– मयुरेश प्रभुणे
अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- नासाचे अंतराळवीर बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स गेले अडीच महिने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) मुक्कामी आहेत. बोईंग कंपनीच्या स्टारलायनर या अवकाश यानाच्या चाचणीसाठी आठ दिवसांच्या नियोजनाने अवकाशात गेलेल्या दोघा अंतराळवीरांचा अवकाशातील मुक्काम यानातील तांत्रिक बिघाडामुळे वाढत गेला. एकीकडे माध्यमांमधून नासा आणि बोईंग कंपनीवर याबाबत टीका होत असताना, अंतराळवीरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचा निर्वाळा दोन्ही संस्थांकडून देण्यात येत आहे.
पार्श्वभूमी
नासाने १९६० च्या दशकात आपला मानवी अवकाश कार्यक्रम सुरू केला. प्रशिक्षित अंतराळवीरांना पृथ्वी नजीकच्या कक्षेत नेऊन पुन्हा जमिनीवर सुरक्षित आणण्यासाठी नासातर्फे मर्क्युरी, जेमिनी, अपोलो, स्पेस शटल हे कार्यक्रम राबवण्यात आले. एका महाकाय रॉकेटच्या साह्याने अवकाश यानाचे प्रक्षेपण करायचे. त्यानंतर पृथ्वीभोवतीच्या कक्षेत आपले निर्धारित काम पूर्ण करून अवकाश यान पुन्हा अलगद समुद्रावर उतरवायचे, असे सुरुवातीच्या मोहिमांचे स्वरूप होते. त्यानंतर स्पेस शटल या विमानसदृश, पुनर्वापर करता येणाऱ्या यानाचा नासाने तीन दशके वापर केला. विविध सहा स्पेस शटलच्या साह्याने अवकाश स्थानकाची उभारणी, हबल स्पेस टेलिस्कोप; तसेच अनेक उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे कामही करण्यात आले. त्यांपैकीच कोलंबिया या स्पेस शटलच्या अपघातामध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता.
खासगी अवकाश प्रवास सेवा
स्पेस शटल कार्यक्रम २०११ मध्ये थांबवल्यानंतर नासाला आपल्या अंतराळवीरांची अवकाशात ने – आण करण्यासाठी नव्या अवकाश यानांची गरज होती. अमेरिकेच्या बदललेल्या अवकाश धोरणानुसार मानवी अवकाश कार्यक्रमासाठी आवश्यक यानांची किंवा रॉकेटची बांधणी करणे, अंतराळवीरांच्या अवकाश प्रवासाचे नियोजन करणे या बाबी नासाच्या प्राथमिक उद्दिष्टांमधून वगळून नासाने संशोधनाच्या अवकाश मोहिमांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले. मानवी अवकाश यान आणि त्यासाठी लागणारी रॉकेट अमेरिकी उद्योगांकडून बनवून घेऊन अंतराळवीरांच्या प्रवासाचे कंत्राटही खासगी कंपन्यांना देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी कंपन्यांना आवश्यक असणारे तांत्रिक आणि सुमारे आठ अब्ज अमेरिकी डॉलरचे प्राथमिक अर्थ साहाय्य नासाने देऊ केले.
या योजनेला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला. त्यांपैकी बोईंग आणि इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या कंपन्यांची अंतराळवीरांची अवकाशात ने- आण करण्यासाठी अंतिम निवड झाली. बोईंग कंपनीने स्टारलाइनर हे यान विकसित केले, तर स्पेस एक्सने ड्रॅगन. स्पेस एक्सचे साहित्याची ने आण करणारे यान २०१२ पासून वापरले जात असून, मानवी अवकाशयान २०२० पासून वापरले जात आहे. अमेरिकेने या यानांसह कंपनीच्या फाल्कन या रॉकेटलाही मानवी अवकाश मोहिमांसाठी प्रमाणित केले आहे. याचा अर्थ स्पेस एक्सची ही सर्व यंत्रणा नासाच्या अवकाश मोहिमांसाठी व्यावसायिक पद्धतीने वापरण्यात येईल.
दुसरीकडे बोईंग कंपनीचे स्टारलाइनर २०१७ मध्ये प्रत्यक्षात येणे अपेक्षित होते. २०१९ मध्ये मानवरहित यानाची चाचणी अयशस्वी ठरली. २०२२ मध्ये दुसरी चाचणी यशस्वी झाली असली, तरी अवकाश स्थानकाला जोडले जाताना यानात तांत्रिक दोष निर्माण झाले. अनेक वेळा विलंब झाल्यानंतर अखेर युनायटेड लाँच अलायन्स कंपनीच्या ऍटलास व्ही रॉकेटच्या साह्याने यंदाच्या वर्षी स्टारलाइनरच्या मानवी यानाची प्रत्यक्ष अवकाशातील चाचणी (क्रू फ्लाइट टेस्ट) करण्याचे निश्चित झाले. मे महिन्यात दोन वेळा तांत्रिक कारणांमुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. अखेर पाच जून रोजी अवकाश प्रवासाचा मोठा अनुभव असलेल्या बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना घेऊन स्टारलाइनर आठ दिवसांच्या प्रवासासाठी अवकाशात झेपावले.
