– मयुरेश प्रभुणे
प्राचीन काळी कला- साहित्याप्रमाणे भारतात विज्ञानाचीही मोठी जोपासना होत असे. भारतीय खगोलशास्त्रज्ञ म्हटले की, कित्येक शतकांनंतर आजही आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांसारख्या शास्त्रज्ञांची नावे घेतली जातात. विसाव्या शतकात या मोजक्या शास्त्रज्ञांच्या पंक्तीत आणखी एक नाव विराजमान झाले – डॉ. जयंत विष्णू नारळीकर.
विविध क्षेत्रांच्या प्रगतीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते आणि त्या क्षेत्रांच्या प्रगतीसाठी काही मोजक्या दूरदर्शी, प्रतिभावंतांचे योगदान महत्वाचे ठरते. एकविसाव्या शतकात भारतीय खगोलशास्त्रात येऊ घातलेल्या ‘सुवर्णयुगाचा’ पाया डॉ. नारळीकर यांच्या गेल्या पाच दशकांच्या विज्ञानसेवेतूनच भक्कम झाला. डॉ. नारळीकर यांची ओळख खगोलशास्त्रज्ञ म्हणून जशी आहे, तशीच ती विज्ञान प्रसारक आणि विज्ञान साहित्यिक म्हणूनही आहे. विश्वाबद्दल आपल्याला समजलेले तथ्य सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्याची, लिहिण्याची त्यांची कला अत्यंत दुर्मिळ अशी आहे. अशा ज्येष्ठ शास्त्रज्ञाची आणि विज्ञान लेखकाची निवड नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने झाली होती.
कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ ला जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. मात्र, त्यांचे बालपण गेले ते शिक्षणाची शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या काशीमध्ये (वाराणसी). वडील विष्णुपंत गणिताचे प्राध्यापक, तर आई सुमतीताई संस्कृतच्या विद्वान. दोघांकडून त्यांना मिळालेल्या जनुकांचे आणि संस्कारांचे परिणाम त्यांच्या लहानपणीच दिसू लागले. रामायण, महाभारत, गीतेतले श्लोक तोंडपाठ असतानाच, गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा आणि शाळेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा त्यांचा नेम कधी चुकला नाही. केवळ अभ्यासातच नाही, तर क्रिकेटमध्येही त्यांनी चमक दाखवली. उत्तम इंग्रजी साहित्य वाचण्याचे बाळकडूही त्यांना घरीच मिळाले. घरातून मिळालेल्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या जोरावर शालेय- महाविद्यालयीन स्तरावरच त्यांनी यशाची अनेक शिखरे पार केली.
डॉ. नारळीकर उच्च शिक्षणासाठी १९५८ मध्ये केम्ब्रिजमध्ये दाखल झाले. १९६० मध्ये गणितात बीए, त्यानंतर १९६३ मध्ये पीएचडी आणि १९६४ मध्ये त्यांनी एमए पूर्ण केले. या सर्व पदव्या विशेष गुणवत्तेसह पूर्ण केल्यामुळे त्यांना अनेक पारितोषिकांनी आणि मानाच्या शिष्यवृत्त्यांनी सन्मानित करण्यात आले. गणितातील अद्भुत प्रतिभेमुळे वडील विष्णुपंतांप्रमाणेच डॉ. नारळीकरही रँग्लर झाले. केम्ब्रिजमध्ये मानाचे टायसन पदक, स्मिथ्स पारितोषिक, ॲडम्स पारितोषिक मिळवून त्यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याच काळात इ. एम. फॉर्स्टर यांसारख्या ज्येष्ठ लेखकांचा त्यांना सहवास लाभला.
