Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

चांद्रयान ३ मोहिमेतून भारत घडविणार इतिहास

Posted on July 13, 2023July 13, 2023 by sanshodhanindia

सोनल थोरवे, संशोधन, १३ जुलै २०२३

सप्टेंबर २०१९ मध्ये चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी चांद्रयान ३ मोहिमेची आखणी करण्यात आली. चार वर्षांमध्ये ६१५ कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेली ही मोहीम आता श्रीहरीकोटा येथून उड्डाणासाठी सज्ज आहे. १४ जुलैला दुपारी २:३५ ला श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून चांद्रयान ३ चे प्रक्षेपण होईल.    
चांद्रयान ३ मोहीम चांद्रयान २ या मोहिमेपेक्षा वेगळी आहे. चांद्रयान ३ चे तीन प्रमुख भाग आहेत- विक्रम लॅण्डर, प्रग्यान रोव्हर आणि प्रोपल्जन मॉड्यूल. चांद्रयान २ मोहिमेतील ऑर्बायटर चंद्राभोवती कार्यरत असल्याने चांद्रयान ३ मोहिमेत ऑर्बायटरचा समावेश करण्यात आलेला नाही. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या साह्याने करण्यात येईल. चांद्रयान ३ मोहिमेची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये इस्रोने निश्चित केली आहेत. १) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे यान उतरवणे  २) चंद्राच्या भूमीवर रोव्हर चालवणे ३) चंद्राच्या जमिनीवर शास्त्रीय प्रयोग करून त्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे. 


चांद्रयान ३ मोहिमेचे महत्व काय?  

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, यूएसएसआर, चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरेल. तसेच, मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम फक्त भारतासाठीच नाही, तर जगासाठी महत्वाची आहे. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असल्याचे पुरावे भारताच्या चांद्रयान १ मोहिमेला मिळाले होते. त्या पाण्याचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी चांद्रयान ३ मोहीम महत्वाची ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील दगड, मातीमध्ये सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील घटनांचे पुरावे दडलेले आहेत असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे या अभ्यासाचे महत्व खगोल शास्त्रज्ञांसाठी देखील आहे. २०२५ मध्ये चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्याची योजना अमेरिकेच्या नासा या संस्थेने आखली आहे. आर्टेमिस नावाचे हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे चांद्रयान ३ कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग चंद्रावर माणसांना उतरवण्यासाठी होईल.

चांद्रयान २ च्या अपयशाचे धडे 

चांद्रयान ३ मोहीमेची आखणी करतानाच चांद्रयान २ मोहिमेतील उणिवा दूर करण्याला इस्रोने प्राधान्य दिले. चंद्रावर यान उतरण्याच्या अपेक्षित जागेची सीमा ५०० चौरस मीटरवरून ४ किमी बाय २.४ किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. जागेच्या या विस्तारामुळे यानाच्या चंद्रावर उतरण्याच्या जागेवर मर्यादा न राहता यानाकडे चंद्रावर उतरण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध राहतील. चांद्रयान ३ ची इंधन क्षमता वाढवण्यात आली असून, यानाला जागा शोधण्यासाठी वेळ लागल्यास अतिरिक्त इंधनाचा उपयोग होईल. विक्रम लॅण्डर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने चंद्रावर उतरले, तरी यान सुरक्षित राहावे म्हणून लॅण्डरचे चार पाय अधिक मजबूत करण्यात आले आहेत. चांद्रयान ३ ला चंद्रावर अलगद उतरवण्यासाठी आता चार इंजिनांच्या उपयोग करण्यात येईल. सलग १४ दिवस लॅण्डरने आपले शोधकार्य सुरु ठेवावे यासाठी त्यावरील सोलार पॅनलचा विस्तार वाढवण्यात आला असून अखंड संपर्कासाठीच्या अँटेनाची संख्याही वाढवण्यात आली आहे.चांद्रयान २ मधील विक्रम लॅण्डरला आलेले अपयश हे प्रामुख्याने ‘सॉफ्टवेअर ग्लीच’मुळे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चांद्रयान ३ वरील सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. चांद्रयान ३ स्वयंचलित स्थितीत असताना चुका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. चांद्रयान २ ने टिपलेली छायाचित्रे चांद्रयान ३ च्या मेमरीमध्ये आधीच टाकण्यात आली असून, पूर्वीच्या छायाचित्रांचा आधार घेऊन चांद्रयान ३ च्या कॅमेराच्या साह्याने चंद्रावर उतरण्याची जागा निश्चित करण्यात येईल. 

मोहिमेचा कालावधी: एक चांद्र दिवस (पृथ्वीवरील १४ दिवस)

चंद्रावर उतरण्याचे ठिकाण: ६९.३६७६२१ दक्षिण, ३२.३४८१२६ पूर्व, चार किमी बाय २.४ किमीचे क्षेत्र 

यानाचे वजन: लॅण्डर: १७५२ किलो ( २६ किलो वजनाच्या प्रग्यान रोव्हरसह), प्रोपल्जन मॉड्यूल: २१४८ किलो. एकूण वजन ३९०० किलो – एलव्हीएम ३ रॉकेट: उंची ४३.५ मीटर, वजन ६४२ टन       
मोहिमेचा अपेक्षित घटनाक्रम:
पृथ्वीभोवतीचा टप्पा
  – १४ जुलै दुपारी २:३५ ला श्रीहरीकोटाच्या दुसऱ्या लाँचपॅडवरून प्रक्षेपण- १६ मिनिटांमध्ये एलव्हीएम ३ रॉकेटमधून चांद्रयान ३ विलग होऊन पृथ्वीभोवती १७० बाय ३६५०० किमीची दीर्घ वर्तुळाकार कक्षा प्राप्त करील- पुढील काही दिवसांत यानाची पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यानाला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल.

चंद्राभोवतीचा टप्पा – प्रोपल्जन मॉड्यूलच्या साह्याने चंद्राजवळ पोचल्यावर यानाला चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. – दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्या टप्प्याने कमी करून अंतिमतः चांद्रयान ३ ला चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल- २३- २४ ऑगस्टला (किंवा सप्टेंबर अखेरीस) प्रोपल्जन मॉड्यूलपासून विलग झालेले लॅण्डर चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्या टप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडेल.

चांद्रयान ३ मधील उपकरणे आणि त्यांचे कार्य –

लॅण्डरवरील उपकरणे: १) रंभा एलपी: चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची (आयन आणि इलेक्ट्रॉन) विविध वेळांमध्ये घनता तपासणे.  २) चास्ते: चंद्राच्या ध्रुवानजीकच्या प्रदेशाचे औष्मिक गुणधर्म तपासणे.  ३) इल्सा: स्थानकाच्या भागातील भूकंपांच्या नोंदी घेऊन चंद्राच्या कवचाचा अंदाज बांधणे.  
रोव्हरवरील उपकरणे: १) एपीएक्सएस: चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म तपासणे आणि खनिजांचा अभ्यास करणे. २) लिब्स: चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा शोध घेणे 
प्रोपल्जन मॉड्यूलवरील उपकरण: शेप: चंद्राभोवतीच्या कक्षेतून निअर इन्फ्रारेड लहरींमध्ये पृथ्वीच्या नोंदी घेऊन बाह्यग्रहांच्या शोधासाठी मार्गदर्शक प्रणाली विकसित करणे.  
————-

Please follow and like us:
error
fb-share-icon
Tweet
fb-share-icon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme