पाच डिसेंबरपासून महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
संशोधन, २ डिसेंबर २०१७
——————————–
ईशान्य मॉन्सूनच्या हंगामातील पहिले चक्रीवादळ (सायक्लोन) ‘ओखी’ सध्या अरबी समुद्रातून प्रवास करीत असून, शनिवारी (२ डिसेंबर) हे चक्रीवादळ लक्षद्वीप बेटांना धडकण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळाची तीव्रता वाढून अतितीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात ते लक्षद्वीपला धडकणार असल्यामुळे अरबी समुद्रातील या बेटांवर आपत्कालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार चक्रीवादळाची तीव्रता समुद्रातच कमी होणार असून, पाच – सहा डिसेंबरदरम्यान तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या (डिप्रेशन) स्वरूपात ते दक्षिण गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकेल. मॉडेलमध्ये वर्तवण्यात आलेली स्थिती प्रत्यक्षात उतरल्यास पाच ते आठ डिसेंबर या कालावधीत कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘किरोगी’ चक्रीवादळातून अवशेष म्हणून राहिलेली ऊर्जा २० नोव्हेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली. २९ नोव्हेंबरला श्रीलंकेच्या आग्नेय दिशेला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण होऊन त्याने वायव्येकडे आपला प्रवास सुरु केला. याच काळात त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचे रूप धारण केले. अरबी समुद्रात प्रवेश केलेल्या या चक्रीवादळाचे नामकरण बांग्लादेशाने ‘ओखी’ असे केले असून, त्याचा अर्थ डोळा असा होतो.

सध्या हे चक्रीवादळ ताशी १३ किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत असून, वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत आहे. ओखीच्या प्रभावामुळे श्रीलंका, दक्षिण तामिळनाडू, केरळमध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेत वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १५ जणांचा बळी घेतला असून, सुमारे दोन लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले आहे. केरळमध्येही १५ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे. ओखीची तीव्रता वाढून अतितीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात ते पुढील चोवीस तासांत लक्षद्वीप बेटांना धडकण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे लक्षद्वीपवर मुसळधार पावसाची शक्यता असून, वादळी वाऱ्यांच्या माऱ्यामुळे झोपड्या पडणे, भिंती पडणे, तसेच विजेचे आणि मोबाईलचे खांब कोसळण्याच्या घटना घडू शकतात असा इशारा आयएमडीने दिला आहे. चक्रीवादळामुळे होणारे नुकसान पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.
ओखी चक्रीवादळाची तीव्रता समुद्रातच कमी होण्याची शक्यता असून, तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्वरूपात ते दक्षिण गुजरात – उत्तर कोकणाकडे सरकेल असे मॉडेलद्वारे दर्शवण्यात आले आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे पाच ते आठ डिसेंबर या कालावधीत कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, पुढील आठवडाभर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

या आधी २००९ मध्ये फियान हे चक्रीवादळ ११ नोव्हेंबर रोजी अलिबाग आणि मुंबईच्या दरम्यान महाराष्ट्रात धडकले होते. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता २० टक्के असून, ते महाराष्ट्रात येऊन धडकण्याची शक्यता अगदी दुर्मिळ असते. ओखीची तीव्रता समुद्रातच कमी होणार असल्यामुळे महाराष्ट्रात ते चक्रीवादळाच्या स्वरूपात प्रवेश करणार नाही.
ओखी पाठोपाठ अंदमानच्या समुद्रात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता मॉडेलमधून दिसून येत आहे. हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये डिसेंबरपर्यंत चक्रीवादळांचा हंगाम असतो.
————————
Please follow and like us: