– अरुणचंद्र शं. पाठक
पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव, जि. बीड हे स्थान गोदावरीच्या दक्षिण तटावर असून बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ लगत आहे. माजलगावपासून उत्तरेस २२ किलोमीटर आणि सावरगावपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. बीड या जिल्हा स्थानकापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. आज असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथील मंदिरात विष्णुमूर्तीची प्रतिष्ठापना मूळ मंदिराचा जीर्णोद्धार करून पुन्हा नव्याने (इ. स. १९८०-८१ च्या दरम्यान) करण्यात आली. ही प्राणप्रतिष्ठा करताना ह.भ.प. श्री भानुदास महाराज, लक्ष्मण रत्नपारखी तसेच महामहोपाध्याय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे हे सपत्नीक उपस्थित होते. पुरुषोत्तमाचे महत्व अधिक मासामध्ये विशेष मानले जाते. दर तीन वर्षांनी असा पुरुषोत्तममास येतो. १६ मे २०१८ ते १३ जून २०१८ या कालावधीत अधिक ज्येष्ठ शके १९४० विलंबी नाम संवत्सर होते. (गौतमी माहात्म्यात आलेल्या नोंदीप्रमाणे या स्थानालागत असलेले मंजरथ हे गोदावरीचे हृदयस्थान मानले जाते). शिवाय ब्रह्मपुराणातील गौतमी माहात्म्यात स्वतंत्रपणे प्रारंभी व शेवटी पुरुषोत्तम मासाविषयी वर्णन करणारे अध्याय आले आहेत.
पौराणिक कथानकाप्रमाणे शार्दुल नावाचा दैत्य देव व ऋषींना त्रास देत होता. तेव्हा विष्णूने पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व गोदावरीकाठी या स्थानी आपले चक्र स्वच्छ केले. तेव्हा येथे चक्रतीर्थ निर्माण झाले. येथेच गोदावरीला एक ओहोळ मिळत असल्यामुळे या स्थानी त्रिवेणी संगम असल्याचे मानले जाते.
येथे तेराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात श्री पुरुषोत्तमाचे मंदिर तसेच सहालक्षेश्वर शिवमंदिर निर्माण करण्यात आले. या गावात प.पू. पूर्णाश्रम स्वामी यांची देववाडा येथे समाधी आहे. येथून एक किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिर असून तो या स्थानाचे रक्षण करतो असे मानले जाते. या परिसरात असलेल्या मुनींच्या आश्रमस्थानांना मठ किंवा मठी असे म्हटले जाते. या स्थानांची महसुली नोंद ‘मठीचे वावर’ अशीच आहे. या परिसरात मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञामुळे भस्माची एक टेकडी निर्माण झाली. यालाच स्थानिक लोक ‘मठीचे वावर’ म्हणून दाखवतात. ही शेती साहेबराव गोळेगावकर यांच्या मालकीची आहे. मठीचे वावर हे पुरातत्व गर्भक्षेत्र असून प्रागैतिहासिक कालापासून सातवाहन कालापर्यंतचे पुरावशेष येथे मिळतात. काळाच्या ओघात या क्षेत्राची हानी झाली आहे. एकूण पुरुषोत्तमपुरी या स्थानाचे प्राचीनत्व लक्षात येते. येथे रामचंद्र यादव याचा ताम्रपट उपलब्ध झाला असून त्याची सविस्तर चर्चा पुढे केली आहे. यादवकाळात एक अग्रहार म्हणून, विद्याकेंद्र म्हणून या स्थानाचा विकास होत होता. गोदावरीच्या दक्षिणतटावर असलेल्या काहीशा उंच अशा टेकडीवर वसाहतीचे अवशेष आढळतात. साधारणपणे लंबवर्तुळाकार क्षेत्रात या वसाहतीचा विस्तार झाला. आज पुरुषोत्तम मंदिर आहे, तेथून दक्षिणेकडे वसाहतीचा विस्तार होत गेला. मंदिरापासून साधारणपणे सहाशे मीटर अंतरावर यादवकालीन म्हणता येतील, असे दगडी बांधकामाचे अवशेष आहेत. कदाचित हे अवशेष नगराच्या प्रवेशद्वाराचे असावेत, असे अनुमान त्यांच्या विस्तारावरून करता येते. आज विस्तारलेले गाव हे स्वातंत्र्योत्तर काळातील आहे.
पुरुषोत्तमपुरी मंदिर –
साधारणपणे एका भव्य प्राकारात बांधलेल्या पूर्वाभिमुख अशा दोन समांतर वास्तूंचा विकास तेराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात करण्यात आला. त्यातही सहालक्षेश्वर मंदिर किमान पाचसहा दशके आधी उभारण्यात आले असावे. पुरुषोत्तमपुरी गावातील एका प्राकारामध्ये उंच दगडी चौथऱ्यावर पुरुषोत्तमाचे मंदिर उभारण्यात आले. यासाठी १८ ते २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे व अडीच मीटर उंचीचे अधिष्ठान उभारण्यात आले. यावर गर्भगृह, अंतराळ, सभामंडप अशी रचना करण्यात आली. सभामंडपास पूर्व व दक्षिणोत्तर प्रवेशद्वार होते. पुढे स्वतंत्र गरुडमंडप उभारण्यात आला होता (५ मीटर x ५ मीटर चौथऱ्यावर). यावर असलेली वास्तू, त्यावरील नागर शिखर व त्यास असलेले लाकडी वितान हे काळाच्या ओघात नष्ट झाले. येथील विटा वापरून नव्याने मंदिराचे बांधकाम करण्यात आले. असे असले तरी गर्भगृहातील अधिष्ठान शिळा, त्यावर अंकित असलेला गरुड, सभामंडपातील स्तंभ व प्रवेशद्वाराचा भाग हे मूळ मंदिराचे प्राचीनत्व स्पष्ट करतात. इ. स. १९८०-८१ मध्ये ग्रामस्थांनी नव्याने मंदिर उभारले व मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या मूर्तीचा आकार ११० सेमी x ८० सेमी असून तिच्या डाव्या वरील हातात शंख, खालील हातात गदा आहेत. उजव्या वरील हातात चक्र व खालील हातात पद्म आहे. म्हणजे प्रदक्षिणा क्रमाने आयुधांचा हा क्रम शंख, चक्र, पद्म, गदा, असा ठरतो व अग्निपुराण, पद्मपुराण, अपराजित पृच्छा किंवा रूपमंडण या ग्रंथांच्या मते ही मूर्ती श्रीकृष्णाची ठरावी (नी. पु. जोशी, भारतीय मूर्तीशास्त्र, पुणे, १९७९, पृ. ९६-९७).
यावर पूर्वी लाकडी वितान होते याची साक्ष देताना ग्रामस्थांनी मंदिराबाहेर पडलेली एक मोठी लाकडी लाट (स्तंभ) दाखवली.