विसाव्या शतकातील आघाडीचे खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्रात त्यांनी आपल्या संशोधनाचा श्रीगणेशा केला. हॉएल यांनी केम्ब्रिज येथे १९६६ मध्ये स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी’ या संस्थेत त्यांनी १९७२ पर्यंत संस्थापक सदस्य म्हणून काम केले. विश्वरचनाशास्त्रामध्ये प्रसिद्ध असणारा हॉएल – नारळीकर सिद्धांत त्यांच्या या क्षेत्रातील प्रभुत्वाची साक्ष देतो. विश्वातील दूरच्या ताऱ्यांचा आपल्या पृथ्वीवरील वस्तुमानावरही प्रभाव असतो हे दाखवून देणाऱ्या मॅक सिद्धांताला गणिती रूप देऊन डॉ. नारळीकर यांनी खगोल भौतिकशास्त्रात मोलाची भर टाकली. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाला पुढच्या स्तरावर नेण्यात डॉ. नारळीकर यांच्या समीकरणांनी महत्वाची भूमिका बजावली. जगभरातील बहुतांश खगोलशास्त्रज्ञ विश्व निर्मितीसाठी महास्फोट सिद्धांताची कास धरत असताना, अल्पसंख्य ठरवूनही गणिती पाठबळावर स्थिर स्थिती सिद्धांताची बाजू लावून धरताना डॉ. नारळीकर यांनी आपली वैज्ञानिक विचार पद्धती कधी सोडली नाही.
केम्ब्रिजसारख्या शिक्षण आणि विज्ञानाच्या पंढरीत अनेक मानाची पदे खुणावत असतानाही तत्कालीन पंतप्रधानांच्या विनंतीवरून डॉ. नारळीकर यांनी मायदेशात येण्याचा निर्णय घेतला. १९७२ ते १९८९ या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून (टीआयएफआर) खगोलशास्त्रातील संशोधनासोबत भावी शास्त्रज्ञ घडवण्याचे त्यांनी महत्वाचे कार्य पार पाडले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) पुढाकाराने तत्कालीन पुणे विद्यापीठ आवारात १९८८ मध्ये आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राची (आयुका) स्थापना करण्यात आली. आयुकाच्या आराखड्यापासून ते या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्यापर्यंत संस्थापक संचालक म्हणून डॉ. नारळीकर यांची प्रमुख भूमिका राहिली. आयुकाची जडणघडण हे भारतीय खगोलशास्त्राचे नवे पर्वच म्हणता येईल.
गुरुत्वाकर्षण, आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद, तारे आणि दीर्घिकांच्या रचना आणि उत्क्रांती आदी विषयांमध्ये आयुकातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला जगन्मान्यता मिळाली आहे. नव्वदच्या दशकात भारतात कोठेही चर्चेत नसणाऱ्या गुरुत्वीय लहरींविषयीच्या संशोधनाला आयुकाचे संचालक म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या द्रष्टेपणामुळेच २०१५ मधील गुरुत्वीय लहरींच्या ऐतिहासिक शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा सिंहाचा वाटा राहिला. पाठोपाठ या शोधाला नोबेल पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले. आज गुरुत्वीय लहरींचा वेध घेणारी तिसरी वेधशाळा भारतात, तीही महाराष्ट्रात येत आहे. हे नव्वदच्या दशकात डॉ. नारळीकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे फलित म्हणावे लागेल. जगातील सर्वात मोठ्या शंभर फुटी दुर्बिणीच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातही आयुका सहभागी आहे. ॲस्ट्रोसॅट या जगातील पहिल्या बहुतरंगी निरीक्षणे घेणाऱ्या अवकाशातील वेधशाळेच्या निर्मितीपासून प्रत्यक्ष संशोधनापर्यंत आयुकाने बजावलेल्या कामगिरीचे जगभर कौतुक होत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित झालेल्या आदित्य मोहीमेतही आयुकाने विकसित केलेल्या सूट या उपकरणाचा समावेश आहे. आयुकाने घडवलेले शेकडो संशोधक आणि प्राध्यापक आज भारताप्रमाणेच जगभरात खगोल संशोधन आणि अध्यापनाचे कार्य करीत आहेत.
