– सायली सारोळकर
प्रख्यात हृदय शल्यचिकित्सक डॉ. एम. एस. वालियाथन यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी कर्नाटकमधील मणिपाल येथे निधन झाले. हृदयावरील शास्त्रकिया आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय नाव म्हणजे, डॉ. एम. एस. वालियाथन. डॉ. वालियाथन हे भारतातील सर्वोत्तम हृदय शल्यचिकित्सकांपैकी एक मानले जातात.
२४ मे, १९३४ रोजी केरळ मधील मावेलिक्कारा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉ. मार्तंडवर्मा शंकरन वालियाथन. लहानपणापासूनच त्यांच्यावर मल्याळमसह इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे संस्कार झाले. मावेलिक्कारा येथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांच्या कुटुंबात वैद्यकीय शिक्षणाची परंपरा होती. त्यानुसार त्यांनी देखील तिरुअनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण डॉ. वालियाथन यांनी एडिनबरो आणि लिव्हरपूल या विद्यापीठांमधून केले.
यानंतर त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. हृदयावरील शस्त्रक्रिया शिकण्यासाठी डॉ. एम. एस. वालियाथन यांना कॅनडातील ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अँड सर्जन्स’ येथे फेलोशिप मिळाली. त्यासोबतच ते जॉन हॉपकिन्स, जॉर्ज वॉशिंग्टन आणि जॉर्जटाऊन या विद्यापीठांच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांचे सर्जरीचे ट्रेनिंग चालू होते. इथे त्यांचे मार्गदर्शक होते, डॉ. व्हिन्सेंट गॉट आणि डॉ. चार्ल्स हफनेगल. या दोघांचे हृदय शस्त्रक्रियेतील आणि त्यासंबंधीच्या उपकारांची संशोधनात योगदान खूप मोठे होते. त्यांच्यासोबत काम करताना डॉ. वालियाथन यांना वैद्यकीय अभियांत्रिकी आणि संशोधनात रुची निर्माण झाली.
१९७२ साली डॉ. वालियाथन भारतात परत आले. त्यानंतर काही काळ त्यांनी आयआयटी मद्रास येथे अध्यापनाचे काम केले. ते करत असताना त्यांना केरळ सरकारकडून निमंत्रण मिळाले. केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री अच्युता मेनन यांनी डॉ. वालियाथन यांना तिरुअनंतपूरम येथील श्री चित्रा तिरनल सेंटर येथे एक अद्ययावत दवाखाना उभारण्याची सूचना केली. या दवाखान्यात त्यांना संशोधन करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र मिळणार होते. दोनच वर्षात हा दवाखाना तयार झाला आणि हृदयरोगाच्या रुग्णांची भरती सुरु झाली. याच दवाखान्यात त्यांचे हृदयोपचारात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांवर संशोधन देखील सुरु झाले .
त्या काळात रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोस्थेटिक अर्थात कृत्रिम व्हॉल्व्हला खूप मागणी होती. परंतु, त्याची किंमत खूप जास्त होती. सर्वसामान्य रुग्णांसाठी ते उपचार आवाक्याबाहेरचे होते. ही समस्या लक्षात घेता डॉ. वालियाथन यांनी आणि त्यांच्या टीमने स्वतः एक कृत्रिम व्हॉल्व तयार करण्याचे ठरवले. ३ अयशस्वी प्रयत्नानंतर चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. पूर्णपणे भारतात बनवलेला, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले ‘चित्रा हार्ट व्हॉल्व’ तयार झाला. या व्हॉल्वने आतापर्यंत भारतातील आणि भारताबाहेरील देखील असंख्य रुग्णांना जीवदान दिले आहे. चित्रा व्हॉल्व्ह’ अवघ्या ११ वर्षांत भारतीय आणि आशियाई अशा ५५ हजार रुग्णांमध्ये हृदयस्थ झाला. ‘चित्रा हार्ट व्हॉल्व’ हे भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे योगदान मानले जाते. दोन दशके त्रिवेंदममधील चित्रा सेंटरमध्ये संशोधन केल्यानंतर त्यांची नियुक्ती कर्नाटकातील मणिपाल येथे करण्यात आली. मणिपाल विद्यापीठाचे पहिले व्हाईस चॅन्सेलर म्हणून ते रुजू झाले.
कारकिर्दीच्या अखेरच्या काळात डॉ. वालियाथन यांनी आपले लक्ष आयुर्वेदाकडे वळवले. लहानपणासून ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आयुर्वेदिक उपचार घेताना पाहत होते. तेव्हापासून त्यांना आयुर्वेदाबद्दल कुतूहल वाटत होते. पुढे मॉडर्न मेडिसिन आणि कार्डियाक सर्जरीमध्ये काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की, या क्षेत्रात भारताचे काही विशेष योगदान नाही. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतात वैद्यकीय क्षेत्रात काय संशोधन झाले आहे याचा शोध घेताना त्यांना चरक, सुश्रुत आणि वाग्भट्ट यांच्या ग्रंथाबद्दल माहिती मिळाली. तिथूनच त्यांची आयुर्वेदातील रुची वाढली आणि त्यांनी या ‘चरकसंहीता’ या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास सुरु केला. या कामी त्यांना केरळमधील श्री राघवन तिरुमूलपाद या वैद्यांनी मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी चरक, सुश्रुत आणि वाग्भट्ट आणि त्यांचे आयुर्वेदातील योगदान यावर सोप्या भाषेत पुस्तके लिहिली.
त्यांच्या सन्मानार्थ ‘श्री चित्रा मेडिकल इन्स्टिट्यूट’मधील एका इमारतीला डॉ. वालिआथन यांचे नाव देण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मभूषण, तर २००५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. १७ जुलै रोजी वयाच्या ९० व्या वर्षी मणिपाल येथे त्यांचे निधन झाले.
————