ऑगस्टमध्ये ला निनाचा अंदाज
प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती संपून न्यूट्रल स्थिती निर्माण झाल्याचे अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने नुकतेच जाहीर केले. महासागराचे तापमान आणखी कमी होऊन येत्या ऑगस्टमध्ये तिथे ला निना विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) म्हटले आहे. यंदा प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती जाऊन ला निना विकसित होण्याचा अंदाज जगभरातील हवामानशास्त्र संस्थांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्तवला होता. त्याला अनुसरून प्रशांत महासागराचे तापमान कमी झाल्याचे निरीक्षणही आता नोंदवण्यात आले आहे. सीपीसीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून पूर्व प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या दरम्यान नोंदले जात आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये तयार झालेली एल निनोची स्थिती जाऊन न्यूट्रल स्थिती तयार झाल्याची ही चिन्हे आहेत.
सीपीसीच्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरामध्ये जुलैपर्यंत न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता ६० टक्के असून, ऑगस्टमध्ये ला निना विकसित होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यापर्यंत प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती कायम राहू शकते. विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या ०.५ अंशांपेक्षा सलग तीन महिने जास्त असेल तर त्या स्थितीला एल निनो; तर याच्या विरुद्ध स्थितीला ला निना म्हणतात. एल निनो काळात देशात बहुतेक वर्षी अपुरा पाऊस, तर ला निना असताना देशात बहुतेक वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो असे आकडेवारी सांगते. ला निनामुळे यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात जास्त पावसाची शक्यता असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मंगळावरील विवरांना भारतीय नावे
मंगळाच्या दक्षिण गोलार्धातील तीन विवरांना भारतीय नावे देण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडून (आयएयू) त्यासंबंधी नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या (पीआरएल) शास्त्रज्ञांनी या विवरांचे नामकरण लाल, मुरसान आणि हिलसा असे केले आहे. लाल या विवराचा नैसर्गिक इतिहासही शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून उलगडला आहे.
पीआरएलच्या शास्त्रज्ञांनी नासाच्या मार्स रेकॉनेसन्स ऑर्बायटरवरील (एमआरओ) शॅलो रडारच्या (शॅरॅड) नोंदी वापरून मंगळाच्या दक्षिण गोलार्धात असलेल्या ज्वालामुखीजन्य प्रदेशाचा अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष त्यांनी २०२१ मध्ये सायन्स डायरेक्ट या नियतकालिकात प्रकाशित केले. या प्रदेशातील तीन निनावी विवरांना भारतीय नावे द्यावीत यासाठी शास्त्रज्ञांनी आयएयूकडे अर्ज केला होता. त्याला मान्यता मिळाली असल्याचे आयएयूने नुकतेच जाहीर केले.
मंगळाच्या २१ अक्षांश दक्षिण आणि २०९ रेखांश पश्चिम या ठिकाणी असलेल्या ६५ किलोमीटर व्यासाच्या विवराला ज्येष्ठ भू भौतिकशास्त्रज्ञ आणि पीआरएलचे माजी संचालक प्रा. देवेंद्र लाल यांच्या सन्मानार्थ लाल असे नाव देण्यात आले आहे. प्रा. लाल हे १९७२ ते ८३ या काळात पीआरएलचे संचालक होते. लाल विवराच्या परिघावर प्रत्येकी दहा किलोमीटर व्यासाची दोन विवरे आहेत. त्यांपैकी एकाला उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील गाव मुरसान आणि दुसऱ्याला बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील गाव हिलसा यांची नावे देण्यात आली आहेत. पीआरएलचे संचालक प्रा. अनिल भारद्वाज यांचे मुरसान हे जन्मगाव असून, संशोधनात सहभागी शास्त्रज्ञ प्रा. राजीव रंजन भारती यांचे हिलसा हे जन्मगाव आहे. ‘चंद्रावर विक्रम लॅण्डर उतरले होते त्या ठिकाणाच्या शिवशक्ती या नावाला यावर्षी मार्चमध्ये आयएयूने मान्यता दिली होती. आता मंगळावरील ठिकाणांना भारतीय नावे जाहीर झाल्यामुळे विविध ग्रहांवरील भूवैशिष्ट्यांना भारतीय नावे देण्यासाठी खगोल अभ्यासकांना प्रेरणा मिळेल.
दीर्घिकांच्या धडकेची गॅमा किरणांमध्ये नोंद
आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञांनी दोन दीर्घिकांच्या (गॅलेक्झी) धडकेतून निर्माण झालेल्या गॅमा किरणांचा अभ्यास केला आहे. आपली आकाशगंगा, ‘मिल्कीवे’पासून सुमारे तीन कोटी प्रकाश वर्षे अंतरावर असलेल्या ‘कॅथरिन्स व्हील’ या दीर्घिकांच्या जोडीच्या रचनेची नवी वैशिष्ट्ये या अभ्यासातून उलगडल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आयुकातील प्रा. वैदेही पालिया आणि प्रा. ध्रुबा सैकिया यांनी केलेले संशोधन नुकतेच ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये मँचेस्टर विद्यापीठ आणि हॉंगकॉंग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दोन दीर्घिकांच्या धडकेची घटना नोंदवली होती. एका सर्पिलाकार दीर्घिकेच्या (इएसओ १७९- १३) अगदी केंद्राजवळून दुसरी दीर्घिका (बुलेट गॅलेक्झी) गेल्यामुळे झालेल्या धडकेतून तरंग निर्माण झाले. या तरंगांमुळे दोन्ही दीर्घिकांमधील वायू ठराविक क्षेत्रात एकवटून ताऱ्यांची निर्मिती क्षेत्रे तयार झाली. या क्षेत्रांकडून येणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे दीर्घिकांच्या धडकेचे क्षेत्र एखाद्या अग्नि वर्तुळासारखे दिसते. म्हणून या क्षेत्राचे नामकरण ‘कॅथरिन्स व्हील’ असे करण्यात आले.
‘कॅथरिन्स व्हील’चा या आधी दृश्य, रेडिओ आणि अल्ट्राव्हायोलेट या लहरींमध्ये अभ्यास करण्यात आला होता. आयुकाच्या शास्त्रज्ञांनी नासाच्या फर्मी गॅमा रे स्पेस टेलिस्कोपच्या नोंदी वापरून प्रथमच या दीर्घिकांच्या जोडीचा गॅमा किरणांच्या साह्याने अभ्यास केला. ताऱ्यांच्या निर्मिती क्षेत्रातून तयार होणारे वैश्विक किरण, आंतर तारकीय वायू आणि उत्सर्जनाची क्षेत्रे यांच्या आंतर प्रक्रियांमुळे गॅमा किरण उत्सर्जित होत असावेत, असा शास्त्रज्ञांनी अंदाज बांधला आहे.
खासगी कंपनीच्या ‘अग्निबाणाची’ चाचणी यशस्वी
अग्निकुल कॉसमॉस या भारतीय खासगी कंपनीने बनवलेल्या ‘अग्निबाण’ या रॉकेटची नुकतीच यशस्वी चाचणी झाली. अग्निबाणमध्ये जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड सेमी क्रायोजिनीक इंजिन वापरण्यात आले. रॉकेटचा आराखडा, निर्मितीपासून उड्डाणापर्यंतची प्रक्रिया यशस्वीपणे राबवणारी अग्निकुल कॉसमॉस ही स्कायरूटनंतर दुसरी भारतीय कंपनी ठरली आहे.
श्रीहरीकोटा बेटावरील ‘धनुष्य’ या देशातील पहिल्या खासगी अवकाश प्रक्षेपण केंद्रावरून ३० मे रोजी सकाळी सात वाजून १५ मिनिटांनी अग्निबाणचे यशस्वी उड्डाण झाले. जमिनीपासून आठ किलोमीटरची उंची गाठून किनाऱ्यापासून आठ किलोमीटर दूर हे रॉकेट बंगालच्या उपसागरात पाडण्यात आले. येत्या काळात पूर्ण क्षमतेच्या अग्निबाण रॉकेटच्या साह्याने ३०० किलो वजनाच्या उपग्रहांना पृथ्वीभोवती ७०० किलोमीटरच्या कक्षेत पाठवण्यात येईल. नुकतीच पार पडलेली चाचणी त्या प्रक्रियेतील पहिला टप्पा होती. पूर्णतः नियंत्रित स्वरूपातील या चाचणीमधून नियोजित सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे अग्निकुलतर्फे सांगण्यात आले.
अग्निबाण रॉकेटमध्ये ‘अग्निलेट’ या जगातील पहिल्या एकसंध ‘थ्रीडी प्रिंटेड’ सेमी क्रायोजिनीक इंजिनाचा समावेश असून, केरोसीन आणि द्रवरूप ऑक्सिजन या बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या इंधन आणि ऑक्सिडायझरवर ते चालते. आवश्यकतेनुसार फक्त ७२ तासांमध्ये या इंजिनाची निर्मिती शक्य असून, मोबाईल लाँचरच्या साह्याने उपग्रहांचे प्रक्षेपण करता येऊ शकते. छोट्या उपग्रहांची बाजारपेठ लक्षात घेऊन अग्निबाण रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे.
अग्निकुल कॉसमॉस ही स्टार्टअप कंपनी २०१७ मध्ये आयआयटी मद्रासच्या तांत्रिक साह्याने सुरू झाली. कंपनीतील कर्मचारी आणि संशोधकांचे सरासरी वय २३ आहे. केंद्र सरकारने २०२० मध्ये खासगी कंपन्यांसाठी अवकाश क्षेत्र खुले केल्यानंतर या कंपनीने नाविन्यपूर्ण कल्पना वापरून थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन विकसित केले. अग्निकुल कॉसमॉसच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अग्निकुल कॉसमॉसच्या युवा टीमचे अभिनंदन केले. ——————