संशोधन, २८ एप्रिल २०२२
येत्या रविवारी (एक मे) पहाटे आकाशप्रेमींना गुरू आणि शुक्र या तेजस्वी ग्रहांची युती (Conjunction) पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अर्धा अंशांपेक्षा कमी अंतरावर येणार असून, टेलिस्कोपच्या एकाच दृश्यात गुरू, त्याचे चार चंद्र आणि शुक्राची कला असे दुर्मीळ दृश्य पाहता येईल.
गेले काही दिवस पहाटे पूर्व – आग्नेय आकाशात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे चार ग्रह दिसत आहेत. त्यांपैकी गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांमधील आकाशातील अंतर सध्या कमी होत असून, येत्या एक मेच्या पहाटे भारतीय प्रमाणवेळेनुसार १:२५ वाजता या दोन तेजस्वी ग्रहांमधील अंतर सर्वात कमी म्हणजे ०.१४ कोनीय अंश इतके होईल. भारतातून पाहताना त्यावेळी हे दोन्ही ग्रह क्षितिजाखाली असल्यामुळे दोन ग्रहांमधील अंतर सर्वात कमी झाल्याचे दृश्य भारतातून दिसणार नाही.
मात्र, पहाटे पूर्वेच्या आकाशात हे दोन ग्रह उगवल्यानंतर त्यांची युती भारतातील आकाशप्रेमींना स्पष्टपणे पाहता येईल. यावेळी एकमेकांपासून ०.५ कोनीय अंशांपेक्षाही (पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षाही) कमी अंतरावर आलेल्या गुरू आणि शुक्राची जोडी साध्या डोळ्यांनाही स्पष्टपणे दिसेल. आकाशातील कोणतेही दोन घटक एकमेकांपासून एक अंशांपेक्षा कमी अंतरावर आले, तर त्या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत युती किंवा conjunction म्हणतात. टेलिस्कोपमधून हे दुर्मीळ दृश्य पाहिल्यावर आकाशप्रेमींना एकाच दृश्यात वायुरूपी गुरू, त्याचे चार चंद्र आणि अर्धा भाग प्रकाशित असलेली शुक्राची कला दिसू शकेल.
आकाशात रविवारी गुरू आणि शुक्र जवळ आलेले दिसणार असले तरी, प्रत्यक्षात या दोन ग्रहांमधील अंतर सुमारे ६९२ दशलक्ष किमी इतके असेल. गुरू, शुक्र आणि पृथ्वी हे सूर्याभोवती फिरताना जवळ जवळ एका रेषेत आल्यामुळे दोन ग्रहांच्या युतीचे दृश्य पृथ्वीवरून दिसणार आहे. या आधी डिसेंबर २०२० मध्ये अशीच गुरू आणि शनीची युती संध्याकाळी पश्चिम आकाशात दिसली होती.
एक मे नंतर या दोन ग्रहांमधील आकाशातील अंतर वाढताना दिसून येईल. रविवारी पहाटे शुक्र – ४.१, तर गुरू – २.१ इतक्या मॅग्निट्यूडचा असेल. याचा अर्थ शुक्र हा गुरुपेक्षा सुमारे सहा पट जास्त तेजस्वी दिसेल. मात्र, टेलिस्कोपमधून पाहिल्यावर गुरूचा व्यास हा शुक्राच्या व्यासापेक्षा जवळ जवळ दुप्पट असल्याचे दिसून येईल. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असून, सूर्यापासूनच्या क्रमवारीत गुरूचा पाचवा क्रमांक लागतो.गुरू आणि शुक्र यांच्या दुर्मीळ युती सोबतच लालसर मंगळ आणि कडीधारी शनी यांचेही दर्शन रविवारी पहाटे आकाशात घडू शकेल. ही दुर्मीळ खगोलीय घटना पाहण्याची संधी आकाशप्रेमींनी चुकवू नये.
माहिती स्रोत: अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, मुंबई.