डिस्कव्हरी
– मयुरेश प्रभुणे
अगदी लहानपणी मुळाक्षरे गिरवण्यापासून ते पुढे इंजिनिअरिंग किंवा विज्ञानातील आकृत्या काढेपर्यंत पेन्सिल ही कायम आपल्या शिक्षणातील एक महत्वाचा भाग बनलेली असते. चित्रकार, आर्किटेक्ट यांच्यासाठी तर पेन्सिल आयुष्यभराची सोबती असते. पेन्सिलने रेखाटावे आणि चुकल्यास रबराने ते खोडावे आणि पुन्हा रेखाटावे ही प्रक्रिया आयुष्यात प्रत्येकाने पार पाडलेली असते. लहानपणी अक्षरे आणि रेषांना वळण आणण्यासाठी पेन्सिलचाच वापर केला जातो. अत्याधुनिक तंत्राने बनवलेल्या पेनच्या जमान्यात आजही पेन्सिलचे महत्व कायम आहे.
पेन्सिलला मराठीत आपण शिसपेन्सिल असा शब्द वापरतो. आपणच काय पण युरोपातल्या अनेक भाषांमध्येही पेन्सिलसाठी अशाच आशयाचे शब्द रूढ आहेत. पण गम्मत ही आहे की, पेन्सिलमध्ये आजपर्यंत शिसे कधीच वापरले गेले नाही. आणि शिसे वापरले जातही नाही. ज्याला आपण शिसे समजतो, ते खरे म्हणजे ग्रॅफाइट आणि मातीचे मिश्रण असलेली कांडी असते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये ग्रॅफाइटचे मोठे साठे सापडले. अत्यंत शुद्ध आणि मृदू स्वरूपात असणारे हे ग्रॅफाइट सुरुवातीला तोफेच्या गोळ्यांचे साचे बनवण्यासाठी वापरले जाऊ लागले. मात्र, ग्रॅफाइटचा आणखी एक महत्वाचा उपयोग इंग्लिश लोकांना समजला. ग्रॅफाइट कागदावर घासल्यास आपला छाप मागे सोडत असल्याचे तेव्हाच्या लोकांच्या लक्षात आले. ग्रॅफाइटला सुरुवातीला शिशाचा दगड समजले जात. मात्र, पुढे रसायनशास्त्र विकसित झाल्यावर ग्रॅफाइट हे कार्बनचे संयुग असून, दगडी कोळशासारखा पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. या ग्रॅफाइटच्या कांड्या बनवून त्या भोवती दोरी किंवा चामडे गुंडाळून लोकांनी लिखाणासाठी त्याचा वापर सुरु केला.
पुढे १५६०च्या आसपास सिमोनिओ आणि लिंदीआना बेर्नाकोटी या इटालियन जोडप्याने लाकडाच्या साच्यात ग्रॅफाइटची कांडी बसवून लिखाण करता येऊ शकते हे दाखवून दिले. आजच्या पेन्सिलची ही पहिली अवस्था म्हणता येईल. मात्र, पुढे प्रत्यक्ष घन स्वरूपातील ग्रॅफाइटला आकार देण्याऐवजी ग्रॅफाइटची पावडर पेन्सिलमध्ये वापरली जाऊ लागली. १६६२ मध्ये जर्मनीत ग्रॅफाइट, सल्फर आणि अॅन्टीमनी यांचे मिश्रण पेन्सिलसाठी वापरण्यात आले. आज वापरात असलेली पेन्सिल हा खरेतर नेपोलियनच्या युद्धाचा परिणाम म्हणता येईल. इंग्लंड आणि जर्मनीत उपलब्ध असणारे ग्रॅफाइट युद्ध काळात फ्रान्सला उपलब्ध होऊ शकत नव्हते. तेव्हा निकोलस जॅक्स काँटे याने ग्रॅफाइट आणि मातीच्या मिश्रणातून फ्रान्ससाठी आजच्या पेन्सिलची आवृत्ती बनवली. त्यासाठी ग्रॅफाइटची बारीक पावडर आणि माती एकत्रित मळून या मिश्रणाला साच्यातून हवे तसे आकार दिले जात. या मिश्रणाला भट्टीतून भाजल्यावर पेन्सिलसाठी आवश्यक कांड्या तयार होत.
भट्टीतून काढलेल्या कांड्यांना मेणाचा मुलामा दिल्यावर लिहिताना त्यात हलकेपणा येऊ लागला. ग्रॅफाइट आणि मातीच्या मिश्रणाच्या या कांड्या आज दोन भाग असलेल्या लाकडाच्या साच्यात बसवल्या जातात. हे साचे एकमेकांना जोडून त्याला वरून रंग दिला जातो. ग्रॅफाइटमध्ये मातीचे प्रमाण कमी किंवा अधिक करून पेन्सिलचा कठीणपणा निश्चित केला जातो. ग्रॅफाइटमध्ये माती जास्त प्रमाणात मिसळल्यास पेन्सिल अधिक कठीण बनते, तर ग्रॅफाइटचे प्रमाण जास्त असल्यास ती मृदू असते. याचवरून एच (हार्डनेस) आणि बी (ब्लॅकनेस) ही पेन्सिलच्या रंगाची प्रतवारी निश्चित होते. गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळ अशा प्रकारची पेन्सिल वापरात आहे.
आज जगभरात वर्षाला १४ अब्जपेक्षा अधिक पेन्सिल बनवल्या जातात. पेन्सिलने लिहिलेली अक्षरे रबराने खोडल्याशिवाय जात नाहीत. पेन्सिलच्या लिखाणावर आर्द्रता किंवा कोणत्याही किरणांचा परिणाम होत नाही. त्यामुळे आजही अनेक जण लिखाणासाठी पेन्सिलला प्राधान्य देतात. भारतात प्रसिद्ध असणारी नटराज पेन्सिल हिंदुस्थान पेन्सिल या कंपनीतर्फे बनवली जाते. ही कंपनी दररोज ८० लाख पेन्सिलींची निर्मिती करते. यावरूनच पेन्सिलचे आपल्या जीवनातील स्थान लक्षात येईल.
——–