– डॉ. मंदार नि. दातार
कालिदासाचा उल्लेख आला की मेघदूताचा उल्लेख अपरिहार्यच आहे. किंबहुना मेघदूतामुळेच आषाढाच्या पहिल्या दिवसाला महाकवी कालिदास दिन म्हणतात. मेघदूत.. ब्रह्मवैवर्तपुराणातील एका कथेवर प्रेरित होऊन महाकवी कालिदासाने हे काव्य लिहिलं असं मानतात. या महाकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातील असल्याचे मानले जाते. मंदाक्रांता वृत्तात लिहिलेल्या या काव्याचे पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे भाग पाडले जातात. एका यक्षाला एका शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून विरह प्राप्त होतो व त्याला रामगिरी पर्वतावर राहावे लागते. त्याची पत्नी हिमालयात कैलासपर्वतावरील अलका नगरीत वसलेली असते. आषाढाच्या पहिल्या दिवशी तो उत्तरेकडे जाणारा मेघ पाहतो आणि तो त्या मेघमार्फत आपल्या पत्नीला संदेश पाठवू पाहतो. अशी काहीशी कथा मेघदूताची आहे.
रामगिरी ते अलकानगरी या मार्गावरचे वर्णन पूर्वमेघात केले आहे. कालिदासाने मेघाचा रामगिरीपासून अलकापुरीचा मार्ग कसा जातो, वाटेत कोणते पर्वत, नद्या, अरण्ये, कोणकोणती रम्य नगरे आणि स्थळे लागतील याचे रसभरीत वर्णन केले आहे. य स्थळांसोबतच तिथल्या निसर्गाची फार सुंदर वर्णने मेघदूतात आहेत. या साऱ्या वर्णनांमध्ये अनेक वनस्पती, त्यांचे सौंदर्य, वनस्पतींचे अधिवास फार अनोख्या भाषेत मांडले आहेत. कालिदासाच्या रसिक नजरेला भावलेल्या या फुलांचा ओझरता परिचय या लेखात करून द्यायचे योजले आहे.
मेघदूताचा मराठी अनुवाद आजपर्यंत बऱ्याच जेष्ठ, जाणत्या कवींनी केला आहे, त्यात कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ. श्रीखंडे, रा. प. सबनीस, ना. ग. मोरे, वसंतराव पटवर्धन, गोविंद ओझरकर, सी. डी. देशमुख, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, द. वें. केतकर, अ. ज. विद्वंस, वसंत बापट असे अनेक श्रेष्ठ. या अनेक अनुवादात काही निवडक श्लोक घेऊन आपण कालिदासाची वनस्पती निरीक्षणे समजून घेणार आहोत.
रामगिरी पर्वतावर, म्हणजे सध्याच्या नागपुराजवळील रामटेक पर्वतावर विरहकालात राहणाऱ्या यक्षाच्या मनात आषाढीचा पहिला मेघ पाहिल्यावर त्याच्यामार्फत आपल्या पत्नीला संदेश पाठवावा असा विचार येतो. त्या मेघाचे स्वागत तो कुड्याची किंवा कुटज्याची फुले देऊन करतो. बा. भ. बोरकरांनी या श्लोकाचा मंदाक्रांता वृत्तातच केलेला हा मराठी अनुवाद:
“धाडू कांते कुशल, भिजल्या श्रावणी धीर द्याया,
या भावे तो फुलुनी सजला, त्याजला आळवाया
वाही ताजी कुटज कुसुमे, कल्पिल्या अर्घ्यदाने
बोले शब्द स्मितमधुरसे, स्वागताच्या मिषाने“
आजच्या काळातही उन्हाळ्यात फुलायला लागणारी कुड्याची फुले पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फुलत राहतात. याच फुलणाऱ्या कुटजपुष्पांनी मेघाचे स्वागत करण्याची कल्पनाच खूप अभिनव आहे. रामगिरीहून निरोप घेऊन जाणाऱ्या मेघाच्या मार्गात प्रथम आंब्याच्या पक्व फळांनी बहरलेला आम्रकूट नावाचा पर्वत येतो. हा आम्रकूट म्हणजे सध्याच्या काळातील नर्मदेचे उगमस्थान असणारे अमरकंटक असावे. आम्रकूटाच्या नंतर पुढे एका श्लोकात मेघाच्या मार्गामध्ये असणाऱ्या वनांमध्ये कदंब पुष्पाचा, कर्दळीच्या उल्लेख आहे. मेघाला उद्देशून असणाऱ्या या श्लोकाचा कुसुमाग्रजांनी केलेला अनुवाद असा:
“हिरव्या पिवळ्या कदंब पुष्पातील पाहुनी केसर
नवकडलींचे सेवुनि अंकुर नदीकिनाऱ्यावर
गंधवती धरतीचा हुंगित वास वाढता वनी
सूचित करितील हरीण तुझा पथ होऊनि हर्षातुर “
पावसाळ्याच्या सुरुवातीस मध्य भारतातले ऐन फुलतात. हे कुकुभ किंवा ऐनाचे वृक्ष तुझ्या मार्गात गिरीगिरीवर फुललेले असतील. पण माझे निरोप पोहचवण्याचे काम तुला करायचे असल्याने त्यांची संगत निर्धाराने सोडून जा असे यक्ष मेघाला सांगतो. या मार्गात वाढणाऱ्या जांभळी आणि केवड्याचे सुंदर वर्णन एका श्लोकात आहे. अगदी याच काळात जांभळी फुलांनी लगडलेल्या असतात. त्यांचं आणि केवड्याचे वर्णन कुसुमाग्रजांच्या अनुवादात:
“सुफळ सावळ्या पहा जांभळी , दशार्ण देशांतरी ,
उसासुनी केतकीबने हो वनसिमा पांढरी,
हंस ही येतील विसावण्याला येथे काही दिन ,
ग्रामखगांची दिसतील घरटी वृक्ष देवळांवरी “
नदीकिनारा हा या दोन्ही वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास. एका श्लोकात त्याचा उल्लेख आहे. मेघाच्या मार्गावरती असणाऱ्या राननदीच्या तीरावरील जुईच्या ताटव्यांचे वर्णन पुढच्या श्लोकात येते.
