी वायनाडमध्ये ३३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यांपैकी बहुतांश पाऊस २९ जुलैच्या मध्यरात्री झाला. वायनाड क्षेत्रातील मेप्पाडी, चुरलमाला, मुंडकाई आदी भागांमध्ये झालेल्या दरडींच्या घटनांमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वायनाड क्षेत्रात सलग दोन आठवडे पाऊस पडत होता. २९ जुलैच्या सकाळी २४ तासांमध्ये उत्तर आणि मध्य केरळमध्ये बहुतेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली होती.
केरळच्या किनारपट्टी आणि घाट क्षेत्रावर २९ च्या सकाळी सातपासून सातत्याने उंच ढगांची निर्मिती होत राहिली. रात्री वायनाड आणि लगतच्या कोळीकोड जिल्ह्यांतील पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीनंतर वायनाडच्या घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पदींजराथरा धरणाजवळ ३३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याचा परिणाम म्हणून दरडप्रवण क्षेत्र असलेल्या वायनाडमध्ये ३० जुलैच्या पहाटे दरडी कोसळल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे २४ तासांत ३४० मिमी, पलक्कडच्या अलथूरमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली.
दरडींची पूर्वकल्पना होती
वायनाडमध्ये या पूर्वीही अनेकदा दरडी कोसळल्या असल्याने स्थानिक प्रशासनाने फ्लॅश फ्लड आणि दरडींचा धोका लक्षात घेऊन मदत कार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. वायनाडमध्ये दरडी कोसळल्यानंतर घाटाखाली असलेल्या कोशिकोडमध्ये एकाएकी नदीच्या पाण्यात वाढ होऊन फ्लॅशफ्लड येत असल्याने तेथील जिल्हा प्रशासनही सज्ज होते. मेप्पाडीमधील काही शाळांनी सोमवारी सुट्टीही जाहीर केली होती. मेप्पाडीमध्ये २९ तारखेला एका ठिकाणी दरड कोसळली होती. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिला असताना त्यापेक्षाही मोठे संकट येऊ शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले असते, तर अनेकांचे जीव वाचले असते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
—————
भारतीय ‘गगनयात्री’ अवकाशात झेपावणार
भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या गगनयात्रींची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) जाणाऱ्या ‘ ॲक्सिऑम ४’ या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झाली आहे. या मोहिमेत शुक्ला यांच्याकडे कॅप्टनची जबाबदारी असून, नायर हे राखीव कॅप्टन म्हणून मोहिमेत सहभागी असतील. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल चार दशकांनी भारताचे नागरिकत्व असणारी व्यक्ती शुक्ला यांच्या रूपाने अवकाश प्रवास करील.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान इस्रो आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- नासाच्या संयुक्त अवकाश मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. त्याला अनुसरून नासाशी व्यवसायिकरित्या संलग्न असलेल्या ॲक्सिऑम स्पेस या कंपनीसोबत इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरने (एचएसएफसी) ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेसाठी अवकाश प्रवासाचा करार केला.
भारताच्या नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डाने या मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची प्रमुख कॅप्टन म्हणून निवड केली असून, राखीव कॅप्टन म्हणून ग्रुप कॅप्टन नायर यांचा सहभाग असेल. आयएसएसमध्ये सहभागी असलेल्या देशांच्या मल्टीलॅटरल क्रू ऑपरेशन्स पॅनलकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर भारतीय गगनयात्री मोहिमेत सहभागी होऊ शकतील.
या मोहिमेत शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी व्हिट्सन या कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळतील. पोलंडचे स्लॅवोझ ऊझान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभाग असेल. चौघा अंतराळवीरांचे प्रशिक्षण पाच ऑगस्टपासून अमेरिकेत सुरू झाले. त्यांना नासा, स्पेस एक्स आणि ॲक्सिऑम स्पेसच्या विविध केंद्रांवर अवकाशयान, मोहिमेशी संबंधित यंत्रणा आणि आयएसएसवर करण्यात येणाऱ्या प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अशी असेल ‘अक्सिऑम ४’ मोहीम
‘ॲक्सिऑम ४’ ही मोहीम चालू वर्षाअखेरपासून ते २०२५ मध्ये राबवण्यात येऊ शकते. स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन ९ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाश यानामार्फत ही मोहीम पार पडेल. या मोहिमेतून भारतीय गगनयात्रींना गगनयान मोहिमेआधीच अवकाश प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. १४ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार असून, तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.
————–