Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

आयसरच्या शास्त्रज्ञांचा ‘पद्म सन्मान’

Posted on February 5, 2023February 5, 2023 by sanshodhanindia

संशोधन, ५ फेब्रुवारी २०२३ 

आयसरमधील मानद शास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण, तर संस्थेचे पहिले संचालक प्रा. के. एन. गणेश यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला. भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित बोल्ट्झमन पारितोषिकाचे मानकरी असणारे प्रा. धर आणि पुणे, तसेच तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्चची (आयसर) उभारणी करणारे प्रा. गणेश यांची पद्म पुरस्कारांसाठी झालेली निवड यथोचित अशीच आहे. 

पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आयसर पुणेशी संबंधित या दोन्ही शास्त्रज्ञांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आयसर पुणेचे संचालक प्रा. जयंत उदगावकर, प्रा. श्रीनिवास होथा, प्रा. अंजन बॅनर्जी यांसह आयसरमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. दीपक धर

प्रा. धर हे भारतातील प्रसिद्ध सिद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ असून, त्यांचे संशोधन प्रामुख्याने भौमितिक रचनांची कार्यप्रणाली, काच व चुंबक यांमधील रचनांचा सखोल शास्त्रीय अभ्यास यावर आहे. भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित बोल्ट्झमन पुरस्कार मिळवणारे प्रा. धर हे पहिलेच भारतीय आहेत. प्रा. धर यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे झाला. त्यानंतर आयआयटी कानपूर येथून त्यांनी १९७० मध्ये पदवी व १९७२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच १९७८ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) येथून पीएचडी प्राप्त केली.  

त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) संशोधनाला सुरुवात केली. २०१६ पासून ते आयसर पुणे येथे कार्यरत आहेत. आपली विज्ञान विषयक आवड वडिलांमार्फत निर्माण झाल्याचे प्रा. धर सांगतात. १९७८ मध्ये टीआयएफआरमध्ये सहकारी मुस्तान्सिर बर्मा यांच्यासोबत त्यांनी सांख्यिकीय भौतिकशास्त्रामध्ये संशोधन सुरु केले. वाढत्या वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये तयार झालेले नमुने समजून घेण्याच्या संशोधनात त्यांनी मोलाची कामगिरी केली. क्लस्टर गणनेच्या समस्यांवर देखील त्यांनी महत्वाचे संशोधन केले आहे. 

पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दलची प्रतिक्रिया देताना प्रा. धर म्हणाले, “आम्ही (शास्त्रज्ञ) कधीही पुरस्कारांसाठी संशोधन करीत नाही. परंतु, असे पुरस्कार संशोधकांसाठी उत्साहवर्धक व प्रेरणादायी असतात, आपल्या कामाची दखल घेतली जाते याचा आनंद असतोच.” 

प्रा. के. एन. गणेश

प्रा. के. एन. गणेश हे सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ, तसेच आयसर पुणेचे माजी आणि आयसर तिरुपतीचे संस्थापक संचालक आहेत. डीएनएची रासायनिक तत्त्वे आणि त्याच्या संरचनेच्या विविध पैलूंवर प्रा. गणेश यांचा अभ्यास आहे. डीएनए ॲनालॉग्स, कोलेजन पेप्टाइड्सची रचना आणि डीएनए नॅनोटेक्नॉलॉजीवरदेखील त्यांनी संशोधन केले आहे. पेप्टाइड न्यूक्लिक ॲसिडची रचना हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख कार्य आहे. प्रा. गणेश यांनी १९७० मध्ये बंगळुरू विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी आणि १९७२ मध्ये एमएस्सी पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून १९७७ मध्ये त्यांनी पीएचडी प्राप्त केली.

पुढे कॉमनवेल्थ फेलोशिप अंतर्गत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून दुसरी पीएचडी प्राप्त केली. भारतात परतल्यावर त्यांनी १९८१ मध्ये हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये (सीसीएमबी) देशातील पहिली डीएनए संश्लेषण सुविधा स्थापन केली. तब्बल पाच दशकांचा काळ त्यांनी विज्ञान संशोधन केले आहे. १९७२- १९७७ च्या दरम्यान त्यांनी दिल्लीमध्ये लाख रेझिन्सच्या रचनेवर काम केले. मॅन्युअल डीएनए सिंथेसायझर्स आणि फ्लोरोसेंट प्राइमर्स या संशोधनांमध्येही त्यांचे मोलाचे योगदान आहे. प्रा.गणेश यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक सन्मान मिळाले आहेत. आत्तापर्यंत ४९ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडीसाठी मार्गदशर्न केले आहे.

सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. गणेश म्हणाले, “सध्याच्या काळात उत्साही व विज्ञानाची आवड असणारे शिक्षक जास्त प्रमाणात आढळून येत नाहीत. असे शिक्षक शोधणे, त्यांना संस्थेत वाव देणे आणि टिकवून ठेवणे हे आव्हान असते. पद्मश्री जाहीर झाल्यामुळे कुटुंबासह सहकारी, विद्यार्थी अशा सर्वांनाच आनंद झाला आहे. या पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे असे वाटते.”

 ——————

Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme