२ ऑक्टोबर २०१७
मुंबईत २९ ऑगस्ट रोजी झालेल्या तुफान पावसादरम्यान ९ किलोमीटर उंचीच्या ढगावरून सोशल मीडियावर बरंच ट्रोलिंग झालं. ढगांची उंची कोणी आणि कशी मोजली इथपासून ते अनेक जोक्सच्या स्वरूपात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ढग खरंच इतके उंच असतात का आणि ते कसे मोजतात हा प्रश्न मात्र ट्रोलिंग मध्ये अनुत्तरित राहिला.
सध्या परतीचा पाऊस सुरु आहे आणि पूर्व मोसमी पावसाप्रमाणेच विजांच्या कडकडाटासह मध्य आणि दक्षिण भारतात हा पाऊस हजेरी लावतो. या पावसादरम्यान ९ काय अगदी १४ किलोमीटर उंचीचेही ढग तयार होत असतात. मॉन्सून काळात कमी दाबाची क्षेत्रे, वाऱ्यांची चक्राकार स्थिती अशा वातावरणीय घटनांमध्ये उंच ढगांची निर्मिती होत असते. मॉन्सूनच्या प्रवाहासोबत समुद्रावरून येणारे ढग हे समुद्रसपाटीपासून साधारणतः एक ते सहा किलोमीटर उंचीच्या दरम्यान असतात. मात्र एखादे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास किंवा दोन विरुद्ध दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांचे एकत्रीकरण झाल्यास हे ढग वातावरणात आणखी वर चढून दहा ते बारा किलोमीटर आणि काही वेळा पंधरा किलोमीटरची उंचीही गाठतात. जमिनीजवळचा तळ एक ते दोन किलोमीटरच्या आसपास राहून दहा किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा उंच वाढलेला ढग हा कमी कालावधीत मोठा पाऊस देऊ शकतो. ढगफुटीच्या घटनांनाही असेच उंच ढग कारणीभूत असतात. मात्र, असे उंच ढग निर्माण होण्याची प्रक्रिया ही मॉन्सून काळापेक्षा पूर्वमोसमी पावसादरम्यान किंवा परतीच्या पावसादरम्यान अधिक घडते. हे ढग उंच वाढत असताना त्यांच्यामधून विजांचीही निर्मिती होते.
जमिनीजवळून वातावरणात उंच वाढलेल्या ढगांना ‘क्युमुलोनिंबस’ म्हणतात. हे ढग वादळी पावसासाठी कारणीभूत ठरतात. बहुतेक वेळा स्थानिक पातळीवर तापमान वाढून या ढगांची निर्मिती होते. त्यामुळे या ढगांखाली असणाऱ्या भागावर मोठा पाऊस होतो, मात्र जवळचा दुसरा भाग मात्र कोरडा ठणठणीत असतो. पूर्व मोसमी किंवा परतीच्या पावसादरम्यान आपल्याला असा अनुभव येतो. पुण्याच्या एका भागात मुसळधार पाऊस होत असताना दुसऱ्या भागात मात्र तुरळक सरी पडतात किंवा पाऊसही पडत नाही. अशावेळेस हा पाऊस ‘क्युमुलोनिंबस’ ढगामुळे मिळाल्याचे समजून घ्यावे. बऱ्याचदा क्षितिजाजवळ अशा उंच वाढणाऱ्या ढंगाची निर्मितीही आपल्याला पाहता येते.
ढगांची उंची किती आहे त्यावरून त्यांपासून किती पाऊस मिळेल याचा अंदाज बांधता येत असतो. ढग जितका उंच तितके त्यामधील पाण्याचे प्रमाण अधिक आणि त्यापासून मिळणारा पाऊस अधिक असा सरळ अंदाज बांधता येतो. ढगांची उंची मोजण्यासाठी दोन प्रमुख पद्धती वापरल्या जातात- सॅटेलाईट इमेज आणि रडार इमेज.
१) सॅटेलाईट इमेज- उपग्रहांवर बसलवलेल्या सेन्सरच्या माध्यमातून ढगांच्या विशिष्ट भागाकडून येणाऱ्या लहरींच्या तरंगलांबीवरून त्या ढगाच्या त्या भागाचे तापमान किती हे समजते. ढग वातावरणात जितका उंच वाढलेला असेल, तेवढे त्याचे तापमान कमी. सॅटेलाईट इमेजला विविध रंग देऊन त्या ढगाच्या विविध भागांचे तापमान आणि त्याला अनुसरून उंची किती हे सहजपणे निश्चित करता येते. अशा इमेजवरून उंच वाढलेला ढग शोधून त्या खाली असणाऱ्या भागामध्ये किती पाऊस पडत असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
२) डॉप्लर रडार इमेज- डॉप्लर रडारमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोन्हींचा समावेश असतो. ट्रान्समीटरच्या माध्यमातून मायक्रोवेव्ह रेडिओ लहरी आकाशात सोडल्या जातात. या लहरी ढगांवर किंवा पाण्याच्या थेंबांवर धडकून पुन्हा काही ऊर्जा परावर्तित करतात. या परत आलेल्या लहरी रिसिव्हरद्वारे पकडून आलेल्या माहितीचा नकाशा बनवला जातो. दर काही मिनिटाला ३६० अंशांमधून अशा लहरी उत्सर्जित केल्या जातात आणि पकडल्या जातात. डॉप्लर रडारद्वारे ढगांची उंची, व्याप्ती त्यामध्ये असणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी कालावधीत समजते. त्यामुळे ढगांची वरच्या दिशेने होणारी वाढ किंवा जमिनीला समांतर होणारी हालचाल लगेच लक्षात येते. कमी कालावधीतील पावसाचा अचूक अंदाज देण्यासाठी डॉप्लर रडार हे उत्तम साधन आहे.
२९ ऑगस्टला मुंबईत झालेल्या पावसादरम्यान नऊ किलोमीटरउंचीपर्यंत वाढलेले ढग रडारच्या इमेजमध्ये स्पष्ट दिसून येत होते. हीच माहिती हवामान शास्त्रज्ञांनी प्रशासनाला सांगितली. मात्र, ढगांचे विज्ञान आणि त्यांचे निरीक्षण करण्याचे तंत्र याच्याशी आपली ओळख नसल्यामुळे हाच विषय विनोदाचा बनला.
—–
Please follow and like us: