– डॉ. नरहरी पुजारी
कापूस हा मुख्यत्वेकरून सेल्युलोजच्या धाग्यांनीच बनलेला असतो. कपड्यांपासून ते बेडशीटपर्यंत सर्वाना परिचित असलेल्या कापसाविषयी अधिक विस्ताराने आपण माहिती घेऊयात.
कापसाला अन्य नैसर्गिक धाग्यांप्रमाणेच मानवी इतिहासात स्थान आहे. कापसाचा नक्की वापर, त्याची लागवड आणि त्यापासून कपडे बनवण्याची पद्धत कधी सुरु झाली हे माहित नसले, तरी उपलब्ध पुराव्यावरून सिंधू संस्कृतीमध्ये त्याचे पहिले अवशेष मिळतात. आज पाकिस्तानमध्ये असलेल्या मेहघड या गावात तांब्याच्या भांड्यात जतन केलेले कापसाचे धागे आढळले होते. ज्यांचा कालावधी सुमारे सात हजार वर्षांपेक्षा अधिक आहे. कापूस उद्योग हा सिंधू संस्कृतीमध्ये भरभराटीला आला होता. या संस्कृतीने विकसित केलेली कापसाची, धागे बनवण्याची आणि त्यापासून कपडे बनविण्याची पद्धत अगदी गेल्या शतकापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचलित होती. अगदी दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात देखील त्याचे प्राचीन पुरावे मिळतात.
भारतामधूनच कापड उद्योग मध्य आशियात आणि तेथून पुढे जगभर पसरला. हजारो वर्षांपासून मौखिक परंपरेद्वारा प्रचलित असलेल्या ऋग्वेदात कापसाचे आणि त्यापासून तयार झालेल्या रंगीत कपड्यांचे (रंग वापरून) सुंदर वर्णन आलेले आहे. महाराष्ट्रातील अजिंठा गुहेत कापसापासून बिया वेगळ्या करण्यात आलेल्या यंत्राची चित्रे आहेत. त्याकाळात देखील कापूस लागवडीत भारत किती वैज्ञानिक दृष्टिकोनातून काम करीत होता, याची कल्पना येते. मौर्याच्या राजवटीत इसवी सन २०० मध्ये भारतातून चीन आणि पर्शियात कापूस निर्यात होऊ लागला होता. रोम साम्राज्यात रेशीमा इतकाच कापूसही उच्चभ्रू लोकांसाठीच वापरण्यात येणारा कापडाचा प्रकार होता. भारत भेटीत रोमन तत्ववेत्ता प्ल्यायनी कापसामुळे प्रचंड प्रभावित झाला. त्याने आपल्या आठवणीत लिहून ठेवले आहे की, भारतात लोकरीचे गुंडे (कापूस) झाडाला लागतात. या गुंड्यांपासून भारतीय लोक धागे विणून वस्त्रप्रावरणे बनवतात.
कापसासाठी इंग्रजी शब्द आहे कॉटन. हा शब्द अल कुटून या अरेबिक शब्दाचा अपभ्रंश आहे. इसवीसन ६०० मध्ये प्रभावशाली अरब राजा होता. कापूस सर्वत्र पसरत असला तरी इंग्लंडमध्ये तो येण्यासाठी १५ वे शतक उजाडावे लागले होते. या वेळेपर्यंत रोमनांनी कापूस लागवड देखील सुरु केली होती आणि आफ्रिकेसारख्या खंडात आता गरीब लोकदेखील कापसापासून बनविण्यात येणारे कपडे वापरू लागले होते. १६ व्या शतकात अमेरिकेमध्ये कापसाच्या एका नव्या जातीचा शोध लागला. या जातीमुळे नंतर जगाच्या इतिहासात उलथापालथ झाली. चाणाक्ष ब्रिटिशांनी वेळीच कापसाचे महत्त्व ओळखले. ईस्ट इंडिया कंपनीमार्फत भारतावर कब्जा करीत ही नवी जात देशभर प्रसारित केली. दरम्यानच्या कालावधीतच औद्योगिक क्रांती झाली. धाग्यांपासून बिया वेगळ्या करणाऱ्या यंत्राचा १७९३ मध्ये शोध लागला. त्यामुळे कापसापासून धागे निर्मितीची प्रक्रिया खूपच सुलभ झाली. अमेरिकेत यानंतर प्रत्येक दशकात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र विस्तारात गेले आणि उत्पादन दुप्पट झाले. अमेरिकेत पिकणारा कापूस ब्रिटनमध्ये यायचा. १८६० पर्यंत ब्रिटनमध्ये यंत्रमाग, कापड गिरण्या, स्पिनिंग मशीन आदींचे शोध लागून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणे, कापड विणून त्याचे कपडे शिवून ब्रिटिश लोक जगभर विकू लागले.
परंतु अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याला उतरती कळा लागली. कारण, अमेरिकेतून कापूस आयात करणे फारच अवघड बनून गेले. याला पर्याय म्हणून ब्रिटिशांना कापसाचा दुसरा स्रोत मिळवणे महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधले गेले, ते आकाराने मोठ्या कापूस लागवडीसाठी अत्यंत योग्य हवामान असणाऱ्या भारताकडे. १८१८ मध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित झाल्यानंतर पुढील दीडशे वर्ष भारतीय शेतकऱ्यांचे शोषण करीत ब्रिटिश कापड उद्योग आणि पर्यायाने ब्रिटिश अर्थव्यवस्था उर्जितावस्थेत आली.
कापूस कसा तयार होतो?
जगात अमेरिकेत कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त असून, भारताचा तिसरा क्रमांक लागतो. कापसासाठी कोरडे हवामान, कमी पाऊस आणि साधारणपणे २४ ते ३० अंश सेल्सियस तापमान आवश्यक असते. हे पीक कमी पाण्यावर घेतले जाते. पूर्ण वाढीसाठी या पिकाला साधरणतः ५ ते ७ महिने लागतात. सुरुवातीच्या अवस्थेत कापसाचे झाड हे अशक्त असल्यामुळे त्याची फार निगा घ्यावी लागते. बिया पेरलेली जमीन पुरेशी ओलसर आणि खाते टाकून पोषणमूल्य वाढवलेली असावी लागते, कापसाचे मूळ जमिनीत खोलवर जाते, त्यामुळे चिखलयुक्त, दगडं नसलेली जमीन कापसाच्या पिकासाठी चांगली असते, पेरणी झाल्यानंतर साधारणपणे महिन्याभरात बियांना कोंब फुटतो. या वेळी योग्य वाढीसाठी उबदार हवामान असणे आवश्यक असते. भारतात साधारणतः एप्रिल, मे महिन्यांमध्ये कापसाच्या बियांची पेरणी केली जाते. झाडाला फुले येण्याची प्रक्रिया साधारणपणे दिड ते दोन महिन्यांमध्ये सुरु होते आणि त्यापुढील आठवड्यात त्याची वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच राहते. फुलांची वाढ होत असतानाच फुलाच्या आतमध्येही फळ, ज्याला आपण कापसाचे बोंड म्हणतो, तेही वाढू लागते. ही कापसाची बोन्डेदेखील २, ३ सेमी इतकी मोठी होईपर्यंत वाढत राहतात. याला सर्वसाधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
थोड्या तापमानात आणि पोषणमूल्यांमध्ये पूर्ण वाढ झालेली कापसाची बोंडे फुटतात आणि मग त्यातून पांढऱ्या शुभ्र धाग्यांचा कापूस बाहेर पडतो. कापसाच्या बोंडाच्या आत सेल्युलोजने बनलेले हजारो धागे असतात. जस जसे बोंड वाढते, तसतसे बोंडाच्या आतमधील बियांपासून हे धागे बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच राहते. कापसाच्या एका छोट्या बोंडात साधारणतः ३० ते ३५ बिया असतात. या प्रत्येक बीमधून सेल्युलोजच्या साखळ्या तयार होऊन वाढत असतात. पूर्ण वाढ झालेल्या कापसाच्या बोंडात ५० हजार सेल्युलोजचे धागे असतात. बोंडाच्या आतील छोट्या जागेत अनेक बियांपासून सेल्युलोजचे धागे वाढत असल्याने ते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. तापमान आणि बाहेरच्या गोष्टींनुसार त्यांचे लांब किंवा आखूड धाग्यांमध्ये रूपांतर झालेले असते. कमी जागेत वाढत असल्यानेच, तसेच एकपदरी वाढत असल्याने त्यांची घनता कमी असते. ते दाट आणि पांढरे शुभ्र झालेले असतात. जेव्हा सेल्युलोज धागे छोट्या बोंडात मावत नाहीत, तेव्हा बोंड फुटून त्यातून कापूस बाहेर पडतो.
उमललेला कापूस
हा कापूस भारतात शेतमजुरांकडून हाताने तोडणी करून काढला जातो. तर विकसित देशांमध्ये ही सर्व प्रक्रिया यंत्राद्वारे केली जाते. ताजा काढलेला कापूस कोरड्या जागी व्यवस्थित ठेवावा लागतो. अन्यथा उन्हात आणि आर्द्रतेत त्याचे गुणधर्म जातात, प्रत खराब होते आणि काही वेळा पांढरी झळाळी देखील निघून जाते.
