- मयुरेश प्रभुणे
पहिला उपग्रह, पहिला माणूस अवकाशात पाठवून रशियाने अमेरिकेवर आघाडी घेतली असताना २५ मे १९६१ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी राष्ट्राला आवाहन केले, ‘चालू दशक संपण्याआधी चंद्रावर माणसाला पाठवून पुन्हा सुरक्षित आणण्याचे लक्ष्य देशाने एकदिलाने गाठावे.’ घोषणा करणे सोपे असले, तरी ती प्रत्यक्षात आणणे कठीण असते. त्यातून ही घोषणा, चंद्रावर माणसाला पाठवून पुन्हा सुरक्षित आणण्याची. राष्ट्राध्यक्षांनी देशासमोर ठेवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण अमेरिका खरोखर चंद्रावर जाण्याच्या मोहिमेमध्ये एकदिलाने सामील झाली. चंद्रावर पोचण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रशासनासह नासा आणि देशभरातील सर्व संबंधित संशोधन संस्था, उद्योग यांनी एकत्रितपणे तयारी सुरु केली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त करून माणसाला चंद्रावर उतरवून पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी अगणित प्रक्रियांचा समावेश असणारे महाकाय रॉकेट उभारणे अत्यावश्यक होते. आधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचे जनक, ज्यांनी नाझी जर्मनीच्या व्ही २ रॉकेटची निर्मिती केली होती आणि अमेरिकेच्या एक्सप्लोरर १ या पहिल्या उपग्रहाला अवकाशात पाठवण्याची किमया साधली होती, त्या वेर्नेर फॉन ब्राऊन यांच्याकडेच चंद्रावर मानवाला घेऊन जाणारे रॉकेट निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली.
अमेरिकेच्या चांद्रमोहिमेचे अपोलो असे नामकरण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने अपोलो याने चंद्राच्या कक्षेत पाठवून त्यानंतर माणसाला प्रत्यक्ष चंद्रावर उतरवण्याचे निश्चित करण्यात आले. ब्राऊन यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार देशभरातील कंपन्यांनी चांद्रमोहिमेच्या रॉकेटसाठी लागणारे भाग तयार करून नासाकडे सुपूर्द केले. केनेडी यांच्या घोषणेनंतर सहा वर्षांत म्हणजेच १९६७ मध्ये अपोलो मोहिम प्रत्यक्षात आली. १२० लाख सुटे भाग, २० लाख किलो वजन आणि १११ मीटर उंचीच्या अजस्त्र सॅटर्न ५ या रॉकेटमध्ये चंद्राभोवती फिरणारे कमांड मॉड्यूल आणि प्रत्यक्ष चंद्रावर उतरणारे ल्यूनार मॉड्यूल समाविष्ट होते. या मोहिमेत तिघा अवकाशवीरांना सहभागी होता येणार होते. या पैकी एक जण कमांड मॉड्यूलमध्ये, तर दोघे ल्यूनार मॉड्यूल मधून प्रत्यक्ष चंद्रावर उतरू शकणार होते. २७ जानेवारी १९६७ रोजी रॉकेट आणि यानाचे प्रत्यक्ष उड्डाण न करता जमिनीवरच घेण्यात येणाऱ्या अपोलो १ च्या चाचणीदरम्यान रॉकेटच्या यंत्रणेत आग लागून त्यात सहभागी झालेल्या तिघा अवकाशवीरांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे मोहिमेमध्ये काही काळ अडथळा निर्माण झाला.
नील आर्मस्ट्रॉंग, एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तिघा अवकाशवीरांची चांद्रमोहिमेसाठी निवड करण्यात आली. या तिघांनाही जेमिनी या मानवी अवकाश मोहिमेचा मोठा अनुभव होता. कॉलिन्सकडे चंद्राभोवती फिरणाऱ्या कोलंबिया या मुख्य यानाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी होती, तर आल्ड्रिनकडे चंद्रावर उतरणाऱ्या ईगल या अवकाशकुपीचे सारथ्य देण्यात आले. नील आर्मस्ट्राँग हा अपोलो ११ चा प्रमुख होता. १६ जुलै १९६९ रोजी केप केनेडी येथील अवकाश केंद्रावरून सॅटर्न ५ हे अजस्त्र रॉकेट अवकाशात झेपावले. या ऐतिहासिक चांद्रमोहिमेची दृश्ये जगभरात लाईव्ह दाखवण्यात येत होती. पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर सुमारे अडीच तासांनी कोलंबिया यान पृथ्वीभोवतीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. २० जुलैला यान सुऱक्षितपणे चंद्राच्या कक्षेत फिरू लागले. ईगल या चंद्रावर उतरणाऱ्या कुपीमध्ये प्रवेश करून आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन यांनी चंद्रावर उतरण्याची तयारी सुरु केली. उड्डाणानंतर १०१.३६ तासांनी ईगल कुपी कोलंबिया या मुख्य यानापासून विलग होऊन चंद्राच्या दिशेने उतरू लागली. उड्डाणापासून १०२ तास ४५ मिनिट आणि ४० सेकंदांनी ईगल प्रत्यक्ष चंद्रावर उतरले. नील आर्मस्ट्रॉंगने नासाच्या ह्युस्टन येथील नियंत्रण कक्षाला कळवले, ‘हा ट्रॅन्क्विलिटी बेस आहे. ईगल चंद्रावर उतरले आहे.’ हे ऐतिहासिक शब्द जगभरातील कोट्यवधी लोकांनी दूरदर्शन आणि रेडिओच्या माध्यमातून ऐकले. चंद्रावर स्वारी करण्याचे शेकडो वर्षे मानवाने उराशी बाळगलेले स्वप्न २० जुलै १९६९ रोजी प्रत्यक्षात आले.नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. या वेळी त्याने उच्चारलेले शब्द मानवी इतिहासात अजरामर झाले. ‘एका व्यक्तीचे हे लहान पाऊल मानव जातीची प्रचंड झेप आहे.’ आर्मस्ट्राँग पाठोपाठ आल्ड्रिनही चंद्रावर उतरला. पुढील अडीच तास दोघांनी ईगलच्या आसपासच्या माती- दगडांचे नमुने जमा केले, पृथ्वीवरून आणलेली काही वैज्ञानिक उपकरणे चंद्रावर बसवली. अमेरिकेचा राष्ट्रध्वज चंद्रावर फडकावला. अपोलो १ मध्ये सहभागी झालेल्या अवकाशवीरांच्या आणि रशियाच्या अवकाशवीरांच्या नावाची स्मृतीपट्टी चंद्रावर ठेवली. पृथ्वीचा नकाशा, तिघा अवकाशवीरांची आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची सही असलेला फलकही त्यांनी चंद्रावर ठेवला. त्यावर लिहिले होते, ‘या ठिकाणी पृथ्वीग्रहावरून आलेल्या माणसांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. जुलै १९६९. आम्ही संबंध मानवजातीच्या शांततेसाठी येथे आलो होतो.’ आपले उद्दिष्ट्य साध्य झाल्यावर दोघेही अवकाशवीर ईगल मध्ये परतले आणि ईगलने पुन्हा चंद्राभोवती फिरणाऱ्या कोलंबिया यानाकडे प्रयाण केले. पुढील चार दिवसांत यानाने पृथ्वीच्या दिशेने आपला प्रवास पूर्ण केला.
