सीएसआयआरने विकसित केलेली निळ्या रंगाची शाई १९६२ पासून सर्व निवडणुकांमध्ये वापरण्यात येत आहे
संशोधन, २७ एप्रिल २०१९
देशभर सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. मतदानाचा महत्वाचा भाग असणाऱ्या निळ्या रंगाच्या शाईवर काही जणांनी आक्षेप घेतले आहेत. मतदान केल्याची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीवर लावण्यात येणारी शाई काही तासांत पुसली गेल्याची तक्रार काही मतदारांनी केली आहे. मात्र, ही शाई मोठ्या संशोधनानंतर आणि चाचण्यांनंतर तयार करण्यात आली असून, तिच्या रचनेबाबत कोणतीही शंका घेता येणार नाही असे, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये मतदानाच्या वेळी मतदारांच्या डाव्या तर्जनीवर लावण्यात येणारी निळ्या रंगाची शाई वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वतीने १९६० च्या दशकात विकसित करण्यात आली होती. या शाईचे उत्पादन करण्याचे कंत्राट कर्नाटक सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या म्हैसूर पेंट्स अँड व्हॉर्निश लिमिटेडला देण्यात आले. तेव्हापासून म्हैसूर पेन्ट्सकडूनच शाईचे उत्पादन केले जाते. यंदाच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगातर्फे १० मिलीलीटरच्या २६ लाख बाटल्यांची ऑर्डर म्हैसूर पेंट्सला देण्यात आली आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये २१.५ लाख शाईच्या बाटल्या वापरण्यात आल्या होत्या.
मतदानातील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदान केल्याची खूण देण्यात यावी अशी कल्पना पहिल्या निवडणुकीदरम्यान मांडण्यात आली. सीएसआयआरच्या अंतर्गत असणाऱ्या दिल्लीतील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने (एनपीएल) त्यावर मोठे संशोधन करून दीर्घकाळ डाग राहील आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रियेने तो सहजपणे पुसला जाणार नाही, तसेच त्वचेला इजा पोचणार नाही अशी शाई (इंडेलिबल इंक) विकसित केली. या शाईचे पेटंट नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनआरडीसी) नावाने नोंदण्यात आले.
मतदान केल्याची खूण म्हणून लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये प्रामुख्याने सिल्व्हर नायट्रेट वापरण्यात आले आहे. या रसायनाची प्रकाशाशी प्रक्रिया होताच ते गडद रंगाचे होते. म्हणूनच गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये ही शाई ठेवण्यात येते. याशिवाय शाई लवकर सुकावी यासाठी काही प्रमाणात अल्कोहोलही त्यात मिसळले जाते. पाणी आणि निळा रंगाच्या डायचाही शाईमध्ये समावेश आहे. बोटाच्या त्वचेवर आणि नखावर ही शाई लावताच अल्कोहोलमुळे काही क्षणांत ती सुकते. खोलीतील प्रकाश, तसेच मतदाराच्या शरीराच्या तापमानामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन शाईची गडद रंगाची खूण अगदी त्वचेच्या पेशींवर उमटते. पेशींवरील ही खूण पाणी, साबण किंवा कोणत्याही रासायनिक प्रक्रियेने मिटवता येऊ शकत नाही. त्वचेवरील मृतपेशींची जागा नव्या पेशींनी घेतल्यावरच ती खूण पूर्णपणे पुसली जाते. तसेच नख वाढून शाईचा डाग अगदी नखाच्या टोकापर्यंत येतो. नख कापल्यावरच त्यावरून डाग नाहीसा होतो. या प्रक्रियेला अधिकाधिक महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. प्रत्येक वेळी या शाईच्या अनेक नमुन्यांच्या तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच निवडणूक आयोगाकडून त्या देशभरातील केंद्रांवर पाठवण्यात येतात.
म्हैसूर पेंट्सतर्फे उत्पादन होणाऱ्या या शाईचा १९६२ पासून भारतातील सर्व निवडणुकांमध्ये वापर केला जातो. फक्त भारतातच नाही, तर कॅनडा, तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, कंबोडिया, घाना, नायजेरिया, मालदीव, मंगोलिया आदी ३० देशांमध्ये ही न पुसली जाणारी भारतीय शाई वापरण्यात येते.
आता शाई स्वतंत्रपणे बोटावर लावण्याऐवजी थेट मार्कर पेन वापरण्याचा प्रस्ताव म्हैसूर पेंट्सने निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. मार्कर पेनसाठी आवश्यक शाई तयार करण्यासाठी एनपीएलला विनंतीही करण्यात आली आहे. दुसरीकडे एनपीएलतर्फे अदृश्य शाईही विकसित करण्यात येत असून, अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशातच ती दिसू शकेल.
देशात विविध क्षेत्रांसाठी आवश्यक तंत्रज्ञान तयार करण्याचे काम सीएसआयआरतर्फे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून करण्यात येत आहे. मतदानातील गैरप्रकार कसा रोखता येईल, असा प्रश्न शास्त्रज्ञांसमोर ठेवण्यात आला, तेव्हा लवकर पुसली न जाणारी आणि त्वचेसाठी सुरक्षित अशी शाई विकसित करून त्यांनी लोकशाहीच्या रक्षणामध्ये आपली महत्वाची भूमिका बजावली. मतदान प्रक्रियेतील छोटासा पण महत्वाचा भाग असणाऱ्या शाईच्या निर्मितीमागेही संशोधन आहे हे आपल्याला माहित असायलाच हवे.
——
Please follow and like us: