डिस्कव्हरी
– मयुरेश प्रभुणे
माणसांमध्ये लिखाणाची कला विकसित झाली नसती, तर ज्ञानाचा प्रसार आजच्यासारखा झाला नसता. गुफांमध्ये, भिंतींवर, भोजपत्रांवर किंवा कातडीवर विविध रंगांच्या साह्याने चित्रे रेखाटण्याची कला पाच हजार वर्षांहून पूर्वी विकसित झाली. मात्र, अक्षरे, लिपी विकसित होऊ लागली तशी इसवीसन पूर्वी चौथ्या शतकात लिखाणासाठीची साधनेही विकसित झाली. कागदाचा आणि रंगांचा शोध लागलेला असताना लेखणी म्हणजेच पेनही विविध स्वरूपात आकाराला येऊ लागले.
सुरुवातीला इजिप्तमध्ये मेणाचा लेप असलेल्या पाटीवर बांबूच्या काडीने अक्षरे गिरवण्यात येत असत. इजिप्तमध्येच इसवीसनापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकात सर्वप्रथम शाईचा वापर झाल्याची नोंद आढळते. त्यानंतर ज्याला इंडिया इंक म्हटले जाते, ती शाई चीनमध्ये तयार होऊ लागली (चिनी लोकांनी बनवलेली काळी शाई इंग्रजांनी भारतात प्रथम पाहिली म्हणून तिला इंडिया इंक म्हटले गेले). या शाईमध्ये पाईन वृक्ष जाळून त्याच्या धुरातून तयार होणारी काजळी, जाळलेली हाडे, कोळसा यांचा वापर केला जात असे.
इसवीसनापूर्वी चौथ्या शतकामध्ये पक्ष्यांच्या पिसांचा वापर लिखाणासाठी होऊ लागला. शाईमध्ये पिसाचे टोक बुडवून त्यामध्ये चढलेली शाई संपेपर्यंत कागदावर किंवा भोजपत्रावर लिखाणासाठी वापरण्यात येत असे. अशाच प्रकारे बांबूच्या काडीला टोक करून ते शाईमध्ये बुडवूनही लेखणी तयार केली जात असे. रोमन साम्राज्यातील पॉम्पेई शहरात इसवीसनाच्या पहिल्या शतकात तयार केलेली तांब्याची निब पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडली. यावरून आजच्या शाईपेनचा शोध सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच लागला होता असा दावा करण्यात येतो. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या आधी जगभर मोठ्या पक्ष्यांच्या पिसांचा आणि बांबूच्या लेखणीचा लिखाणासाठी जगभरात वापर होता. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात चौदाव्या शतकापासून बोरूचा लिखाणासाठी वापर सुरु झाला. या काळात अनेक पोथ्या, ग्रंथ, पत्रे बोरूनेच लिहिले जात. गवताच्या प्रकारातील बोरूच्या खोडाला चाकूने तिरका छेद दिला की पेन तयार होत असे. नीळ आणि पाणी एकत्र करून त्याच्या शाईमध्ये बोरू बुडवून लिखाण केले जात असत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत बोरूचा वापर लिखाणासाठी केला जात असे.
आजच्या पेनचा विकास मात्र औद्योगिक क्रांतीसोबत एकोणिसाव्या शतकात सुरु झाला. बर्मिंगहॅमच्या जॉन मिशेल यांनी १८२२ मध्ये धातूच्या निबचे उत्पादन सुरु केले. लिखाणासाठी पिसे किंवा काडीला चाकूने सतत धार करण्याची गरज त्यामुळे उरली नाही. धातूच्या त्रिकोणी, टोकदार पत्र्याच्या तुकड्याला मधून छेद देऊन ही निब तयार करण्यात आली होती. लाकडाच्या कांडीला जोडलेली निब शाईमध्ये बुडवून लिखाण करणे तुलनेने सोपे झाले. पुढे १८८४ मध्ये न्यूयॉर्कमधील स्टेशनरीचा व्यापारी असणाऱ्या एल. ई. वॉटरमन याने सर्वप्रथम फाउंटन पेन विकसित केले. या पेनच्या टोकाला धातूची निब आणि मागे जोडलेल्या भागामध्ये शाई भरण्याची सुविधा होती. यामुळे सतत दौतामध्ये पेन बुडवून लिखाण करण्याची गरज राहिली नाही. पाठोपाठ १८८८ मध्ये जॉन लाऊड याने बॉलपेनचे पेटंट मिळवले. पेनच्या टोकामध्ये अगदी लहानसा धातूचा बॉल बसवल्यामुळे पेनच्या नव्या युगाची सुरुवात झाली. निबच्या टोकांमध्ये बसवलेला बॉल टोक जसे कागदावरून सरकेल तसा मुक्तपणे फिरत असे आणि वरून येणारी शाई बॉलवर उतरून कागदावर सहज अक्षरे उमटत. आजच्या काळात वापरात असलेले बॉलपेन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अर्जेंटिनामध्ये पेशाने संपादक असणाऱ्या लाझलो बिरो आणि त्याचा भाऊ ग्योर्जी यांनी बनवले. हे पेन आकाशात उंचावर उडणाऱ्या विमानामध्येही सहज वापरता येत असे. युद्धानंतर मात्र बॉलपेन जगभर सर्वत्र वापरात आले.
पुढे टाईपरायटर आणि कम्युटरचे युग आले तरी पेनचा जमाना अजूनही सुरु आहे. नव्या तंत्रज्ञानाने पेनचे रुपडेही पालटत आहे. मात्र, शाई आणि निब यांचे एकत्र नाते गेल्या दोन हजार वर्षांत काही बदलले नाही. प्राचीन काळापासून माणूस वापरत असलेल्या साधनांमध्ये पेनचे महत्व अनन्यसाधारण आहे.
———