समीक्षा सोनुने
महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांग ही विविध प्रकारच्या वनस्पति आणि प्राणीमात्रांनी समृद्ध आहे. सह्याद्री पर्वत रांग ही जैवविविधतेने समृद्ध आहे. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने (Zoological survey of India) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील ९४००० ओळखण्या योग्य प्राणी प्रजातींपैकी, महाराष्ट्रात ५४६० प्रजाती आहेत, ज्या देशातील प्राण्यांच्या सहा टक्के आहेत. आपल्याला लाभलेला सह्याद्री सारखा समृद्ध नैसर्गिक वारसा ही आपल्या पूर्वजांनी सोपवलेली संपत्ति आहे, जी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यन्त सुखरूप पोहचवायची आहे. आजवर शेकडो प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशाच नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्रजातींना लुप्तप्राय प्रजाती (Endangered species) म्हणतात.
कोणत्याही प्रजातीला लुप्तप्राय प्रजाती ठरवण्यासाठी काही निकष अवलंबले जातात
१ लोकसंख्येत मागील १० वर्षांमध्ये / तीन पिढ्यांमध्ये, ५० ते ७० टक्के किंवा अधिक घट झाली असल्यास, ती प्रजाती लुप्तप्राय संबोधली जाते.
२ प्रजातीचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५००० वर्ग किमीपेक्षा कमी (किंवा स्थानिक लोकसंख्या क्षेत्र ५०० वर्ग किमीपेक्षा कमी)
३ प्रजातीतील प्रौढ (Adult) लोकसंख्येचा आकार २५०० पेक्षा कमी.
४ प्रजाती पुढील २० वर्षांत नामशेष होईल, असा सांख्यिकीय अंदाज (statistical data).
वरील निकषांनुसार महाराष्ट्रातील अनेक प्रजाती लुप्तप्राय प्रजाती म्हणून ओळखल्या जातात. किमान ३२५ जागतिक स्तरावर धोक्यात असणाऱ्या प्रजाती पश्चिम घाटात आढळतात.
त्यातील काही प्रजाती खालील प्रमाणे-
लुप्तप्राय प्राणी
१ कोंडाणा उंदीर [ मिलार्डिया कोंडाणा ((Millardia kondana) ] :-
हा एक निशाचर उंदीर आहे जो फक्त भारतात आढळतो. हा उंदीर कधीकधी घरटे बांधण्यासाठीही ओळखला जातो.
निवासस्थान: उष्णकटिबंधीय(Tropical) आणि उपोष्णकटिबंधीय(subtropical) कोरडी पानझडी जंगले आणि उष्णकटिबंधीय स्क्रब.
वितरण: महाराष्ट्रात पुण्याजवळील लहान सिंहगड पठारापासून सुमारे एक वर्ग किमी. समुद्रसपाटीपासून सरासरी सुमारे १२७० मीटर उंचीवरून नोंदवले गेले. धोके: मुख्य धोके म्हणजे अधिवास(habitat) नष्ट होणे, वनस्पतीं नष्ट करणे आणि पर्यटन.
२ काळवीट [ अँटिलोप सर्व्हिकाप्रा (Antilope cervicapra) ]
काळवीट (अँटीलोप सर्विकप्रा) ही भारतीय उपखंडातील मूळ मृगाची प्रजाती आहे . नर आणि मादींचा रंग विशिष्ट असतो. नर काळवीट गडद तपकिरी, काळे आणि पांढरे असतात आणि त्यांना लांब, वळणदार शिंगे असतात, तर मादी शिंग नसलेली भुरकट रंगाची असते . काळवीट मूळतः ईशान्येकडील भाग वगळता भारताच्या मोठ्या भूभागावर सापडायचे.
वितरण: आज काळवीटांची लोकसंख्या महाराष्ट्र, ओरिसा, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या मध्य भारतातील काही लहान भागात असलेल्या भागात मर्यादित आहे.
धोके: प्रजातींना मुख्य धोके म्हणजे शिकार , अधिवास नष्ट करणे, रोग, प्रजनन आणि पर्यटक.
लुप्तप्राय पक्षी
१ वन घुबड [हेटरोग्लॉक्स ब्लेविटी (Athene blewitti)] :-
२०१८ पासून वन घुबड IUCN रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त म्हणून सूचीबद्ध आहे, लोकसंख्या 1,000 प्रौढ पेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे . या घुबडाचा आकार लहान (२३ सेमी) आहे. वन घुबड एक तुरा असलेले एक सामान्य घुबड आहे. इतर घुबडपेक्षा यानंच्याकडे तुलनेने मोठी कवटी आणि चोच असते. वितरण: वन घुबड (हेटेरोग्लॉक्स ब्लेविटी) दक्षिण मध्य प्रदेश, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात आढळतात. निवासस्थान: कोरडे पानझडी जंगल
धोके: वृक्षतोड करणे, झाडे जाळणे आणि तोडणे, जंगलातील घुबडांच्या मुसळ आणि घरट्यांचे नुकसान.
२ द ग्रेट इंडियन बस्टर्ड [आर्देओटिस निग्रीसेप्स (Ardeotis nigriceps) ]
आडवे शरीर आणि लांब उघड्या पायांचा मोठा शहामृगासारखा दिसणारा पक्षी, हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यांपैकी सर्वात वजनदार पक्षी आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड बेकायदेशीर शिकारीमुळे अजूनही धोक्यात आहे. परिणामी IUCN रेड लिस्टमध्ये ग्रेट इंडियनचा समावेश गंभीरपणे धोकादायक (Critically endangered) म्हणून करण्यात आला आहे.
