मयुरेश प्रभुणे
डिस्कव्हरी
आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींकडे आपण विशेष कुतूहलाने पाहत नाही. मात्र, त्या गोष्टींशिवाय आयुष्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. कोणत्याही पदार्थाचे किंवा वस्तूचे रूप उठावदार किंवा वैशिष्ट्यपूर्ण करण्यात ज्याची महत्वाची भूमिका असते तो रंग हा त्यातीलच एक. आपल्या आसपास क्वचित एखादी वस्तू किंवा पदार्थ सापडेल ज्याला रंग नाही. घरापासून गाडीपर्यंत आणि कपड्यांपासून आपल्या रोजच्या वापरातल्या सर्व वस्तूंना कोणता ना कोणता रंग दिलेलाच असतो. रंग हा मूळचा निसर्गाचा महत्वाचा भाग. दगड, मातीपासून फळे, फुले, किटक, प्राणी, पक्षी सर्वच सजीव- निर्जीव घटकांना स्वतःचा असा रंग असतो. मात्र, माणसाने जेव्हापासून प्राण्यांपेक्षा वेगळी अशी स्वतःची जीवनशैली तयार केली तेव्हापासून, त्याला कृत्रिमरीत्या रंग बनवण्याची आवश्यकता भासू लागली.
गेल्या पंधरा वर्षांत पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून माणूस सुमारे एक लाख वर्षांपेक्षा जास्त काळापासून रंग तयार करत असल्याचे पुरावे सापडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुफांमध्ये शास्त्रज्ञांना आदिमानवाचे रंग तयार करण्याचे साहित्य सापडले. दिवाळीतील किल्ल्यांना आपण ज्या लाल रंगाच्या कावचा लेप देतो, त्या कावचे तुकडे, काही शिंपले, तसेच यांचे मिश्रण कुटण्यासाठीचे दगड असे सगळे साहित्य या गुहेत मातीखाली एकत्रितपणे सापडले. माशांच्या हाडांमधील तेलामध्ये किंवा मधाच्या पोळ्यातील मेणामध्ये मिसळून हे रंग चित्र काढण्यासाठी किंवा अंगावर फासण्यासाठी त्या काळचा आदिमानव वापरत असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
पुढे संस्कृतीचा विकास सुरु झाला तेव्हा चिनी, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन अशा सर्वच लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात रंगाचा वापर सुरु केला. शिंपले, गारगोट्या, वाळू, फुले, पाने, फळे, नीळ, चुना असे अनेक पदार्थ रंग तयार करण्यासाठी वापरले जाऊ लागले. या रंगांचे मिश्रण तयार करण्यासाठी, तेल, मेण, डींक किंवा चक्क कच्चे अंडेही वापरले जात असे. भारतात ऐतिहासिक गुहांमध्ये साकारण्यात आलेल्या चित्रांमध्ये अशाच प्रकारच्या नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता.
आधुनिक पद्धतीने रंग बनवण्याचे तंत्र इसवीसन १७०० पासून विकसित झाले. अमेरिकेत बॉस्टन येथे थॉमस चाईल्ड याने रंगासाठी आवश्यक घटक दगडांनी दळण्याची पहिली गिरणी सुरु केली. १८६५ मध्ये डी. पी. फ्लीन याला कृत्रिम रंग बनवण्याचे पहिले पेटंट मिळाले. झिंक ऑक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, रेझीन, दूध आणि जवसाच्या तेलाचे मिश्रण करून कृत्रिम रंगाचे द्रावण (पेंट) तयार करण्यात फ्लीनला यश आले. रसायनशास्त्रातील नव्या शोधांमुळे रंग तयार करण्याच्या तंत्रात विसाव्या शतकात अनेक बदल झाले. नैसर्गिक घटकांसोबत प्रयोगशाळेत तयार केलेल्या रसायनांचा रंग तयार करण्यासाठी उपयोग होऊ लागला. कृत्रिम रंगांमध्ये सर्वसाधारणपणे रंगद्रव्य, द्रावक, रेझीन आणि गरजेनुसार अनेक प्रकारची द्रव्ये मिसळलेली असतात.
आज एकविसाव्या शतकात भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्रात झालेल्या प्रगतीनुसार गरजेप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण रंगांची निर्मिती करण्यात येते. यात मूळच्या रंगद्रव्यांसोबत आवश्यकतेनुसार वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मिसळले जातात. रात्रीच्या वेळी अंधारात दिसणारे बोर्ड किंवा प्रकाश पडल्यावर चमकणारे रस्त्यांवरील पट्टे, पाण्याला टिकून न देणारे खास पावसाळी हवामानातील घरांना देण्यात येणारे रंग, तापमानानुसार रंग बदलणारे पेंट, इतकेच काय चोरांना भिंतीवर चढता येऊ नये यासाठी हात घसरतील असे रंगही विकसित करण्यात आले आहेत. चित्रे रंगवण्यासाठी खडू, वॉटर कलर, ऑइल पेंट किंवा पेनच्या स्वरूपात रंगांना अगदी कोणालाही वापरता येईल अशा स्वरूपात आणण्यात तंत्रज्ञानाला यश आले आहे. डिजिटल युगात प्रिंटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांच्या द्रावणातून किंवा पावडर मधून आपल्याला प्रत्यक्ष दृश्याची हुबेहूब प्रतिमा जशाच्या तशा रंगांत साकारणे शक्य झाले आहे. आपले आयुष्य रंगीत बनवणारे रंगही आता तंत्रज्ञानाच्या विकासासोबत स्मार्ट होऊ लागले आहेत.
——————-