श्री सहालक्षेश्वर मंदिर –
पुरुषोत्तम मंदिरालगत अडीच मीटर उंचीच्या अधिष्ठानावर उभारलेले श्री सहालक्षेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभारा (२.२० x २.१० मीटर), अंतराळ (२.२० x २.७० मीटर), सभामंडप (४.७० x ४.७० मीटर) आहे. सभामंडप सोळा स्तंभांवर उभा असून सभामंडपातील रंगशिळा चौरस आकाराची आहे (२.७० x २.७० मीटर). सभामंडपात क्षीण व उत्तर बाजूस उपगृहे होती. यापैकी उत्तर बाजूचे उपगृह आता कोसळले आहे. सभामंडपापुढे मुखमंडप होता (२.५० x २.५० मीटर) व दोन्ही बाजूंनी त्यास १.२० मीटर उंचीचे पार्ट (ओटे) असावे. मंदिरातून बाहेर पडण्यास पाच पायऱ्या उतराव्या लागतात. त्यामुढे स्वतंत्र अधिष्ठानावर (४.५ x ४.५ मीटर) नंदीमंडप उभारला असून प्रत्यक्ष नंदीमंडपाचा आकार २.९० x २.९० मीटर इतका असावा.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, गर्भगृहाचे वितान दगडी शिळांचे असून त्यावर स्वतंत्र असे विटांतील शिखर बांधले आहे. मंडोवरावर फारसे नक्षीकाम नाही. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार तीन शाखी असून स्तंभशाखा उठावात दाखवली आहे. गर्भगृहात सहालक्षेश्वर म्हणून ओळखली जाणारी पिंड आहे. त्यामागे अधिष्ठानात श्री गणेशाची मूर्ती आहे. मागील बाजूच्या भिंतीत असलेल्या देवकोष्ठात अधिष्ठान शिळेवर पार्वतीची पावले कमलासनावर कोरली आहेत. पायांतील पैंजण व पायांच्या बोटांतील अलंकार स्पष्टपणे दिसतात. अंतराळानंतर असलेल्या सभामंडपावर मुळात लाकडी वितान होते. सभामंडपात असलेल्या स्तंभावर येणारे तरंगहस्त नागबंदयुक्त आहेत (कीचक). त्यावरील तरंग हे लाकडी आहेत (३० x ४० सेमी जाडीचे सागवानी लाकूड) व या तरंगांवर लाकडी वितान आहे. सभामंडपाच्या उपगृहासाठी असलेल्या वितानावर शंकरपाळ्याच्या आकाराची रचना व कोरीव काम आहे. सभामंडप व त्याचे दक्षिण बाजूंची उपगृहे यांना जोडणाऱ्या जागेत (९० सेंटीमीटर) तिरप्या (उतरत्या) लाकडी फळ्यांचा उपयोग केला आहे. तरंगहस्तावर समान स्वरूपात पुढे येणारी काष्ठकामातील भौमितिक नक्षी आहे. मुख्य सभामंडपातील रंगशिळेवर एकात एक वर्तुळे विकसित होत जातात. हे करोटक वितान व वरच्या बाजूला विकसित झालेले कमलपुष्प, त्याखालील भागात गोखुर (गोपाद) यासारखे कोरीव काम आहे. याला केंद्रस्थानी व तरंगहस्ताच्या पातळीवर चारही बाजूंस काष्ठाशिल्पातील लोलक असावे. ते कोणीतरी काढून घेतले आहेत.
महाराष्ट्राच्या संदर्भात दगडी बांधकामावर विटांत उभारलेली शिखरे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. अशा मंदिर उभारणीत आतील बाजूने लाकडी वितान असणे ही एक दुर्मिळ अशी उपलब्धी आहे.* या लाकडी कामाचा काळ निश्चितपणे १३ वे शतकाचा आहे, कारण यावर उभारलेले विटांतील शिखर मूळ स्वरूपात कायम आहे. मंदिराच्या मंडोवरावर (जंघाभाग) फारसे शिल्पकाम नाही परंतु मुख्य गर्भगृहावर विटांमध्ये बांधलेले नागरशिखर होते. एकावर एक चढत जाणाऱ्या शिल्पांच्या प्रतिकृती असलेले रहपाग, स्तंभ व कूटशिखरांची नक्षी उपलब्ध आहे. शिवाय शुकनाशिकेचा थोडा भाग, त्यावरील नक्षी, सभामंडपाच्या छतावरील मूळ यादवकालीन शिखरांचे अवशेष आजही उपलब्ध आहेत (२.५० ते ३ मीटर उंचीचे).
गर्भगृहावरील मुख्य शिखर साधारण चार मीटर उंचीपर्यंत मूळ स्वरूपात आहे. याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यावर चार मीटर उंचीचे शिखर साधारण तीनशे वर्षांपूर्वी चार टप्प्यांत वीटकामात उभारले आहे. त्यावरील कळसाखालील भाग (स्तुपिका) निश्चितपणे उत्तरकालीन आहे. एकूण महाराष्ट्राच्या संदर्भात लाकडी वितान असलेले मंदिर प्रथमच नोंदवले जात आहे.
*मंदिरासाठी वापरलेल्या विटा विशिष्ट तंत्राने बनवलेल्या (overburnt) असून
त्यावर कोरीव काम केले आहे. या विटा तेर येथील विटांप्रमाणे पाण्यावर तरंगतात. महाराष्ट्राच्या संदर्भात कार्ले, जिल्हा पुणे येथील लेण्यांत लाकडी नाटांचा वापर केला गेला (पहिले शतक). तेर, जिल्हा उस्मानाबाद येथील उत्तरेश्वर मंदिरात लाकडी चौकट उपलब्ध आहे (सहावे शतक). धारासूर, जिल्हा परभणी येथील विष्णुमंदिराचे शिखर उभारताना आतील बाजूने लाकडी नाटा (लाटा) आधारासाठी वापरल्या गेल्या (१३ वे शतक). पुरुषोत्तमपुरी येथील मंदिरात लाकडी छत उभारण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झालेले हे मंदिर ग्रामस्थांच्या वतीने दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण हे प्रयत्न होताना प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप जतन होणे गरजेचे वाटते. यासाठी संबंधितांनी योग्य प्रयत्न करायला हवेत.
गोदावरीच्या अष्टांगांपैकी असलेल्या मंजरथ या हृदयस्थानालागत हे स्थान असून तालुका माजलगाव जिल्हा बीड मध्ये आहे. गोदावरीच्या दक्षिण तटावर वसलेले हे स्थान आहे. येथे उपलब्ध झालेल्या यादव नृपती रामचंद्रदेव याच्या पुरुषोत्तमपुरी ताम्रपटामुळे या स्थानाकडे अभ्यासकांचे लक्ष आकर्षित झाले. डॉ. वा. वि. मिराशी यांनी सर्वप्रथम एपिग्रफिया इंडिका (पु. २५, पृ. १९९-२२५) हा ग्रंथ ताम्रपटाच्या इंग्रजी भाषांतरासह प्रकाशित केला व नंतर विदर्भ संशोधन मंडळाच्या संशोधन मुक्तावली मध्ये त्याचा मराठी अनुवाद व मूळ ताम्रपटाचे वाचन प्रकाशित केले (संशोधन मुक्तावली, सर चौथा, नागपूर, पृ. १४७ ते १७२). मुळात त्यांना हा ताम्रपट श्री. र. म. भुसारी यांनी उपलब्ध करून दिला. त्यासाठी हैद्राबाद संस्थानातील पुरातत्व विभागाचे संचालक श्री. गुलाम यजदानी यांनी मदत केली. डॉ. न. प्र. चक्रवर्ती या तत्कालीन – भारत सरकारचे लेखन शास्त्रज्ञ – यांनी याचे ठसे पुरवले. हा ताम्रपट अनेक दृष्टींनी महत्वाचा ठरतो.
गोदावरी संस्कृतीच्या अभ्यासात या ताम्रपटाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. पुरुषोत्तमपुरी गावात एका गोसाव्याजवळ ताम्रपटाचे तीन पत्रे उपलब्ध झाले असून त्यांचा आकार १ फुट २ १/२ इंच रुंद, १ फुट ८ इंच उंच आणि ३/८ इंच जाडीचा असून त्याचे वजन जवळपास पावणेचौदा शेर इतके आहे. विशेषतः पैठण येथील रामचंद्र यादवाचा ताम्रपटही याच आकाराचा व वजनाचा आहे (इंडियन अँटिक्वरी, मुंबई). या ताम्रपटाच्या शीर्षभागावर वर्तुळाकार आकाराचे छिद्र असले तरी त्यात अडकवलेली कडी व मुद्रा त्यांना उपलब्ध झाली नाही. पहिल्या व तिसऱ्या पत्र्याच्या आतील बाजूने आणि मधल्या पत्र्याच्या दोन्ही बाजूंनी यावर लेखन असून तो सुस्थितीत उपलब्ध झाला. त्यावर एकूण १४१ ओळी आहेत. याचे वाचन वा. वि. मिराशी यांनी केले.
मजकुराच्या रचनेविषयीचे तपशील मिराशी यांनी दिले आहेत, ते मुळातून पाहावे. विशेष म्हणजे मी स्वतः पुरुषोत्तमपुरी येथे १७ फेब्रुवारी २०१९ रोजी दुसऱ्यांदा भेट दिली, त्यावेळी श्री. उत्तम भाऊ पुरी यांच्या घरात पूजेत असलेली गरुड प्रतिमा पाहण्यास मिळाली. ही प्रतिमा पंचधातूची आहे असे सांगत असले तरी ती प्रामुख्याने पितळेची आहे. १९ सेंटीमीटर उंच व ८ बाय १० चौरस सेंटीमीटर व साधारण अडीच किलो वजन असलेली मूर्ती नमस्कार मुद्रेत बसलेल्या गरुडाची असून तिच्या मागील बाजूस गरुडाचे पंख दर्शवले आहेत व त्याच्या हाती चांदीचे कडे घातले आहे. त्याच्या मागील बाजूला ताम्रपटाचे पत्रे घालून ठेवण्यासाठी असलेली कडी सुरक्षित आहेत. याचा अर्थ मिराशी यांचे निवेदन लक्षात घेता कडी न तोडता पत्र्याचा वरचा भाग कापून ते विलग केले गेले. आजही त्याच गोसावी घराण्यात म्हणजे श्री उत्तम भाऊ पुरी यांच्याकडे ती गरुड प्रतिमा पूजेत ठेवली आहे. याची भाषा संस्कृत असून त्याचा काही भाग गद्यात व काही भाग पद्यात असून यादव वंशाचे वर्णन असलेले श्लोक पैठण ताम्रपटातही आले आहेत.
या ताम्रपटाचा मुख्य हेतू रामचंद्र यादवाचा महामांडलिक पुरुषोत्तम नायक यास अग्रहार करण्यासाठी काही गावांचे दान दिले आणि पुरुषोत्तमाने आपल्या स्वतःच्या नावे पुरुषोत्तमपुरी नामक अग्रहार करून दान दिला. या अग्रहारामध्ये पोखरी, अडोगो, वाघोरे आणि कुरूणपारगौ अशी चार गावे अंतर्भूत होती. ती कान्हैरी नामक ‘खंपणकां’तील होती. यापैकी पहिल्या तीन गावांच्या बरोबर त्याच्या सभोवताली असलेल्या वाड्याही दान दिल्या होत्या. त्या पुढीलप्रमाणे – साएगाव्हाण, पिंपळगाव्हाण, गोलेगाव्हाण, पालिपोखरी, पिंपळवाडी, काजलकोई, सोईजणे, सिंपविहीरे आणि धारवाघौरे. या अग्रहाराच्या चतुःसीमा नोंदवलेल्या असून पूर्वेस दांडीगौ आणि सादुले, दक्षिणेस केशवपुरी, सावरीगाव आणि हरीकिनिबगौ, पश्चिमेस राजगौ, हिवरे, चिंचवली आणि द्रुगलेगाव्हाण व महादेवपुरी ही स्थाने होती. उत्तरेस गोदावरी नदी होती. या स्थानांची सध्या प्रचारात असलेली नावे हरिहर ठोसर यांनी शोधली असून ती यादी स्वतंत्रपणे दिली आहे. याचे विशेष असे की, ही सुमारे ३२ स्थाने त्या काळात अस्तित्वात होती व आजही कमीअधिक फरकाने अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे या गावांतील जमिनीचे ८६ भाग करून त्यातील दोन भाग देवासाठी, एक अग्निष्टीकेसाठी आणि आणि प्रपा यांच्याकरिता राखून ठेवली होती. बाकीचे ८३ भाग विविध विद्वानांस वाटून दिले होते. ही विद्वान घराणी ब्राह्मणांची असून त्यांच्या पित्यांची नावे तसेच त्यांच्या शाखा व गोत्रे ताम्रपटातील ८० ते ११४ या ओळींवर आहेत. यांपैकी ५७ ब्राह्मण ऋग्वेदी, २ कृष्ण यजुर्वेदी तैत्तिरीय शाखेचे, एक काण्व व एक माध्यंदिन असे दोन शुक्ल यजुर्वेदी आणि राहिलेले तीन सामवेदी होते. तेथे नोंदवलेल्या एकूण गोत्रांची व विद्वानांची यादी स्वतंत्रपणे खाली दिली आहेत. तत्कालीन समाजाच्या अभ्यासासाठी त्याचे महत्व आहे.
रामचंद्र यादवच्या पैठण ताम्रपटातील काही उपनामांचा उल्लेख या ताम्रपटात आला आहे. विशेष म्हणजे मिश्र, दुबे आणि त्रिवेदी ही उत्तर भारतीय ब्राह्मणांची नावे देखील गोदावरी काठच्या ताम्रपटात आली आहेत. या ताम्रपटात एकूण दोन तिथींचा उल्लेख येतो. याचे तपशील मिराशींनी दिले आहेत. पहिली तिथी शक संवर १२३२ साधारण संवत्सर, भाद्रपद शुक्लएकादशी शनिवार अशी आहे. या तिथीला रामचंद्र देव यांनी चार गावे आपला महामांडलिक पुरुषोत्तम यास प्रदान केली. याची इंग्रजी तारीख ५ सप्टेंबर १३१० अशी येते. दुसरी तिथी शक संवत १२३२ साधारण संवत्सर, भाद्रपद महिन्यातील कपिला षष्ठी होय. येथे पक्ष व वाराचा उल्लेख नाही. कपिला षष्ठी भाद्रपद कृष्णपक्षाच्या षष्ठीस मंगळवार येत असेल आणि त्या स्थितीस रोहिणी नक्षत्र असून व्यतिपात असेल तर तिला कपिलाषष्ठी म्हणतात. या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल तर ती विशेष पुण्यप्रद मानली जाते. याची इंग्रजी तारीख १५ सप्टेंबर १३१० अशी येते. या विषयीची चर्चा वा. वि. मिराशी यांनी केली आहे. रामचंद्र यादवची वंशावळ सिंह (सिंहण) पासून दिली असून त्यांच्या पराक्रमाची नोंदही आली आहे. यावरून हे लक्षात येते की, बल्लाळ, होयसळ, कलचुरी यांचे परस्पर संघर्ष सुरु होते. यात कोल्हापूरचे शिलाहार, चौलुक्यांच्या वाघेला शाखेतील पुरुषांचाही समावेश होता.
सिंहणानंतर त्याचा नातू कृष्ण गादीवर आला. चैत्रापाळाचेही वर्णन (अंबाजोगाई येथील) आले आहे. रामचंद्र यादवाने आमण देवाचा पराभव केला त्याचे तपशील आले आहेत. रामचंद्र यादवाने डाहल देशाचा राजा तसेच भांडागार नृपतीचा व वज्राकराच्या राजाला हरवले, यासारखे वर्णन येते. त्याच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा श्लोक क्र. १८ मध्ये रामचंद्राने वाराणसी म्लेंच्छाच्या प्रभावातून मुक्त करून तेथे शारंगपाणीचे सोन्याचे देवालय बांधले असा उल्लेख येतो. या शिवाय या ताम्रपटात पुरुषोत्तम या मंत्र्याची वंशावळ दिली आहे. याच्या वशिष्ट गोत्रात भानुसुरी नावाची व्यक्ती होऊन गेली. त्याने अनेक तलाव खोदले व देवालये बांधली. त्याचा पुत्र अल्हदेव हा चौदा विद्यांमध्ये प्रवीण होता यासारखे वर्णन मिळते. त्याच्या नातवास सांवलदेव यास रामचंद्राने फुलबडुवा (पुष्परचना अध्यक्ष) केले. स्वतः पुरुषोत्तम हा बुद्धिमत्ता व शौर्य या गुणांमुळे यादवांचा प्रधान झाला. त्याच्यामुळे यादवांच्या कोषागाराची वृद्धी झाली यासारखे वर्णन मिळते. पुरुषोत्तमपुरीच्या आसपास असलेल्या ग्रामांची नोंदही यात आली आहे. अशा अनेक दृष्टींनी हा महत्वाचा ठरतो.
———–