मायलॅब कंपनीचे यश; सध्याच्या एक चतुर्थांश खर्चात आणि निम्म्यापेक्षा कमी वेळेत चाचणी शक्य
संशोधन, २४ मार्च २०२०
कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताला मोठे बळ मिळाले आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे कोरोना चाचणीसाठी लागणारे किट फक्त सहा आठवड्यांच्या विक्रमी कालावधीत तयार करण्यात आले आहे. ‘मायलॅब पॅथो डिटेक्ट कोविड – १९ क्वालिटेटिव्ह पीसीआर किट’ हे मेक इन इंडिया उत्पादन इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) कोविड १९ च्या चाचणीसाठी असणारे सर्व निकष १०० टक्के पूर्ण करते. या स्वदेशी किटला सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) व्यावसायिक उत्पादनासाठी मंजुरीही दिली आहे.
भारतातील कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जितका कर्फ्यू गरजेचा आहे, तितकीच कोरोनाच्या सर्व संशयित रुग्णांची, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची वेळेत तपासणी करणेही अत्यावश्यक आहे. त्यामुळे नेमक्या कोरोना संसर्गित रुग्णांना त्वरीत विलग करून त्यांच्यावर वेळेत उपचार शक्य होतील. आतापर्यंत आयात करण्यात आलेल्या चाचणी किटच्या मर्यादीत साठ्यामुळे चाचण्यांचे प्रमाण हवे तसे वाढवणे भारताला शक्य नव्हते. मात्र, मायलॅबमुळे कोविड १९ चाचणी किटचे देशांतगर्तच मोठ्या प्रमाणात उत्पादन करून देशातील कोरोना संसर्गित रुग्ण कमीत कमी वेळेत शोधणे शक्य होणार आहे. कोरोनाच्या प्रसाराला वेळेत आळा घालण्यासाठी हे मोठे यश मानले जात आहे.
याबाबत मायलॅब कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, “मेक इन इंडियाचा अवलंब करीत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत कमी कालावधीत हे किट तयार करण्यात आम्हाला यश आले आहे. किटची निर्मिती करताना केंद्र आणि राज्य सरकार, तसेच विविध मंत्रालये आणि सरकारी संस्थांचे मिळालेले पाठबळ असामान्य होते. विविध प्रकारच्या आवश्यक मंजुऱ्या तातडीने मिळाल्या.”
कंपनीचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे म्हणाले, “कोविड १९ च्या चाचणी किटच्या रूपाने सध्याचे अद्ययावत तंत्रज्ञान देशाला स्वस्तात कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. हे किट अत्यंत संवेदनशील असणाऱ्या पीसीआर तंत्रावर आधारीत असल्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेतही कोविड १९ चे निदान होऊ शकते. आयसीएमआरने केलेल्या तपासणीमध्ये आमच्या किटची अचूकता सर्वाधिक असल्याचे, तसेच चाचणीला वेळही कमी लागत असल्याचे सिद्ध झाले आहे.”
सध्या भारतात प्रति दहा लाखांमध्ये फक्त ६.८ इतक्या कमी लोकांची कोविड १९ चाचणी होत आहे. संशयितांच्या तपासणीमध्ये भारताचा क्रमांक सध्या सर्वात खाली आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांनी मोठ्या प्रमाणात कोविड १९ च्या चाचण्या करून आपल्या देशातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले याची नोंद घ्यायला हवी. सध्या भारतात जर्मनीतून कोविड १९ चे चाचणी किट लाखोंच्या संख्येने आयात करण्यात येत आहेत. मात्र, सध्याच्या आणीबाणीच्या काळात आयात होणाऱ्या किटचा पुरवठा कधीही थांबू शकतो. अशा स्थितीत मेक इन इंडिया किट उपलब्ध झाल्यामुळे भारताच्या कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
मायलॅबच्या एका किट मधून १०० रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी शक्य असून, एका आठवड्याला एक लाख किटचे उत्पादन करून देण्याची हमी मायलॅबने दिली आहे. गरज वाटल्यास हे प्रमाण वाढवण्यातही येईल असे मायलॅबने सांगितले आहे. स्वयंचलित पीसीआरद्वारे दिवसाला साधारण एक हजार रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली जाते. मायलॅबच्या कोविड १९ चाचणी किटची किंमत सध्या उपलब्ध असणाऱ्या किटच्या तुलनेत एक चतुर्थांश असून, या किटद्वारे चाचणीचे निष्कर्ष साधारणपणे अडीच तासांत हातात येतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या प्रक्रियेला सात तास लागतात. याचाच अर्थ एक प्रयोगशाळा दिवसाला सध्याच्या तुलनेत दुप्पट नमुन्यांची चाचणी करू शकेल.
मायलॅब कंपनीला पीसीआर चाचण्यांसाठी लागणारे किट बनवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असून, कंपनीतर्फे रुग्णालये, रक्तपेढ्यांसाठी आयडी नॅट किट बनवले जातात. या किटमुळे रक्तातील विविध घातक विषाणू शोधले जाऊन रक्तदानातून फैलाव रोखणे शक्य होते. कंपनीतर्फे एचआयव्ही, एचबीव्ही, एचसीव्ही किटचेही उत्पादन केले जाते.
————-