स्टारलाइनरची क्रू फ्लाइट टेस्ट
स्टारलाइनर अवकाशात झेपावताच काही वेळात बोईंगच्या नियंत्रण कक्षाला यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये हेलियम वायूची गळती झाल्याचे आढळून आले. प्राथमिक तपास केल्यावर या गळतीमुळे मोहिमेला काही धोका नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, हेलियमची गळती वाढत गेल्याने स्थिती काहीशी चिंताजनक बनली. स्टारलाइनर अवकाश स्थानकाच्या कक्षेपर्यंत पोचले. यापुढे प्रत्यक्ष अवकाश स्थानकाला यान जोडण्यासाठी यानावरील २८ थ्रस्टरचे आवश्यकतेनुसार प्रज्ज्वलन करून नेमका कोन आणि वेग साधण्यासही सुरुवात झाली. मात्र, २८ पैकी पाच थ्रस्टर काम करत नसल्याचे दिसून आले. यान काही तासांत अवकाश स्थानकापर्यंत पोचणे अपेक्षित असताना अखेर सहा जूनला अतिशय काळजीपूर्वक यान स्थानकाला जोडले गेले आणि दोघे अंतराळवीर आयएसएसवर दाखल झाले. मात्र, हेलियम गळती आणि पाच थ्रस्टर निकामी झाल्यामुळे यानाला सुरक्षितपणे जमिनीवर परत कसे आणायचे हा प्रश्न निर्माण झाला.
पुनरागमनाची प्रतीक्षा
इकडे जमिनीवर बोईंग आणि नासाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. बिघाडाचे नेमके कारण शोधण्यास वेळ लागत असल्याने आठ दिवसांची मोहीम सुरुवातीला दोन आठवडे, मग ४५ दिवस आणि अखेर ९० दिवसांपर्यंत चालू शकते, असे नासातर्फे स्पष्ट करण्यात आले. नासाच्या यापूर्वीच्या जेमिनी, स्पेस शटल आदी मोहिमांमध्येही हेलियमची गळती होणे हा नियमित प्रकार होता. हेलियमचा वापर यानाचा इंधन यंत्रणेत दाबासाठी केला जातो. गळती होऊनही स्टारलाइनवर यान पुन्हा जमिनीवर आणण्याइतका पुरेसा हेलियम साठा असून, गरज पडल्यास अवकाश स्थानकावरील हेलियमही वापरता येऊ शकतो, असे नासातर्फे सांगण्यात आले.
दोघा अंतराळवीरांनी स्टारलाइनरवर प्रवेश करून दोन वेळा २८ थ्रस्टरची एक एक करून चाचणी घेतली. त्यांपैकी नुकत्याच २७ जुलैला पार पडलेल्या चाचणीत पाच पैकी चार थ्रस्टर सुरू झाल्याचे निष्पन्न झाले. आता यानावर २८ पैकी २७ थ्रस्टर कार्यरत असून तेवढी यानाला पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी पुरेशी असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. थ्रस्टरच्या साह्याने यानाचा वेग आणि दिशा नियंत्रित करता येत असल्याने कक्षा बदल करताना आणि वातावरणात शिरताना त्यांचे काम महत्वाचे असते.
तरीही अंतराळवीरांचा मुक्काम वाढत का आहे, हा प्रश्न उरतोच. यावर बोईंग कंपनीचे म्हणणे आहे की, स्टारलाइनरचे ही चाचणी मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर नासातर्फे कंपनीला अवकाश प्रवासासाठी प्रमाणित करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षी ऑगस्टमध्ये पहिली व्यावसायिक सेवेची मोहीम पार पडेल. त्या मोहिमेआधी यानातील सर्व दोष काढणे गरजेचे आहे. हेलियम गळती असो किंवा थ्रस्टरमधील बिघाड, हे दोन्ही यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलचे भाग आहेत. वातावरणात शिरताना अंतराळवीरांचा समावेश असलेल्या अवकाश कुपीपासून सर्व्हिस मॉड्यूल वेगळे होऊन वातावरणात नष्ट होऊन जाईल. त्यानंतर यानातील यंत्रणांचा अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे यान आयएसएसला जोडले गेले आहे, तो पर्यंत अधिकाधिक नोंदी जमा करणे आणि चाचण्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आगामी मोहिमेत अनुरूप बदल करता येतील.
स्टारलायनर अवकाशकुपी सप्टेंबरमध्ये अंतराळवीरांविनाच पृथ्वीवर आणण्याचा निर्णय नासा आणि बोईंगने नुकताच घेतला आहे. अवकाश स्थानकावर विल्मोर आणि विल्यम्स यांच्यासह एकूण नऊ अंतराळवीर सध्या राहत आहेत. या सर्वांना पुढील अनेक महिने पुरेल एवढी सामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे दोघा अंतराळवीरांच्या वाढत्या मुक्कामाबाबत चिंता करण्यासारखे काही कारण नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विल्मोर आणि विल्यम्स आता थेट फेब्रुवारी २०२५ मध्ये स्पेस एक्स कंपनीच्या क्रू ९ मोहिमेसोबत पृथ्वीवर परत येणार असल्याचे नासाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. याचा अर्थ आणखी सहा महिने त्यांचा मुक्काम अवकाशात राहणार आहे.
————–