गुणधर्म
आपण बघितलेच की, कापूस सेल्ल्युलोजनेच बनलेला असतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लुकोसिलिक बंधाने हजारो मोनोबार जोडून सेल्ल्युलोजचा बहुवारक बनतो. कापसाच्या अनेक जाती आहेत, त्यावरूनच त्याचे गुणधर्म विकसित होतात. लांब धागा हा उच्च प्रतीचा मानला जातो, तर अत्यंत आखूड धागा दुय्यम प्रतीचा. साधारणपणे कापसाचे धागे १२ ते २० मायक्रोमीटर एवढेच रुंद असतात. तर, त्यांची लांबी १ ते ६ सेमी एवढी असते. त्यांची घनता १.५४ ग्रॅम/सीसी असून, त्यांना लकाकी असते. तीव्र अम्लांचा कापसावर लगेच परिणाम होऊन त्याचे विघटन होते. आम्लारीच्या द्रावणामध्ये मात्र कापसाचे धागे अभिक्रीत होत नाहीत. काही प्रकारच्या कीटकांपासून / विषाणूंपासून कापूस विघटित होऊ शकतो. म्हणून कपड्यांची किडीपासून नीट काळजी घ्यावी. उन्हाचा कापसावर विशेष परिणाम होत नाही. परंतु, १५० अंशाच्या पुढील तापमानास ते गरम केल्यास कापूस करपतो आणि त्याचा कोळसा होतो. कापूस आगीमध्ये लगेचच पेट घेतो. चांगल्या प्रतीच्या कापसाचे कपडे किंवा इतर गोष्टी आरामदायी असतात. त्यामध्ये घाण, पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. तसेच, त्यामध्ये एकदा रंग मिसळला की तो टिकून राहतो. कापसाचे धागे मजबूत असतात आणि ते यंत्राद्वारे धुतले जाऊ शकतात.
कापसाचे धागे कसे बनतात
साधारणपणे एक ते दीड इंच लांबीचे कापसाचे धागे कापडाच्या गिरणीमध्ये येतात. पहिल्या टप्प्यात त्याचे पिंजण होते आणि कापसापासून अनेक अशुद्धी दूर केल्या जातात. आपण या आधी हे लक्षात घेतले पाहिजे की कापसापासून बिया वेगळ्या करण्याची यंत्रेही उपलब्ध आहेत. मात्र, सामन्यत: हे काम शेतकरीच करतो. पिंजलेला कापूस एक सलग स्वयंचलित यंत्राद्वारे धाग्यांच्या रूपात प्रस्थापित केला जातो. पिंजण कापसाच्या धाग्यांना ओढून सरळ देखील करते. या यंत्राद्वारेच कापसाचा मऊ धागा तयार होतो. विणकाम यंत्राद्वारे हे धागे सिरीज किंवा ताणाबाणा पद्धतीने एकमेकांत गुंतवून, विणून मोठे तागे तयार केले जातात. तयार तागे धुतले जातात. त्यामध्ये आवश्यकतेनुसार रंग मिसळले जातात किंवा त्यावर छपाई केली जाते. काही यंत्रे शर्ट, स्वेटर किंवा रग बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारे वापरली जातात.
कापसाचे उपयोग
कापूस हा जगातील सर्वात जास्त वस्त्रप्रावरणांमध्ये वापरला जाणारा धागा आहे. जगभर प्रतिवर्षी सुमारे ६० दशलक्ष टनांपेक्षा जास्त कापसाचे धागे तयार होतात. भारत कापूस वापरण्यात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगभरात सुमारे ८० देशांमध्ये कापसाचे उत्पादन होते. परंतु ६० टक्क्यांपेक्षा अधिक कापूस एकट्या चीन आणि भारतामध्येच तयार होतो. महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्रप्रदेश ही तीन राज्ये कापूस पिकविण्यात अग्रेसर आहेत. कापडनिर्मितीमध्ये कापूस प्रचंड प्रमाणात वापरला जातो. नेहमीचे शर्ट, टी शर्ट , पँट, स्वेटर, स्कार्फ, रुमाल, साड्या, टोपी, लहान मुलांचे कपडे, सॉक्स, डेनिम, कॉटन जीन्स अशा सर्व प्रकारचे बहुगुणी कपडे कापसापासून बनलेले असतात. टॉवेल्स, बेडशीट्स, पडदे, सोफा कव्हर, गाड्या, उषा आणि पिलो कव्हर अशा हजारो घरगुती कपाटातील वापरातील वस्तू कापसाने बनविलेल्या असतात. कापसाचा पुनर्वापरही करता येतो. त्यामुळे स्वस्तातील कपडे, गाद्या अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत बनवता येतात. सूट, जॉगिंग पॅन्ट, होजियरी असे विशेष मुलायम आणि आरामदायक कपडेही कापसामध्ये बनविलेले असतात.
कापडाव्यतरिक्त कापसाचा उपयोग माशांचे जाळे, कॉफी फिल्टर तसेच तंबू मंडप बनविण्यासाठी होतो. सेल्युलोजपासून बनविलेले नायट्रोसेल्युलोज हे एक्सप्लोजिव्ह रसायन आहे. जगातील पहिला चिनी कागद कापसापासून बनला होता. पूर्वी दोरखंडदेखील कापसापासून बनत. बुक बाइंडिंगसाठीही कापसाचे धागे वापरले जातात. कापसाचे तेल काही ठिकाणी स्वयंपाकासाठी वापरले जाते. वैद्यकीय उपकरणांमध्ये, तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये कापसाच्या किंवा सेल्युलोजने बनविलेल्या रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कापसापासून बनलेले मिश्र धागे, जसे कापूस -पॉलिस्टर, कापूस-रेशीम आजकाल सर्वत्र वापरले जातात. यापासून बनवलेले कपडे अधिक आरामदायी तसेच स्वस्त असतात. सेल्युलोजचे दुसरे रूप असणाऱ्या कापसाची अशी ही रंजक कहाणी आहे.
————–