Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

पाककृतींसाठी एआय तंत्रज्ञान 

– प्रा गणेश बागलेर (आयआयआयटी, दिल्ली)

अनुवाद: सायली सारोळकर 

नवीन पाककृती तयार करणे हा कोणत्याही शेफसाठी अत्यंत संवेदनशील अनुभव असतो. एक स्वादिष्ट पदार्थ ही फक्त स्वयंपाकघरातील एक प्रक्रिया नसून प्रत्येक पाककृती म्हणजे एक विधान असते. अनेक वेगवेगळे जिन्नस एकत्र करून, त्यावर प्रक्रिया करून त्यापासून एक स्वादिष्ट पदार्थ तयार करणे हा पाककलेचा एक अविष्कार आहे. त्यासाठी बुद्धिमत्ता, नैपुण्य आणि ज्ञानाची आवश्यकता असते. अनेक नवनवीन रेसिपी शोधून काढणारे मास्टरशेफ देखील अनेकदा एखादी नवीन रेसिपी तयार कशी होते हे नक्की सांगू शकत नाहीत. 

अगदी अलीकडच्या काळापर्यंत, स्वयंपाक आणि त्यासंबंधीचे अनुभव हे व्यक्तिसापेक्ष संवेदनेपुरतेच मर्यादित समजले जात होते. एखादा पदार्थ बनवताना त्यात चव, गंध, दृश्य, श्रवण आणि स्पर्श अशा सगळ्या संवेदनांची परस्परक्रिया होत असल्याने या कलेला गुणात्मक अथवा संख्यात्मक दृष्टीने समजून घेणे अवघड होते. परंतु, सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर कविता, चित्रकला, संगीत अशा अनेक सृजनशील क्षेत्रांमध्ये होताना दिसून येत आहे. त्यामुळे अर्थातच पाककलेच्या क्षेत्रात देखील त्याच्या वापराबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. 

पाककला ही एक अद्वितीय सांस्कृतिक प्रक्रिया आहे. पाककृती, चव, पोषण आणि आरोग्य हे त्यातले सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. वेगवेगळ्या पाककृतींचे एकत्रीकरण आणि विशिष्ट अल्गोरिदम यांच्या मदतीने गेल्या दशकात कम्प्युटेशनल गॅस्ट्रोनॉमी (सात्त्विक आहाराचे शास्त्र) एक डेटा सायन्स म्हणून देखील विकसित झाले आहे. उदाहरणार्थ, RecipeDB हा जगभरातील पाककृतींचा समावेश असलेला आणि पाककृती व त्यातील घटक ओळखण्यासाठी विशिष्ट अल्गोरिदम असलेला एक डेटाबेस आता वापरासाठी तयार आहे. हा संग्रह पदार्थांमधील पौष्टिक मूल्यांचा अंदाज लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्याचप्रमाणे, flavorDB हे टूल एखाद्या पदार्थातील साहित्यांची चव आणि त्याचा गंध यांच्यातील सहसंबंध दर्शवते. त्यामुळे त्यांच्या वापरामागील कारण समजणे सोपे जाते. 

जगभरातील माहिती आणि लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) चा वापर करून नवीन पाककृती तयार करणारा एक अल्गोरिदम विकसित करण्याचा एक प्रयत्न नुकताच यशस्वी झाला आहे. Ratatouille या एआय टूल मध्ये ७४ देशातील एकूण १,१८,००० पाककृतींची माहिती समाविष्ट केलेली आहे. याविषयी केलेले संशोधन नुकतेच नेचर समूहाच्या ‘सिस्टिम्स बायोलॉजी अँड ऍप्लिकेशन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अर्थात, संगणक-निर्मित पाककृतींना प्रमाणित करणे हे काम सोपे नाही. ‘ट्युरिंग टेस्ट ऑफ शेफ’मध्ये संगणकाच्या मानवाप्रमाणे नव्या पाककृती तयार करण्याच्या क्षमतेची चाचणी करण्यात आली आहे. ट्युरिंग टेस्ट अर्थात यंत्राची मानवाप्रमाणे विचार करण्याची व बुद्धिमत्तेची चाचणी. यामध्ये तज्ज्ञ शेफसमोर काही संगणकाने विकसित केलेल्या आणि  काही पारंपरिक पाककृती ठेवण्यात आल्या. आपल्या अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे शेफ या पाककृतींचे ० ते ५ च्या श्रेणीमध्ये मूल्यांकन करायचे होते, ज्यात ० म्हणजे खोटी तर ५ म्हणजे अस्सल पाककृती. 

दिल्लीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’मधील विद्यार्थ्यांसोबत ही चाचणी करण्यात आली. या चाचणीत एआयच्या साह्याने तयार झालेल्या पाककृतींना ७० टक्के यश मिळाल्याचे दिसून आले. या अल्गोरिदममध्ये पाककृती सोबतच त्यासाठी लागणारे साहित्य, वेळ, तो पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी, योग्य भांडी, स्वयंपाक करण्याची शैली या सगळ्या मुद्द्यांविषयी तपशीलवर माहिती उपलब्ध आहे. अर्थात, विविध पाककृतींची गुंतागुंतीची रचना आणि त्यामागची करणे समजून घेऊन हे मॉडेल अधिकाधिक उपयोगी बनवले जाऊ शकते. जेव्हा एखाद्या शेफला एक संगणक-निर्मित पाककृती मानवनिर्मित वाटेल, तेव्हाच हे मॉडेल यशस्वी झाले असे म्हणता येईल. अशावेळी पाककृती जरी संगणक-निर्मित असेल, तरी प्रत्यक्षात तो पदार्थ मात्र तज्ञांच्या हस्तेच बनवलेला हवा, जेणेकरून त्याची चव किती अस्सल आहे याची चाचणी करता येईल. ही चाचणी जरी व्यक्तिसापेक्ष असली, तरी या मॉडेलमुळे पाकशास्त्रामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात झाली हे निश्चितपणे म्हणता येईल. 

नवीन रेसिपी तयार करणारे हे तंत्रज्ञान चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकते. योग्य माहितीच्या आधारे या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वस्त आणि जास्त काळ टिकणाऱ्या रेसिपीज बनवल्या जाऊ शकतात. एआयचा उपयोग करून येत्या काळात उपलब्ध घटक, खर्च, कॅलरी, कार्बन फूटप्रिंट, ऍलर्जी आदी बाबी गृहीत धरून पाककृती बनवता येतील. याचा उपयोग चांगल्या आरोग्यासाठी होऊ शकतो. ही सुविधा जगभरातील हॉटेल व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते. 

परंतु, एआय-निर्मित पाककृती लोकांमध्ये स्वीकारल्या जाण्यासाठी पदार्थांची चव हा सगळ्यात मोठा घटक राहील. म्हणूनच, एआय-निर्मित पाककृतींचे तंत्रज्ञान यशस्वी आणि फायदेशीर ठरण्यासाठी तो पदार्थ बनवणाऱ्या शेफचे कौशल्य आणि नैपुण्य सगळ्यात महत्त्वाचे असेल. एआयने तयार केलेली पाककृती मास्टरशेफ सारखी स्पर्धा जिंकू शकते की नाही हे पाहणे देखील मनोरंजक ठरेल. अर्थात, पाककला हे एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक उत्कृष्ट क्षेत्र असले, तरी बनवलेला पदार्थ चांगला आहे की वाईट, हे मात्र माणूसच सांगू शकतो. एआय मानवी कल्पकता आणि बुद्धिमत्तेसाठी एक कॅटॅलीस्ट अर्थात उत्प्रेरक म्हणून काम करू शकेल. मात्र, मानवी बुद्धिमत्तेसाठी एआय हा पर्याय असू शकत नाही.

———— 

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme