- अमोल कुलकर्णी
मानवाचा इतिहास हा ज्ञात काळापासून लढाईचा राहिला आहे. या लढाया जशा इतर मानवासोबत होत्या तशाच त्या सृष्टीतील इतर घटकांसोबत देखील होत्या. आपली सृष्टी आणि सृष्टीतील सर्व सजीव घटक हे सतत उत्क्रांत होत असतात. ही एक न संपणारी अखंड अशी प्रक्रिया आहे. यात सूक्ष्मजीव देखील येतात. सूक्ष्मजीव हे प्रचंड वेगाने उत्क्रांत होणारे जीव आहेत. यातले काही जीव हे रोगजंतू म्हणून उत्क्रांत झाले. त्यातही फक्त मानवामध्ये रोग उत्पन्न करू शकणारे सूक्ष्मजीव हे मोजकेच असले तरी मानवी इतिहासात त्यांनी आपला ठसा खुपच ठळकपणे उमटवला आहे. मानवी इतिहास या रोगांशिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही इतकं त्यांचं योगदान आहे. हा इतिहास, मानवाने दिलेला लढा, त्यातील यश, अपयश या सर्व गोष्टी रंजक, रोमांचक आणि मन सुन्न करणाऱ्या अशाच आहेत.संसर्गजन्य रोगांनी इतिहास घडवला आहे, बदलला आहे. ह्या रोगांनी मानवी अर्थशास्त्र, शेती, संस्कृती इतकंच काय राजकारण या सर्वांवर थेट परिणाम केला आहे. जाणून घेऊयात संसर्गजन्य रोगांचा हा इतिहास.
इसवीसनपूर्व ३२०० हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. कारण यावर्षी पहिली नागरी वस्ती निर्माण झाली असा ढोबळमानाने एक निष्कर्ष काढला आहे. मेसोपोटोमिया किंवा आजचा इराक, इराण ह्या प्रदेशात नागरिकरणाला सुरुवात झाली आणि याचबरोबर संसर्गजन्य रोगांच्या इतिहासाचा पाया घातल्या गेला. तत्पूर्वी मानव हा ‘भटक्या’, शिकारी ह्या प्रकारात आपलं आयुष्य कंठत होता. शेतीचा शोध लागला असला तरी संपूर्णपणे एका जागी स्थिर राहून शेती करायला मानवाने सुरुवात केली नव्हती. आज जरी आपल्याकडे ठोस पुरावे नसले तरी आपण आपल्या अनुभवावरून सांगू शकतो की माणूस जेव्हा भटक्या अवस्थेत होता तेव्हा संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूचं प्रमाण निश्चितच कमी असणार. याच मुख्य कारण म्हणजे संसर्गजन्य रोग हे जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशातच धुमाकूळ घालू शकतात. त्यामूळे जेव्हापासून नागरीकरण झालं तेव्हापासूनच संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढायला लागला. त्यानंतर पृथ्वीवर इतरही काही ठिकाणी नागर संस्कृती उदयाला आल्या, जस की सिंधू संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, इत्यादी. या सर्व संस्कृतींमध्ये आपल्याला विविध सूक्ष्मजीवांच्या साथीमुळे होणाऱ्या रोगांनी थैमान घातल्याचे पुरावे मिळतात. इजिप्शियन संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे ममी.
इसवीसनपूर्व काळातील काही ममी अशा सापडल्या आहेत की, ज्यांचा मृत्यू देवीच्या रोगामुळे झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर देवीचे व्रण सापडले आहेत. यापुढे जाऊन इतिहासात अजून काय दाखले आहेत? हिप्पोक्रॅट्स हा ज्ञात इतिहासातील पहिला दाखला देणारा डॉक्टर. त्याने काही निरीक्षणे करून ठेवली आहेत. सर्वात आधी त्यानेच रोगांचं वर्गीकरण केलं. त्याच्या अभ्यासानुसार रोग हे मुख्यत्वे २ प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे रोग हे नेहमीच समाजात हजर असतात. तर दुसऱ्या प्रकारचे रोग हे अचानकच दिसायला लागतात आणि मृत्यू घडवून आणतात. त्याच हे निरीक्षण अगदी बरोबर होत. आज आपण सांगू शकतो की हिप्पोकंर्ट्सने उल्लेख केलेला दुसरा प्रकार म्हणजे संसर्गजन्य रोग होय. हे रोग परस्परांच्या संसर्गात आल्याने पसरतात हे काही वर्षात लक्षात आलं होत पण त्यावर असणारे उपाय हे अगदीच विरुद्ध असे होते. उदाहरणार्थ प्लेग हा संसर्गाने पसरतो हे माहित होतं परंतु, त्यावरचे उपाय हे मुख्यत्वेकरून मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी किंवा मेलेल्या व्यक्तीच्या संपत्तीचे काय करावे यावरच लक्ष्य केंद्रित करणारे होते. इतिहासात लिखित स्वरूपात मिळणाऱ्या या दाखल्यानंतर संसर्गजन्य रोगांचा अभ्यास हा कित्येक शतके असाच दिशाहीन सुरु होता.