रम्य जुईचे ताटवे राननदीच्या तिरी
भिजतील कलिका शिंपडता तूं नाजूक पहिल्या सरी
वनांमधल्या उंबरांची वर्णनेही पुढे आहेत. मेघाबरोबर वाहणारे वारे हे उंबर पिकवीत जातात अशी सुंदर कल्पना कालिदासाने केली आहे. ती कुसुमाग्रजांच्या अनुवादात:
तहान शमता श्वास टाकिते धरती गंधांकीत
सेवन करिती सोंडेने गज होऊनि आनंदीत
समीर ते पिकवीत कानना मधील औदुंबर
देवगिरीला येतील मेघा, तुजसंगे वाहत
उज्जैनच्या महाकाल शंकरासाठी तू जास्वंदी अर्थात जपापुष्पांसम संध्येचे तेज धारण कर असे यक्ष मेघाला सांगतो. तर मार्गावर लागणाऱ्या दशपुरनगरीतील भामिनींच्या नेत्रविभ्रमांची तुलना कुंदफुलांवर उडणाऱ्या भ्रमराशी करतो. देवदार या खोडामध्ये राळ असलेल्या वृक्षामुळे त्या भागात वणवे लागतात याचाही उल्लेख कालिदासाने केला आहे. हे देवदार वृक्ष मेघाच्या मार्गांवर अगदी शेवटी म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी दिसतात. मानससरोवरातील हंसांसोबत तेथील कमळफुलांचे उल्लेखही अनेकदा येतात.
उत्तरमेघात अलका नगरी, तेथील जीवन, यक्षाची पत्नी, तिची अवस्था यांचे वर्णन येते. अलका नगरीमधील स्त्रियांचे अलंकारही वनस्पतींचे आहेत. चिंतामणराव देशमुखांच्या अनुवादात हे सारे वनस्पतींचे अलंकार:
हाती नाचे कमल, अलकी खोवली बालकुंदे
लोध्राचे ते सुम-रज मुख श्रीपती श्वेतता दे
कानी साजे शिरस, फुलली केशपाशी अबोली
जेथे नारी अनुचर तुझे नीप सीमंति घाली
ही सारी आभूषणे तर वृक्ष देतातच, पण वस्त्रे, सुगंधित सुमने, मदिरा, रंग देणारा रस असे सारे काही अलका नगरीत वाढणारा कल्पतरूच देतो. हा कल्पतरू म्हणजेच मंदाराचा वृक्ष, माझ्या कांतेने वाढवलेला आहे असेही यक्ष म्हणतो. सूर्योदयाच्या वेळी मार्गांवर मंदारपुष्पे पडलेली दिसल्यास रात्री त्या मार्गावरून अधीर रमणी गेल्या आहेत असे समज असेही यक्ष मेघाला सांगतो. सबनीसांच्या अनुवादातील या ओळी:
त्वरित चालता मंदारफूले केसातुनिया पडली
पर्णभूषणे, सुवर्णकमळे कर्णावरील गळती
यक्षाच्या घराजवळ बकुळ आणि अशोक वृक्ष लावलेले आहेत. अशोकाचा वृक्ष रमणींनी लत्ताप्रहार केल्याशिवाय फुलात नाही, तर बकुळीला फुलण्यासाठी मद्याच्या चुळा लागतात. या दोन वृक्षांचे कालिदासाने केलेले वर्णन कुसुमाग्रजांच्या अनुवादात:
अशोक आणिक बकुळ मिरविती नाव पर्णांची कळा
लाल लतांचे पाश वेढिती त्या वृक्षांच्या गळा
एक सखीच्या वाम पदाची अभिलाषा बाळगी
दुसरा वांछी तिच्या मुखातुन द्राक्षार्काच्या चुळा
अलका नगरीत वाढणाऱ्या देवदार किंवा सरलतरुचा सुगंध घेऊन जे वारे दक्षिणेकडे येतात. या वाऱ्यांना तीचा स्पर्श झाला असेल म्हणून मी कवटाळतो, असे माझ्या पत्नीची भेट झाली की तिला आवर्जून सांग असेही यक्ष मेघाला सांगतो.
ही झाली कालिदासाच्या निसर्गप्रेमी लेखणीतून उतरलेली काही वनस्पतींची सुंदर वर्णने. यातून जाणवते कालिदासाची निरीक्षणशक्ती, त्याची निसर्गप्रेमी नजर. त्या काळातील वर्णन केलेल्या फुलांचे फुलण्याचे योग्य ते हंगाम, फुलांचे आढळ हे सारे आज जसेच्या तसे आहे, आजच्या काळातील शास्त्रीय मापदंड लावायचे झाले तरीही. कालिदासाच्या प्रतिभेबद्दल कोण काय बोलणार, त्याच्या काव्याकडे कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी त्याची हिमालयाएवढी उत्तुंगता जाणवते. आमच्या मराठी कवींनी मात्र या काव्याचे सुंदर करून हे नक्षत्रलोकीचे उद्यान जणू आपल्या परसातच लावले आहे. सुरंगी, सुंगंधी फुले तर लक्षावधी वर्षे इथे फुलत आहेत, पण ती कालिदासाच्या नजरेने पाहायची झाली तर जास्तच देखणी, विलोभनीय वाटतात.
———–