खगोलशास्त्रज्ञ म्हणून जशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे, तसेच प्रभावी विज्ञान प्रसारक म्हणूनही ते ओळखले जातात. आयुकात संशोधनाचे विभाग सुरु होत असतानाच, विद्यार्थी आणि नागरिकांचाही तिथे मुक्त वावर असावा याची त्यांनी दक्षता घेतली. आयुकाच्या विज्ञान प्रसाराच्या उपक्रमांमधून प्रोत्साहीत झालेले शालेय विद्यार्थी आज शिक्षण पूर्ण करून पुन्हा आयुकातच खगोलशास्त्रज्ञ म्हणून रुजू होत आहेत, हे उदाहरण देशभरातील सर्व संशोधन संस्थांसाठी प्रेरणादायी आहे. विज्ञान आणि खगोलशास्त्रासंबंधी हजारो व्याख्याने देऊन त्यांनी निरपेक्ष वृत्तीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला. सुरभी या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेतून त्यांनी साधलेल्या विज्ञान संवादही खूप गाजला.
डॉ.जयंत नारळीकर यांच्या साहित्यिक अंगामध्ये त्यांच्यातील शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक अशा दोन्ही भूमिकांचे प्रतिबिंब उमटते. गुरु फ्रेड हॉएल यांच्याकडून विज्ञान कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे डॉ नारळीकर सांगतात. विसाव्या शतकात विज्ञान- तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. एकविसाव्या शतकात प्रगतीचा वेग आणखी वाढला. गेल्या दोन हजार वर्षांमध्ये मानवी प्रगतीचा हा सर्वाधिक वेग मानला जातो. मात्र, डॉ. नारळीकर यांच्या मते मानवाला विज्ञान पचलेले नाही. विज्ञानाचा वापर कसा करावा याचे ताळतंत्र नसल्यामुळे समाजात आणि निसर्गात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे विज्ञानाच्या आधारे तयार झालेली उपकरणे वापरून माणूस अजूनही शेकडो वर्षांपूर्वीच्या अंधश्रद्धांना कवटाळवून बसला आहे. माणसामध्ये विज्ञानाच्या सुयोग्य वापराचे ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तेव्हाच येईल, जेव्हा त्याच्यापर्यंत विज्ञानाची योग्य ती माहिती पोचेल.
मात्र, विज्ञानातील किचकट मानल्या जाणाऱ्या या कल्पना सर्वसामान्यांपर्यंत साखरेचा लेप असलेल्या औषधाच्या गोळीप्रमाणे पोचवायला हव्यात. त्यासाठी विज्ञान कथा हे उत्तम माध्यम असून, तेही त्याच्या मातृभाषेतून पोचवायला हवे असे डॉ. नारळीकर यांचे ठाम मत आहे. १९७४ मध्ये एक कंटाळवाणे व्याख्यान ऐकता ऐकता सभागृहातच त्यांनी आपली पहिली विज्ञानकथा ‘कृष्णविवर’ लिहून काढली. एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेभोवती रंजक कथानक गुंफून त्यांनी लिहिलेल्या कथा महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुढारी, लोकप्रभा, आनंद, किर्लोस्कर, सुधन्वा, सृष्टिज्ञान, मराठी विज्ञान पत्रिका येथे प्रसिद्ध झाल्या. या कथांच्या संकलनातून यक्षांची देणगी, टाइम मशीनची किमया, अंतराळातील भस्मासुर आदी कथासंग्रह प्रकाशित झाले. डॉ. नारळीकर यांच्या विज्ञान कथांचा गौरवपर उल्लेख दुर्गाबाई भागवत यांनी कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात केला होता.