त्यानंतर आपल्याला या रोगांच्या मुळाशी पोचलेला एक डॉक्टर सापडतो तो म्हणजे, गिरोलामो फ्रॅकस्टोरो. त्याने इसवी सन १५४६ मध्ये एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने काही मूलभूत आणि योग्य असे विचार मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार संसर्जन्य रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य अशा कणांमुळे पसरतात. त्यांना त्याने सेमिनारीया असं म्हंटल. हे कण प्रत्येक रोगासाठी वेगवेगळे असतात. तो अगदी बरोबर होता. पण तो जसा डॉक्टर होता तसाच ज्योतिषी देखील होता. त्याने पुढे असं सांगितलं कि हे कण शनी, गुरु आणि मंगळ या ग्रहांच्या प्रभावाने निर्माण होतात आणि वातावरण प्रदूषित करतात. आणि रोग उत्पन्न करण्यासाठी एका विशिष्ट हवामानात आणि काही खगोलीय परिस्थितीमध्ये या रोगांच्यासाठी पसरायला लागतात. हा एवढा भाग सोडला तर त्याची निरीक्षण अगदी अचूक होती. त्याने हे देखील सांगितलं की हे कण तीन मार्गांनी पसरतात, ते म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या संपर्कात आल्याने, एकमेकांच्या वस्तू वापरल्याने आणि हवेमार्फत. त्याचे हे विचार तेव्हाच्या काळाच्या खूपच पुढे होते. त्याच म्हणणं सिद्ध होण्यासाठी तब्बल २०० वर्षे लागली. सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर सूक्ष्मजीव आपल्याला समजले आणि त्याच म्हणणं पटलं. यानंतर सूक्ष्मजीवांचा अभ्यास सुरु झाला आणि संसर्गजन्य रोगांचं मूळ, ते कशा पद्धतीने रोग उत्पन्न करतात, ते कसे टाळता येतील या प्रश्नांची उत्तर मिळत गेली. पण हिप्पोक्रॅट्स आणि फ्रँकस्टोरो यांच्या दरम्यान कोणकोणत्या संसर्गजन्य रोगांनी धुमाकूळ घातला हे जाणून घेऊयात.
प्लेग हा इतिहासातील एक महत्वाचा संसर्गजन्य रोग आहे. ह्या रोगामुळे भीषण नरसंहार झाला आहे. इतका नरसंहार पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात देखील झाला नव्हता. इसवीसनपूर्व १६० ते १८० युरोपात प्लेगची भयंकर साथ आली आणि ती हान आणि रोमनसाम्राज्य गिळंकृत करून गेली. रोमन साम्राज्याचे लागोपाठच्या दोन्ही सम्राटदेखील या रोगाला बळी पडले आणि जवळपास ५० लाख लोक देखील प्लेगमुळे मरण पावले. इतकी प्रचंड लोकसंख्या नष्ट झाली आणि सोबतच रोमन साम्राज्य देखील. अर्थात हे साम्राज्य नष्ट व्हायला इतर देखील कारणं असली, तरी शेवटचा जबरद्स्त घाव प्लेगनेच घातला. त्यानंतर एकदा परत ४०० वर्षानंतर पुन्हा अशीच साथ युरोपमध्येच आली. यावेळेस जवळपास ९०% लोकसंख्या नष्ट झाली. हा आघात खूपच मोठा होता. त्यातून सावरत असताना इसवीसन १३४५ मध्ये प्लेगची साथ धडकली. ही साथ इटली आणि इजिप्तमध्ये पसरली.
पुढील ५ वर्षात २४ दशलक्ष युरोपियन जनता या रोगाला बळी पडली. लागोपाठच्या या साथींमुळे युरोपात झालेले नागरीकरण नष्ट झाले. परिस्थिती मूळपदावर यायला पुढील कित्येक वर्षे लागली. इतका मोठा नरसंहार करणारा हा रोग उंदराच्या शरीरावर असणाऱ्या पिसवांमार्फत पसरतो हे समजायला एकोणिसावे शतक उजाडावे लागले. १८९४ मध्ये अलेक्झांडर यारसीं आणि किताझाटो यांनी हाँगकाँगमध्ये प्लेगची साथ आली असताना या रोगाचे जंतू शोधले. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये सायमंड यांनी उंदराच्या शरीरावर असणाऱ्या पिसवा कशाप्रकारे रोग संक्रमित करतात हे दाखवून दिले. त्यानंतर दोन वर्षांनी पुण्यात प्लेगची साथ आली आणि त्यात परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्याने रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून करण्यात आला. त्यानंतर जगभरात प्लेगच्या साथीच्या तुरळक नोंदी आहेत. १८९७ मध्ये प्लेगची लस शोधण्यात आली. त्यामुळे खूप प्रमाणात हा रोग नियंत्रणात आला. भारतात शेवटची साथ १९९४ मध्ये आली जिचा उगम सुरत शहरात झाला पण सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले. यावेळेस फक्त ५६ लोकच मरण पावले. रोगाची माहिती, त्याविषयीचं ज्ञान तातडीचे उपाय यामुळे जास्त प्रमाणात हा रोग पसरू शकला नाही. पण या रोगाचा मानवी इतिहासावर असणारा प्रभाव हा निश्चितच मोठा आहे.
प्लेगनंतरचा मोठा रोग म्हणजे देवी. तस बघायला गेलं तर ह्या रोगही तसा धोकादायकच होता परंतु प्लेगच्या मानाने ह्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्याच कारण पूढे येईलच. देवीच्या रोगाच्या साथीचा पहिला उल्लेख हा इसवीसनपूर्व १३५० मध्ये सापडतो. तोदेखील इजिप्तमध्येच. तसेच काही ममीच्या चेहऱ्यांवर देवीचे व्रण देखील सापडले आहेत. त्यानंतर जेव्हा युरोपियन लोक वसाहती करण्यासाठी जगभर फिरायला लागले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत देवी आणि इतर रोगांना देखील नेलं. स्पॅनिश लोक अमेरिका खंडात पोचले तेव्हा हा रोग तिथे नव्हता. पण थोड्याच कालावधीत तिथे युद्ध आणि सोबतच विविध रोगांच्या साथी पसरायला सुरुवात झाली. या सर्व गोष्टींमुळे ९० % स्थानिक अमेरिकन लोकसंख्या नष्ट झाली. यात देवीच्या रोगाचा मोठा वाटा होता. अशाप्रकारे देवीच्या रोगाचा वाटा इतिहासात महत्वाचा आहे. युरोपसारखंच हा रोग पृथ्वीवर सर्वत्र पसरला होता. पण आफ्रिका, चीन आणि भारत इथे या रोगामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत. याचं कारण म्हणजे इथे या रोगाची लस उपलब्ध होती. या रोगातून जे लोक वाचतात त्यांना हा रोग परत होत नाही असं निरीक्षण होत. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि एकदा रोग झाला की रोग्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते हि संकल्पना या देशातील लोकांना माहित नव्हती. तरी देखील देवी झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून काहीकण काढून ते निरोगी व्यक्तींच्या शरीरात लहानपणीच टोचवले जात. त्यामुळे बऱ्याच लोकांना अशी लस लहानपणीच मिळायची. त्यामुळे तिथे हा रोग युरोप इतका पसरला नाही. या लसीचा प्रसार कालांतराने युरोपमध्ये देखील झाला. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने ही लस बनवली. त्याच्याकडे येणाऱ्या गवळ्याच्या मुली या एकदा त्याला सांगत होत्या की, देवीच्या रोगाची साथ आली तरी त्यांना हा रोग होणार नाही, कारण त्यांच्या हातावर पुरळ येऊन गेली आहे. जेन्नरने जेव्हा यामागचं कारण शोधलं तेव्हा तो चकित झाला. कारण त्या मुली खरं सांगत होत्या. गायीच्या स्तनावर देवीसदृश पुरळ यायची. दूध काढताना त्याची लागण काढणाऱ्या व्यक्तीला देखील व्हायची. पण त्यामुळे त्याला देवीच्या रोगाची रोगप्रतिकारक क्षमता येऊन जायची. गायीला ही पुरळ देवीच्या विषाणूच्या जातकुळीतील विषाणूमुळे होत असे. variola नावाचा हा विषाणू तितका जीवघेणा नव्हता. याचाच वापर करून जेन्नरने देवीची लस बनवली आणि संपूर्ण मानवजातीला या रोगापासून मुक्त केले. या रोगाचा खरा वापर जैविक युद्धात करण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात झाला. सुदैवाने ते सगळे प्रयत्न यशस्वी नाही होऊ शकले. पण रशिया-अमेरिका शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देशांनी कृत्रिमरीत्या या रोगाची साथ पसरवण्याचा खूप प्रयत्न केला. आजदेखील या दोन्ही देशांच्या प्रयोगशाळेत देवीचे विषाणू जतन करून ठेवलेले आहेत.
सिफिलिस हा त्यानंतरचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा संसर्गजन्य रोग. या रोगाचा उल्लेख आढळतो साधरणतः १४९० मध्ये. तेव्हा हा रोग स्पेन, इटली आणि फ्रान्स या देशांमध्ये एक त्वचा विकार म्हणून पसरला. पुढील ४० वर्षात सिफलिसने चांगलंच बस्तान बसवलं. खरं म्हणजे हा एक लैंगिक आजार. पण ह्याचा उगम एका त्वचा विकारातून झाला. उत्क्रांत होत होत हा रोग लैंगिक आजार म्हणून स्थिरावला. सिफिलिस हे नाव या रोगाला एका कवितेतून मिळालं. संसर्गजन्य रोगांवर ज्याने पुस्तक लिहिलं आणि ज्याचा उल्लेख आधी आला आहे, त्या गिरोलामो याने १५४६ मध्ये दीर्घ कविता लिहिली ज्यात सिफिलिस नावाच्या एका मेंढपाळाची कथा सांगितली आहे. या देखण्या मेंढपाळाला त्याच्या एका चुकीची शिक्षा अपोलो नावाच्या देवतेकडून होते. त्याच्या नावावरूनच या रोगाला हे नाव मिळालं. या रोगाने जास्त मृत्यू झाले नसले, तरी प्रसिद्ध लोकांना हा रोग झाल्यामुळे या रोगाला प्रसिद्धी मिळाली. उदाहरणार्थ दुसरा जुलियस याला हा रोग झाला होता. हा रोग चार वेगवेगळ्या टप्प्यांवर वाढत जातो. शेवटच्या टप्प्यात हा रोग शरीराच्या इतर भागात पसरतो. हेच काही राजांच्या बाबतीत झालं. त्यामुळे देखील या रोगाला लोक घाबरायला लागले. परंतु युरोपच्या बाहेर या रोगाचा प्रसार फारसा नाही झाला. पाहिलं प्रतिजैविक पेनिसिलीन या रोगासाठी खूपच परिणामकारक ठरलं. याने जवळपास सिफिलिसचा नायनाट केला. आज अगदी काही तुरळक केसेस सापडतात. त्यामुळे हा तितकासा धोकादायक राहिलेला नाही.
सर्दी हा त्यानंतरचा धोकादायक संसर्गजन्य रोग. हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. २०१८ हे वर्ष सर्दीच्या विषाणूच्या शोधाचं शंभरावं वर्ष आहे. वरवर पाहता सर्दीचा एक संसर्गजन्य आजार म्हणून उल्लेख होतो. विषाणूमुळे होणारा सर्वसामान्य त्रास इतकीच सर्दीची ओळख. पण याही पलीकडे इतिहासात सर्दीच्या विषाणूने हाहाकार उडवल्याची उदाहरणं आहेत. एरवी फारसा उपद्रवी नसलेला हा विषाणू किती रौद्ररूप धारण करू शकतो हे या उदाहरणातून दिसतं. त्यामुळे सर्दीच्या विषाणूला शास्त्रज्ञ कधीही दुर्लक्षित करत नाहीत. सर्दीच्या विषाणूचा शोध शंभर वर्षांपूर्वी लागला. त्यावर्षी म्हणजे १९१८मध्ये या विषाणूने आपल्या ग्रहावर शब्दशः थैमान घातले होते. हे थैमान आज ‘स्पॅनिश फ्लू’ या नावाने ओळखले जाते. याचं वैशिष्ट्य हे की त्या वेळेस जगाच्या लोकसंख्येच्या एकतृतीयांश इतकी लोकसंख्या या साथीत नष्ट झाली होती, म्हणजे साधारणतः ५० दशलक्ष. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की फक्त सर्दी इतकी घातक ठरू शकते?पण शास्त्रज्ञ थोडा वेगळा प्रश्न विचारतात, तो म्हणजे आज शंभर वर्षांनंतर आपण या विषाणूवर विजय मिळवला आहे का, आणि दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक येतं. या माहितीवरून बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. त्यातला महत्वाचा प्रश्न हा की, सर्दी इतकी भयंकर असू शकते का? आणि असेल तर हे कसं शक्य आहे?
जर गेल्या शंभर वर्षातील या विषाणूच्या साथी पहिल्या तर आपल्या सहज लक्षात येईल. १९१८च्या H1N1 साथीनंतर १९५७ मध्ये H2N2 ची साथ पूर्व आशियामध्ये पसरली. यावेळी २० लक्ष लोकांचा बळी गेला. याच नाव ठेवण्यात आलं ‘एशियन फ्लू’. त्यानंतर १९६८ मध्ये परत एकदा साथ आली. यावेळी ती चीनमध्ये सुरू झाली आणि सर्वत्र पसरली. यावेळेस प्रकार होता H3N2. दोन वर्षे टिकलेल्या या साथीत ४० लाख लोकांचा बळी गेला. यावेळेस त्याला हॉंगकाँग फ्लू असं नाव देण्यात आलं. त्यानंतर हा विषाणू नवीन रुपात आला २००४ मध्ये. यावेळेस त्याचा उगम होता कोंबड्यांमध्ये. कोंबडीमधून माणसामध्ये हा विषाणू सक्रिय झाला. हा धक्का नवीन होता. खर म्हणजे १९९७ मध्येच व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये याची सुरुवात झाली होती पण २००४ मध्ये त्याची सक्रियता वाढली. याचं वर्गीकरण H5N1 असं झालं आणि नाव बर्ड फ्लू. यावेळेस व्याप्ती जरा जास्त होती, तब्बल १० देशांमध्ये. पण या विषाणूच हे रूप पूर्णपणे धक्कादायक होतं. हा प्रकार पूर्णपणे समजून घेत असतानाच या विषाणूने २००९ मध्ये अजून एक हल्ला केला. पुन्हा मती गुंग होण्याचा अनुभव आपण घेतला. खर म्हणजे याचा प्रकार होता H1N1, तोच 1918 वाला. पण यावेळेस याच जनुकीय रचना त्याच्यापेक्षा खूपच भिन्न होती. काही काळाने लक्षात आलं की हा एक पूर्णपणे नवीन विषाणू होता, जो डुक्कर, पक्षी आणि माणसांमधील विषाणूंच्या एकत्रिकरणातून निर्माण झाला होता. त्यामुळे याच नाव ठेवण्यात आलं स्वाईन फ्लू. यावेळेस तो अमेरिका खंडात उदयाला आला, पण परत एकदा तो आशिया खंडातच फोफावला. त्यातही महाराष्ट्रात त्याच बस्तान चांगलंच बसलं हे देखील नवीनचहोत. याआधी असं एका विशिष्ट भागातच सर्दीने आपला मुक्काम दीर्घकाळ केल्याचा इतिहास नव्हता. त्याही पलीकडे तेव्हापासून दरवर्षी कमी जास्त प्रमाणात याच्या केसेस होत असतात. याच्या साथीचा कुठलाही एक विशिष्ट असा पॅटर्न नाही. त्याचा उगम कसाही होऊ शकतो. इतकीच माहिती शंभर वर्षांत आपण मिळवू शकलो. फ्लूचा अभ्यास अजून चालूच आहे. पोलिओ, देवी यासारखे विषाणू आपण प्रभावी लस आणि प्रयत्नांनी जवळपास नामशेष केले पण वरवर साधा वाटणारा फ्लू आपल्याला अजूनही हुलकावण्या देतो आहे. आपल्या प्रयत्नांना भविष्यात नक्कीच यश येईल अशी आशा आपण नक्कीच बाळगू शकतो.
सर्दीनंतर या शतकातला सर्वात मोठा रोग म्हणजे एड्स. या रोगावर आजदेखील कुठलीही लस किंवा खात्रीलायक इलाज उपलब्ध नाही. हा विषाणूजन्य रोग थेट मानवी रोगप्रतिकारक क्षमतेवर हल्ला करून तिला निकामी करून टाकतो त्यामुळे रोगी विविध आजारांना बळी पडून शेवटी दगावतो. या रोगाचा उगम म्हणजे मानवात नाही, तर एका सस्तन प्राण्यात झाला. तिथून हा विषाणू मानवामध्ये आला असे मानले जाते. त्यानंतर काही समलैंगिक पुरुषांमध्ये हा रोग आढळून आला. आणि त्यानंतर १९८० च्या दशकात अत्यंत वेगाने हा जगभर पसरला. विविध मार्गानी हा पसरत असला तरी लैंगिक संबंध हाच याचा महत्वाचा मार्ग राहिला आहे. आफ्रिका खंडात या रोगाने जास्त बळी घेतले. इतर विकसनशील देशांमध्ये देखील हा विषाणू चांगलाच पसरला. गेल्या काही वर्षांत या रोगाच्या प्रसारावर चांगले नियंत्रण मिळवण्यात जगाला यश आले आहे. याची लस देखील लवकरच उपलब्ध होईल याची आशा आहे.
क्षयरोग हा तसा जुनाच जिवाणूजन्य रोग, पण आधुनिक जगात ह्या रोगाचा धोका खूप वाढला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या जिवाणुंमध्ये वाढत चाललेला प्रतिरोध. एक तर या रोगांवर इलाज उपलब्ध असला तरी तो दीर्घकाळ चालतो. त्यामुळे मध्येच जर इलाज थांबला तर हा जिवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासा होतो आणि रोग आणखी बळावतो. मुख्यत्वे गरीब देशांमध्ये या रोगाने आपले हातपाय पसरले आहेत. अस्वच्छता, गरिबी, अशिक्षितपणा या कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आहे. जगातील एकतृतीयांश लोकसंख्या या जिवाणूंनी संक्रमित असते ही एक धक्कादायक बाब गेल्या काही वर्षात समोर आली आहे.
या आणि इतर जिवाणूजन्य, विषाणूजन्य रोगांनी आज देखील माणसासमोर आव्हान निर्माण केलं आहे. उदाहरणार्थ मलेरिया, इबोला, झिका या रोगांच्या साथी गेल्या काही वर्षात धडकल्या. पण आज आपलं ज्ञान, तंत्रज्ञान, आपले अनुभव, आपल्याला आलेलं भान या सर्वांमुळे आपण या साथी लगेच थोपवू शकलो. या साथी सर्वत्र पसरल्या नाहीत. पण जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत हि लढाई अशीच चालू राहणार हे नक्की. आपलं हे यश पाहता आपण इतिहासातून नक्कीच धडा घेतला आहे असं म्हणता येईल. पण सगळ्यात महत्वाचा धडा म्हणजे कधीही या सूक्ष्मजीवांना कमी लेखून चालणार नाही. पेनिसिलिनच्या शोधानंतर १०० वर्षांच्या आतच आपल्याला नव्या प्रतिजैविकांची तातडीने गरज आहे यातच सर्व काही आलं. त्यामुळे संसर्गजन्य रोग नियंत्रणात आले असले तरी ते कधीही उग्र रूप धारण करू शकतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण निसर्ग सगळ्यांनाच संधी देत असतो. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा इतिहास समजून घेणं हाच आपलं भविष्य सुरक्षित करण्याचा मार्ग आहे.
——