वितरण: द ग्रेट इंडियन बस्टर्ड (अर्डियोटिस निग्रीसेप्स) किंवा इंडियन बस्टर्ड मुख्यतः महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्या आणि राजस्थान आणि गुजरातमधील शुष्क प्रदेशांपुरते मर्यादित आहे.
धोके: भारतीय उपखंडातील कोरड्या मैदानावर एकेकाळी सामान्य होते, आज फारच कमी पक्षी जिवंत आहेत आणि प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, शिकार आणि त्यांचे अधिवास गमावल्यामुळे गंभीरपणे धोक्यात आले आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरड्या गवताळ प्रदेश आणि झाडी यांचा समावेश आहे.
लुप्तप्राय वनस्पती
१ गंधविराहित हळद [कर्कुमा इनोडोरा ब्लॅट (Curcuma inodora blatt) ]
गंधविरहित हळद ही बारमाही औषधी वनस्पती आहे. फक्त भारतामध्ये आढळून येते. स्नायूंच्या वेदना, मनोदैहिक विकारांवर उपचार आणि बद्धकोष्ठतेच्या पारंपारिक औषधांमध्ये वापरली जाते बारमाही औषधी वनस्पती जी 120 सेमी उंच वाढू शकते. फुले मोठी, आकर्षक, गुलाबी-जांभळ्या रंगाची असतात.
वितरण – महाराष्ट्रात ते उत्तर कर्नाटकपर्यंत सापडत असल्याची नोंद आहे.
धोके – अधिवास नष्ट होणे , जास्त कापणी (औषधीसाथी वापर आणि बागायती व्यापारासाठी)
२ अश्वगंधा (Withania somnifera)
भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला आस्कंद, अश्वगंधा, ढोरकामुनी, ढोरगुंज, कामरूपिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते. आयुर्वेद उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. बारमाही झुडूप 35-75 सें.मी. पर्यंत उंच वाढते. फुले लहान, हिरव्या आणि बेल (घंटा) आकाराचे असतात.
वितरण :- भारतात, आश्वगंधा प्रमुखतः मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांत उत्पादित केला जातो.
धोके :- अधिवासाची हानी, जास्त कापणी, हवामानातील बदल, कीटक आणि रोग हे घटक अश्वगंधा लोकसंख्येत घट होण्यास हातभार लावतात.
ही काही मोजक्या लुप्तप्राय प्रजातींची उदाहरणे आहेत . यांसारख्या असंख्या प्रजाती जगभरात लुप्त झाल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लुप्त होत जाणाऱ्या
प्रजातींच्या नोंदी साठी IUCN मार्फत RED LIST ( लाल यादी ) जाहीर होते. या यादीमध्ये मुख्यतः नऊ गट असतात. ते खालील प्रमाणे –
१) नामशेष (Extinct किंवा EX) – प्रजातीचा एकही जिवंत सदस्य नाही.
२) जंगलातून नामशेष (Extinct in the Wild किंवा EW) – प्रजात जंगलांमधून पूर्णपणे नामशेष झाली आहे आणि याचे राहिलेले सदस्य फक्त प्राणीसंग्रहालयात किंवा
त्यांच्या मूळ निवासस्थानापासून वेगळे एखाद्या कृत्रिम ठिकाणी जिवंत आहेत.
३) अतिशय चिंताजनक (Critically Endangered किंवा CR) – प्रजात जंगलांमधून नामशेष होण्याचा मोठा धोका आहे
४) चिंताजनक (Endangered किंवा EN) – प्रजात जंगलांमधून नामशेष होण्याचा धोका आहे
५) असुरक्षित (Vulnerable किंवा VU) – प्रजातिचे अस्तित्व जंगलांमध्ये असुरक्षित असण्याची शक्यता आहे
६) निकट असुरक्षित (Near Threatened किंवा NT) – प्रजात जवळच्या भविष्यात नामशेष व्हायची शक्यता आहे
७) मुबलक (Least Concern किंवा LC) – प्रजातीला खूप कमी धोका आहे – मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत क्षेत्रात आढळणारी प्रजात
८) माहितीचा अभाव (Data Deficient किंवा DD) – प्रजातीबद्दल कमी माहिती उपलब्ध असल्याने तिची संरक्षण स्थिती आणि तिला असणाऱ्या धोक्यांचा अंदाज
लावता येत नाही
९) अमूल्यांकीत (Not Evaluated किंवा NE) – प्रजातीच्या संरक्षण स्थितीचे आय.यू.सी.एन.च्या मानदंडांवर मूल्यांकन केले गेलेले नाही.
या प्रत्येक गटांमध्ये जगभरातील असंख्य प्रजातींच्या नोंदी आहेत. परंतु नामशेष होण्यापासून थांबवल्या जाण्याची टक्केवारी खूप कमी आहेत आहे . जैवविविधता त्यातून होणारे आर्थिक फायदे आणि त्या जैवविविधतेचे सांस्कृतिक महत्व जपण्यासाठी तसेच विविध वैज्ञानिक संशोधनासाठी लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. प्रजातींना लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी सामान्य माणसाचे , तुमचे आणि माझे योगदान जास्त महत्वाचे आहे. आपल्या परिवारात तसेच समाजात आपण जैवविविधातेबद्दल जागरूकता वाढवणे. निसर्गाला हानी करणाऱ्या गोष्टी कमीत कमी वापरणे. जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहणे व नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन करणे. या आणि अशा अनेक छोट्या छोट्या मार्गांनी आपण आपल्या निसर्गाला वाचवू शकतो. आपल्या छोट्याशा कृतीने ‘वसुधैव कुटुंबकम’ सार्थ ठरू शकते.
————–