एरवी ‘रिसर्च पेपर’ लिहायची सवय असणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी वाचकांकडून त्यांच्या विज्ञान कथांना मिळालेल्या प्रतिसादामुळे कादंबऱ्यांमध्येही आपले कौशल्य आजमावले. प्रेषित, वामन परत न आला, व्हायरस आणि अभयारण्य या त्यांच्या कादंबऱ्याही वाचकांच्या पसंतीस उतरल्या. विज्ञान जगतातील तत्कालीन प्रगती, संशोधन प्रक्रिया, संशोधन संस्थांमधील घडामोडी, शास्त्रज्ञांचे मनोविश्व यांप्रमाणेच भविष्याचा तार्किक आणि व्यवहार्य वेध त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यांमधून घेतलेला दिसतो. १९८०-९० च्या दशकात बहुतांश मराठी वाचक विज्ञान जगतातील घडामोडींशी अनभिज्ञ होते. अशा काळात विज्ञान कथेला मराठी साज देऊन त्यांनी विज्ञानातील शोधप्रक्रिया घराघरांत पोचवली. भारतीय नेपथ्य लाभलेल्या या कथा वाचकांना आपल्या आसपास घडत असल्याचा भास झाला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळख असणारे डॉ. नारळीकर म्हणूनच विज्ञान लेखक म्हणून मराठी वाचकांना अधिक जवळचे वाटू लागले. डॉ. नारळीकर यांनी वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये वैज्ञानिक माहितीपर आणि ललित लेखही लेख लिहिले. विज्ञानाची गरुडझेप, अंतराळ आणि विज्ञान, याला जीवन ऐसे नाव हे त्यांचे लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत.
खगोलशास्त्राची परिपूर्ण माहिती देणारे आणि उत्तम निर्मिती मूल्य असणारे आकाशाशी जडले नाते या त्यांच्या पुस्तकाने तर कमालच केली. विश्वातील विविध घटक आणि घटना यांसोबत खगोलशास्त्राबद्दलची शास्त्रीय माहिती त्यांनी या पुस्तकातून मांडली. गरज असेल तिथे सोप्या पद्धतीने मांडलेल्या गणिताचाही आधार घेतला. दर्जेदार छपाईमुळे किंमत तुलनेने अधिक असली तरी मराठी वाचकांचा या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील विद्यार्थीच नाही, तर सर्वसामान्य वाचकांचेही आकाशाशी नाते जडवण्यामागे या पुस्तकाचे मोठे योगदान आहे.
वाराणसी, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे या चार नगरांमधील त्यांच्या आयुष्याचा पट हा विसाव्या शतकातील पाश्चिमात्य आणि भारतीय विज्ञानाच्या तत्कालीन स्थितीचे दर्शन घडवतो. वाचकांची विशेष पसंती लाभलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला २०१५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. कंटाळवाण्या व्याख्यानात हौस म्हणून लिहून काढलेल्या कथेपासून सुरू झालेला त्यांचा लेखन प्रवास साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत येऊन पोचला आहे. मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्य हा प्रकार प्रचलित होण्यामागे डॉ. नारळीकरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
वैज्ञानिक आणि साहित्यिक प्रवासात डॉ. नारळीकर यांना त्यांच्या दिवंगत पत्नी मंगलाताई यांची खंबीर साथ लाभली होती. स्वतः गणितज्ज्ञ असताना कौटुंबिक जबाबदारी पेलत त्यांनी डॉ. नारळीकर यांच्या साहित्यिक प्रवासात सक्रिय सहभाग घेतला. डॉ. नारळीकरांच्या लेखनाच्या पहिल्या वाचनापासून, पुनर्लेखन आणि योग्य त्या ठिकाणी मंगलाताईंनी केलेल्या सूचनांमुळे लिखाण प्रभावी होऊ शकले, असे डॉ. नारळीकर यांनी नमूद केले आहे.
डॉ. नारळीकर यांच्या विज्ञाननिष्ठ कार्याचा देश- विदेशात अनेक पुरस्कारांनी यथोचित सन्मानही झाला आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पद्मा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान पदमविभूषण, पदमभूषण, राज्य शासनाकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोतर्फे देण्यात येणारा कलिंग पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, फ्रेंच अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा पुरस्कार, बी. एम. बिर्ला पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार, त्यांच्या कथा- कादंबऱ्यांना मिळालेले राज्य शासनाचे पुरस्कार हे त्यांतील काही उल्लेखनीय.
——