– सायली सारोळकर
झिका
पावसाळा येताना जसे हवेत गारवा घेऊन येतो, तसेच साथीच्या आजारांसाठी अत्यंत पोषक वातावरण देखील घेऊन येतो. भरपूर पाऊस, हवेतील आर्द्रता, साचलेले पाणी या सगळ्या गोष्टी डास आणि माश्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे पावसाळा सुरु होताच अनेक साथीचे आजार डोके वर काढू लागतात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात डेंग्यू, चिकनगुनिया, इन्फ्लुएंझा अश्या अनेक आजारांच्या साथी या काळात बघायला मिळत आहेत.
गेल्या २ महिन्यांपासून महाराष्ट्रात, विशेषतः पुणे आणि आसपासच्या भागात झिका विषाणूच्या संसर्गाच्या नोंदी वाढताना दिसत आहेत. १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत फक्त पुणे आणि परिसरात १०० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात झिकाचे एकूण ११३ रुग्ण असून, त्यापैकी १०० पुण्यात, १० अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये, मिरज, सोलापूरमध्ये प्रत्येकी एक इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांमध्ये गर्भवती महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. जुलैमध्ये पुण्यातील एका रुग्णामध्ये ‘झिका मेनिंगोइंसेफीलायटिस’ हे एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन दिसून आले. भारतातील रुग्णामध्ये पहिल्यांदाच हे लक्षण दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
झिका व्हायरस हा एडिस जातीच्या डासांमुळे होतो. डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारे डासदेखील हेच असतात. हे डास शक्यतो दिवसा चावतात. ते साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाला जेव्हा हा एडिस जातीचा डास चावतो, तेव्हा रक्तामध्ये असलेल्या या विषाणूचा डासाला संसर्ग होतो. तिथून पुढे जेव्हा तोच डास जेव्हा निरोगी माणसाला चावतो, तेव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात प्रवेश करतो. विषाणूचा अशाप्रकारे संसर्ग तोपर्यंत शक्य आहे, जोपर्यंत तो विषाणू रूग्णाच्या रक्तात सापडू शकतो. म्हणजे संसर्ग झाल्यानंतर साधारपणे एका आठवड्यापर्यंत!
झिकाच्या संसर्गाने काही रुग्णामध्ये ”गिलेन-बरे’ सिंड्रोम (Guillain-Barré syndrome-GBS)) ही एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती तयार होऊ श
कते. अर्थात हे देखील एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन आहे.
लक्षणे:
विषाणूच्या संपर्कात आलेल्या बहुतेक लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. काही रुग्णांमध्ये मात्र संपर्क झाल्यानंतर ३- १४ दिवसांमधे लक्षणे दिसण्याची शक्यता असते. ही लक्षणे साधारण २- ७ दिवस राहतात. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतात, त्यांच्यामध्ये ती खालील प्रकारची असतात:
१. ताप, थकवा
२. पुरळ
३. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी
४. डोळे येणे
संसर्ग:
हा विषाणू एडिस जातीच्या डासांमुळे पसरतो. हे डास शक्यतो दिवसा चावतात. शारीरिक संबंधातून, रक्त किंवा अवयवदानातून देखील हा विषाणू पसरण्याची शक्यता असते. याशिवाय गर्भवती स्त्रियांमध्ये आईकडून बाळाला याचा संसर्ग होऊ शकतो. गर्भवती स्त्रियांना झिकाचा संसर्ग झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळात काही जन्मजात दोष असू शकतात. उदा. मायक्रोइंसेफॅली म्हणजेच डोक्याचा आकार अपेक्षेपेक्षा कमी असणे, मेंदूची पुरेशी वाढ न होणे, दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होणे, फेफरे येणे इ. जन्मापासून झिका सिड्रोम असलेल्या सगळ्या बाळांमध्ये ही सर्व लक्षणे असतीलच असे नाही. काही वेळा त्यांना जन्मतः मायक्रोइंसेफॅली नसते, परंतु काही काळानंतर ती परिस्थती तयार होऊ शकते.
उपचार आणि प्रतिबंध:
अजून झिका विषाणूवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. लक्षणांवर इलाज करणे हीच एकमेव उपचारपद्धती आहे. त्यामुळे जगभरात त्यावर संशोधन देखील सुरु आहे. संसर्ग झाल्यानंतर थकवा आणि अंगदुखीसारखी लक्षणे दिसत असल्याने रुग्णांनी भरपूर पाणी पिणे आणि आराम करणे अपेक्षित आहे. याशिवाय ताप आणि इतर लक्षणासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
झिकाचा संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी:
१. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून घरात आणि परिसरात पाणी साचू न देणे.
२. डासांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे
३. विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास टाळणे
४. लक्षणे दिसू लागल्यास वैद्यकीय सल्ला घेणे
५. असुरक्षित शारीरिक संबंध टाळणे
अशाप्रकारे थोडीशी काळजी घेऊन झिका आणि इतर अनेक साथीच्या आजारांपासून बचाव करणे सहज शक्य आहे.
मंकीपॉक्स
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच Mpox (मंकीपॉक्स) या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. आफ्रिका खंडातील देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर Mpox ची साथ सुरु आहे. हा जागतिक चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हंटले आहे. या वर्षात आफ्रिका खंडात या विषाणूच्या १४००० केसेस समोर आल्या. त्यातील ५२४ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला. यापैकी ९६% हून अधिक आफ्रिका खंडातील काँगो या एका देशातून नोंदल्या गेल्या आहेत. लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये या आजाराच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.
Mpox चा जगभरातील पहिला रुग्ण काँगो देशातच सापडला. १९७० साली एका नऊ महिन्याच्या मुलाला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे नोंदवले गेले. त्यानंतर २०२२ पासून या देशात Mpox च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २०२२ मध्ये ही परिस्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने ही सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीची परिस्थिती असल्याचे म्हंटले आहे. तेव्हापासून भारतात एकूण ३० रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी शेवटचा रुग्ण या वर्षी मार्चमध्ये नोंदवला गेला.
Mpox काय आहे?
Mpox अर्थात मंकीपॉक्स एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू ऑर्थोपॉक्सव्हायरस या विषाणूंच्या गटातील आहे. स्मॉलपॉक्स अर्थात देवी पसरवणारा विषाणूदेखील याच गटातील आहे. परंतु, मंकीपॉक्स हा देवी इतका घातक नाही. हा zoonosis प्रकारातला आजार आहे, अर्थात प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होणार आजार आहे.
लक्षणे:
विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात खालील लक्षणे दिसायला सुरूवात होते. २-४ आठवडे ही लक्षणे टिकून राहतात.
१. पुरळ येणे
२. ताप
३. घास दुखणे व घशाला सूज येणे
४. डोकेदुखी, अंगदुखी
५. थकवा, गाळून जाणे,
साधारणपणे या आजाराच्या सुरुवातीला ताप येतो, अंग आणि डोकेदुखी होते. त्यानंतर चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर पुरळ येण्याची सुरुवात होते. घशाला येणारी सुज हे मंकीपॉक्सचे महत्त्वाचे लक्षण आहे. शरीरावर येणारे पुरळ आधी सपाट असते, त्यानंतर त्याचे द्रव्याने भरलेल्या मोठ्या फोडात रूपांतर होते. या फोडांना खाज येते आणि वेदना होतात. काही दिवसांनी हे फोड सुकतात, त्यावर खपली धरते. कालांतराने ती गाळून पडते आणि शरीरावरील जखमा भरायला सुरुवात होते. शरीराच्या सर्व अवयवांवर असे फोड येण्याची शक्यता असते. हा आजार संसर्गजन्य असून एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरू शकतो. जोपर्यंत शरीरावरील फोड जाऊन त्याने झालेल्या जखमा भरत नाहीत तोपर्यंत मंकीपॉक्सच्या रुग्णांनी विलगीकरणात राहणे गरजेचे असते.
संसर्ग:
Mpox चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराचा संसर्ग होण्याची शक्य असते. कोरोनाप्रमाणे हा आजार हवेतून पसरत नाही. परंतु, रुग्णाच्या खोकला, थुंकी अथवा शिंकेमधून हा आजार पसरू शकतो. रुग्णासोबत शारीरिक संबंध आल्यास संसर्गाची शक्यता अधिक असते. २०२२ साली मंकीपॉक्सचा झालेला उद्रेक हा शारीरिक संबंधांमुळे पसरला होता. याशिवाय, शरीरावर जखमा असतील तर त्याद्वारे, श्वासावाटे किंवा अगदी डोळ्यांमधून देखील हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. रुग्णांने वापरलेल्या कपडे आणि पांघरूणातून देखील मंकीपॉक्स विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. याव्यतिरिक्त माकड, उंदीर, खार इ. प्राण्यांमधून देखील हा आजार माणसांमध्ये पसरू शकतो.
एकसारखी लक्षणे असणारे अनेक आजार या गटातील विषाणूंमुळे होत असल्याने मंकीपॉक्सचे निदान करणे अवघड असते. PCR च्या मदतीनेच या विषाणूचे निदान करणे शक्य आहे.
उपचार आणि प्रतिबंध:
मंकीपॉक्सवर अजून औषध उपलब्ध नाही. अंगावरील पुरळ आणि फोड यांची काळजी घेणे आणि वेदना कमी करण्यासाठी उपाय करणे हेच त्यावरचे उपचार आहेत. मंकीपॉक्स झालेले रुग्ण साधारणपणे २-४ आठवड्यात बरे होतात. तोपर्यंत रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. इतर लोकांच्या संपर्कात आल्यास मास्क वापरणे, फोड आलेले शरीराचे अवयव झाकून ठेवणे इ. उपाय करून या आजाराचा संसर्ग कमी करता येऊ शकतो. याशिवाय, या आजारावर लस उपलब्ध आहे. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर ४ दिवसाच्या आत लस घेणे अपेक्षित आहे.
‘ब्रेन इटिंग अमिबा’
प्रायमरी अमिबिक मॅनिंगोइन्सेफलायटिस अर्थात PAM या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचे रुग्ण गेले काही महिने केरळमध्ये आढळून येत आहेत. लहान मुले आणि तरुणांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. गेल्या ३ महिन्यात केरळमध्ये या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केरळच्या कोळीकोड जिल्ह्यातील थिक्कोडी गावातील १४ वर्षीय अफनान जसीम हा तरुण नुकताच या आजारातून बरा झाल्याचे जाहीर करण्यात आले. तब्ब्ल ९७% मृत्युदर असलेल्या या अत्यंत गंभीर आजारातून जगभरात केवळ ११ रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. त्याच यादीत आता अफनान जसीम याचे नाव दाखल झाले आहे.
उर्वरित ५ रुग्णांपैकी ३ रुग्णांचा गेल्या २ महिन्यात मृत्य झाला. तर दोन रुग्णांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय आहे प्रायमरी अमिबिक मॅनिंगोइन्सेफलायटिस?
नेगलेरिया फाउलेरी (Naegleria fowleri) या अमिबामुळे हा आजार होतो. त्याला ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे देखील म्हणतात. हा अमिबा मेंदूतील पेशी नष्ट करतो आणि त्यामुळे मेंदूला सूज येऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. याचा मृत्यूदर ९७% इतका आहे.
सामान्यतः निरोगी असलेल्या लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. हा ब्रेन इटिंग अमिबा नदी, तलाव, पाणवठे अश्या जलसाठ्यांमध्ये आढळतो. शक्यतो कोमट किंवा गरम पाण्याच्या साठ्यांमध्ये, ज्याठिकाणी पाण्याचे तापमान खूप काळ जास्त असते, तिथे हा अमिबा असण्याची शक्यता जास्त असते. हा अमिबा असलेले दूषित पाणी नाकावाटे शरीरात गेल्यास त्याचा संसर्ग होण्याची संभावना असते. जास्त प्रेशरमधे पाणी शरीरात गेल्यास संसर्गाची शक्यता जास्त असू शकते. याव्यतिरिक्त, दूषित पाणी तोंडाद्वारे पोटात गेल्यास संसर्ग होत नाही. तसेच, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग होत नाही.
अर्थात, ब्रेन इटिंग अमिबाचा संसर्ग होणे दुर्मिळ आहे. एका संशोधनानुसार प्रायमरी अमिबिक मॅनिंगोइन्सेफलायटिसचे जगभरात आजपर्यंत ४०० च्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९७% रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नोंदले गेले आहे. १९६५ साली ऑस्ट्रेलियामधील फाउलर आणि कार्टर यांनी या अमिबाचा शोध लावला. तेव्हापासून आजपर्यंत या आजारातुन केवळ ११ रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. सध्या भारतात केरळमधील कोळीकोड येथे २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लक्षणे आणि उपचार:
नेगलेरिया फाउलेरीने शरीरात प्रवेश केल्यानंतर साधारण एक ते नऊ दिवसांत सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. मळमळ, उलट्या, ताप आणि डोकेदुखी ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जसजसा आजार वाढतो, त्यानुसार आणखी गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये मान कडक होणे, कन्फ्युजन, तोल जाणे, आजूबाजूच्या लोकांकडे आणि वस्तूंकडे लक्ष न जाणे आणि हॅलुसीनेशन्स अर्थात मतिभ्रम या लक्षणांचा समावेश आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रेव्हेंशन (CDC) या संस्थेनुसार लक्षणे दिसायला लागल्यानंतर काहीच दिवसात रुग्ण कोमात जाऊन त्याचा मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असते. सामान्यतः, प्रायमरी अमिबिक मॅनिंगोइन्सेफलायटिस या आजाराची सुरुवातीची लक्षणे इतर अनेक संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांसारखीच असल्याने त्याचे निदान उशिरा होते. शिवाय, हा आजार खूप लवकर शरीरात पसरत असल्याने अनेक वेळा रुग्णाच्या मृत्यूनंतरच त्याचे निदान झाल्याचे दिसून आले आहे. या रोगाचे निदान PCR द्वारे शक्य आहे. अर्थात, हा आजार अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचे निदान करण्यासाठी वेळ लागू शकतो.
सध्यातरी या आजारावर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. सीडीसीनुसार सध्या अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल औषधांचा वापर उपचारांसाठी करण्यात येत आहे. हे प्रमाणित उपचार नसले तरी काही बरे झालेल्या रुग्णांमधे या औषधांचा परिणाम झाल्याचे दिसून येते.
प्रतिबंधात्मक उपाय:
जलसाठ्यामधील पाणी दूषित आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणतीही जलद आणि प्रमाणित चाचणी अजून उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक जलसाठ्यांचा वापर करताना ते पाणी नाकावाटे शरीरात जाणार नाही याची काळजी घेणे हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.
———–