रात्रीच्या मोकळ्या आणि निरभ्र आकाशाकडे तुम्ही बघितले तर सुमारे दर ५ ते ६ मिनीटानी आकाशाच्या कुठल्यातरी भागात एखादी उल्का आपल्याला दिसतेच. असं वाटत की जणू काही या हजारो ताऱ्यातील एक तारच निखळून पडला आहे. पण तस अजिबात नसत.
उल्का म्हणजे काय तर सूर्यमालेत स्वच्छंद फिरत असलेला एखादा लहान खडा चुकून पृथ्वीच्या वाटेत येतो. हा खडा अगदीच लहान आकाराचा असतो सुमारे वाटण्याच्या आकाराचा. पण जेव्हा हा खडा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याची पृथ्वीच्या सापेक्ष सुमारे १२ ते ७२ किलो मीटर दर तासाला इतकी जास्त असते. तर या खड्याची पृथ्वीच्या वाताराणातील घर्षण होउन इतकी उर्जा निर्माण होते की तो खडा अक्षरशः पेटच घेतो. आणि यालाच आपण उल्का म्हणून ओळखतो. पृथ्वीच्या भूतला पासून सुमारे १५० किमी उंचीवर असताना हा खडा प्रज्वलीत होतो आणि भूतला पासून त्याची उंची १०० किमी खाली येई पर्यंत तो जळून खाक झालेला असतो. त्याचा धूर किंवा अवशेष पृथ्वीचा वातावरणात मिसळून गेलेले असतात. काही वेळा अस ही घडतं की एखाद्या रात्री आपल्याला एकाच दिशेने अनेक उल्का येताना दिसतात.
अशा निरिक्षणांची सर्व प्रथम नोंद १३ नोव्हेंबर १८३३ रोजी सूर्योदयास ४ तास शिल्लक असताना – म्हणजे १२ तारखेच्या रात्री मध्य रात्र उलटून गेल्यावर सुमारे दोन वाजता, उत्तर अमेरिकेत घेण्यात आली होती. ही जणु काही आकाशातील आतिषबजीच होती. झोपलेली लोक ही आतिषबाजी बघण्यास घरा बाहेर आले होते. यांच्यात एक होता डेनिसन ऑमस्टेड. त्याच्या अस लक्षात आल की या उल्का सिंह तरका समुहाच्या दिशेनेच येत आहेत. पुढे त्याने इतर गावात जाऊन पण तिथे झालेल्या निरिक्षणांची नोंद घेतली. अंती त्याने निष्कर्ष काढला की या कालावधीत सुमारे एक लाख पन्नास हजार उल्का पडल्या होत्या. त्याने आपल्या निरिक्षणांचा अहवाल बनवला आणि त्यात त्याने एक कयास मांडला की या उल्कांचा उगम अंतराळाती एखाद्या धूली कणांच्या ढगातून होत असावा. हा ढगाची रचना काय असावी या बद्दल मात्र त्याने काही भाष्य केले नव्हते.
अशीच घटना मग बरोबर ३३ वर्षांनी परत झाली. पुढे दोन गोष्टी निदेशनास आल्या एक म्हणजे ही घटना बरोबर ३३ वर्षांनी परत परत घडत आहे दुसरी म्हणजे या घटनेचा संबंध टेंपल-टटल नावाच्या धुमकेतू्च्या सूर्या जवळून जाण्याशी होता. असं लक्षात आल की जेव्हा एखाद धूमकेतू सूर्याची परिक्रमा करून जातो तेव्हा तो आपल्या माग लहान लहान धूली कणांचा पसारा सोडत जातो.
हे कण देखील त्या धूमकेतूच्या कक्षेतून प्रवास करत असतात. आता जर धूमकेतूची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एक मेकांना छेदत असेल तर जेव्हा त्या छेद बिंदू वर पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीवर या धूलीकणांचा मारा होतो आणि आपल्याला एकाच दिशेन अनेक उल्का उगम पावताना दिसतात. अनेक निरिक्षणांनंतर आणखीन अशा प्रकारच्या उल्का वर्षावांचा शोध लागत गेला. खगोलनिरिक्षणांत उल्का वर्षांवाचा अभ्यासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. आता पृथ्वीच्या आणि धूमकेतूंच्या कक्षा बदलत नसल्या मुळे पृथ्वी त्यांच्या छेद बिंदू वर दरवर्षी त्याच ठराविक दिवशीच पोचते. म्हणजे असं की सिंह तारकासमुहातील उल्का वर्षाव हा नोव्हेंबर १७ – १८ रोजीच जास्त तीव्र असतो.
या अभ्यासातत हौशी आकाशनिरिक्षकांचा मोठा सहभाग होता. अशी निरिक्षणे घेण्यास लागणारी साधने खुपच कमी आणि ती सर्व आपल्याजवळ आधीपासूनच असतात. आपले डोळे (एक सुद्धा चालेल), लिहायला वही आणि पेन किंवा पेंन्सिल, रात्री थंडीवाजूनये म्हणून काही गरम कपडे, रात्र भर जागरण करायची तयारी, प्रवास करण्याची तयारी आणि महत्वाचे म्हणजे चिकाटी असेल तर कोणालाही यात भाग घेता येतो. चिकाटी का – तर अंधाऱ्या रात्री १ मिनिटाचा कालावधी खूप जास्त वाटू शकतो.
तर
सिंह तारका समुहातील उल्का वर्षाव हा १९९८ साली १७ नोव्हेबर च्या रात्री खूप तीव्र असणार आहे हे आपण जाणून होतो कारण त्याच वर्षी टेंपल टटल धूमकेतू सूर्याची परत एक प्रदक्षिणा करून जाणार होता. ही संधी साधून आम्ही उल्का निरिक्षकांचा एक गट तयार करण्याचे ठरवले. तेव्हा मी आयुकात विज्ञान प्रसार अधिकारी होतो.
उल्कावर्षांवाचे शास्त्रीय निरिक्षण कसे करायचे हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हते. आणि तस सांगणार ही कोणी नव्हतं. मग आम्ही एक युक्ती केली. उल्का वर्षांवांची निरिक्षणे कशी करायची या बद्दल इंटरनेट वर असलेल्या माहीतींचा शोध घेतला. अस ही लक्षात आलं की त्या पण काही विसंगती होत्या. मग आम्ही ठरवलं की फक्त इंटरनॅशनल मिटीयोर ऑर्गनायझशन (आय एम ओ) वर दिलेली माहितीच फक्त घ्यायची. एव्हाने माझं उल्का वर्षांवांच्या संदर्भात बरच वाचन झाल होतं. हि तयारी झाल्या वर मग आम्ही पुण्यातील खगोलप्रेमीना या निरिक्षण मोहिमेत भाग घेण्याचे जाहीर आव्हान दिले. आणि एका रविवारी त्यांची सभा घेतली. ७० एक लोक जमली होती. त्यात उल्का वर्षाव म्हणजे काय याची माहीती दिली व १७ नोव्हेबर १९९८च्या उल्का वर्षावाची शास्त्रिय पद्धतीने नोंद घेण्यासाठी हा गट आपण तयार करत आहोत याची माहिती दिली.
या निरिक्षण गटाचे सदस्य होण्याची एकच अट होती आणि ती म्हणजे दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ३ वाजता या गटाची बैठक होईल आणि त्यास सर्वांनी हजर राहीलेच पाहीजे. जी व्यक्ती २दा पूर्व सुचना न देता गैर हजर राहील त्यानी पर यायचेच नाही. काही कारणांमुळे (म्हणजे परिक्षा किंवा सण वगैरे) जर एखाद्या शनिवारी बहुतेक जणाना शक्य नसेल तर मग सगळ्यांच्या संम्मतीने दुसरी तारीख निवडता येईल.
त्या नंतर पहिल्याच मीटिंग पासून आम्ही आय एस ओ मधून मिळालेल्या माहितीचे जाहीर वाचन सुरू केले. प्रत्येकाने एक पॅरेग्राफ वाचायचा व त्यावर चर्चा करायची. हा परिच्छेद जर सर्वांना कळाला तरच पुढे जायचे. तसेच जर याचे समाधान कारक उत्तर सापडले नाही तर मग तो प्रश्न माहितगारांना विचारायचा. इथे आम्ही लहान-मोठ असा भेद भाव ठेवला नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या पहिल्या नावानेच ओळखायच – त्या सर किंवा मॅडम अशी संबोधने लावायची गरज नाही.
हे काही नियम फक्त अनेक वर्ष आम्ही हौस म्हणून आकाश निरिक्षणाचा छंद साभाळून आहोत अशा लोकाना फार पचणारे नव्हते. आपेक्षे प्रमाणे पहिल्या दोनच महिन्यात बरेचसे गळाले. शेवटी आमचा १५-१६ जणांचा गट तयार झाला.
आमचा अभ्यास सातत्याने चालू होता. आय एम ओ ने दिलेली माहिती वाचून झाल्यावर मग आम्ही आता निरिक्षणांचा सराव घेण्याच सज्ज झालो होतो. मग खुद्द वेगवेगळ्या उल्का वर्षांवाची निरिक्षणे घेतली. कोणी काय चुका केल्या या बद्दल सर्व जण चर्चा करायचे. पावसाळ्याचे दिवस आल्यावर निरिक्षणे थांबवून परत वाचन सुरू केले. दोन गट पाडून एक मेकांना प्रश्न विचारण्याचे कार्यक्रम घेतले. एकूण तयारी चांगली होत होती.
खुद्द निरिक्षणासाठी आम्ही सज्जन गड ही जागा निवडली. एक दिवस तिथे जाउन या उल्का वर्षावाची निरिक्षणे घेण्यास आम्हास तिथे राहण्याची परवांगी घेतली.
उल्का वर्षावाची माहिती देणारी एक छोटी पुस्तिका पण आयुकात तयार करण्याता आली आणि एके दिवशी पत्रकार परिषद घेऊन ही माहीती प्रसार माध्यामांना पण दिली.
आम्ही पहिली निरिक्षणे १६ नोव्हेंबरच्या रात्री घेतली. हा एक सराव तर होताच पण त्याच बरोबर शास्त्रिय पद्धतीने नोंद घेतल्या मुळे ही निरिक्षणे मह्त्वाची ठरली. तसेच १७च्या रात्री आणखीन काय काळजी घेता येईल याचा पण सराव झाला. त्या रात्री सर्वानी उत्तम प्रकारे निरिक्षणे नोंदवली. या निरिक्षणांची गम्मत म्हणजे शेवटी शेवटी उल्कां इतक्या जास्त संख्येने येउ लागल्या की शेवटी आणि निरिक्षणे घेण्याचे थांबवून तो वर्षाव बघण्याचा आनंद लुटला. पण जेव्हा उजाडू लागलं तेव्हा मात्र आय एम ओ ला पाठवण्याचे फॉर्म भरूनच निरिक्षणांचा शेवट केला.
त्या वेळेसच्या पुणे आकाशवाणीच्या संचालिका उषःप्रभा पागे यांनी यात खूपच रस घेतला होता. त्या रात्री त्या आणि त्यांचे सहाकारी गडावर आहे होते. त्यांनी आमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित केल्या. त्या रात्री कमालीची थंडी होती. जेव्हा ऋषिकेश कुलकर्णी आपली प्रतिक्रिया नोंदवायला आला तेव्हा तो खूप थरथरत होता – त्याचं हे अस थरथरणं हे आनंदा मुळे जास्त होतं की थंडी मुळे हे त्यालाच कळ नव्हतं.
तसेच दुसरे दिवशी सकाळी त्यानी आयुकाचे संचालक प्रा. नारळीकर यांची ही प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित करून एक कार्यक्रम पण प्रसारित केला होता.
या सर्वातून आम्ही काय मिळवलं – आम्ही अनेक गोष्टी शिकलो त्यातली मुख्य म्हणजे सर्व निरिक्षण ही विज्ञानाच्या चौकटील बसवूनच करणाऱ्यांचा एक चांगला गट तयार झाला. तसेच हे पण आम्ही दाखवून दिलं की खगोलनिरिक्षणांसाठी महागड्या दुर्बिणींची गरज असतेच अस नाही. तुम्ही नुसत्या डोळ्यानी कुठलही उपकरण न वापरता हा छंद जोपासू शकता.
या निरिक्षणात भाग घेतलेल्या काहींचा उल्लेख करायचा तर – विनया कुलकर्णीची मला खुप मोठी मदत झाली होती – तसेच निलेश पुंणतांबेकर, मयुरेष प्रभुणे, अमृता मोदानी, विनीत कुलकर्णी, यशोधन गोखले अशा किती तरी जणांची साथ होती.