– सायली सारोळकर
वैद्यकीय क्षेत्रातील एक विस्मृतीत गेलेले नाव म्हणजे डॉ. उपेंद्रनाथ ब्रह्मचारी. कालाआजार किंवा व्हिसरल लेशमानियासिस हा आजार एकेकाळी ब्रिटीश राजवटीत, १९व्या आणि २०व्या शतकात, भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये म्हणजे सध्याच्या बंगाल, बिहार, आसाम आणि ओडिशा या राज्यांत पसरला होता. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीला लागून असलेल्या भागात हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरला होता. इतकेच नाही, तर आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील कित्येक गावे या आजाराने नष्ट झाली होती. ९०% पेक्षा जास्त मृत्युदर असलेल्या या आजाराने भारतात देखील थैमान घातले होते.
डॉ. उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांनी युरिया स्टिबामाइनचा शोध लावला आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडली. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना ब्रिटिश साम्राज्यातर्फे ‘नाइटहूड’ बहाल करण्यात आला. याशिवाय त्यांना दोन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले. डॉ. ब्रह्मचारी यांचा जन्म १८७३ मध्ये बिहारमध्ये झाला. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे हुगळी विद्यापीठातून त्यांनी गणित आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयात बी ए ची पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी कलकत्तामधील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयातून एमएची पदवी मिळाली. त्याच ठिकाणी त्यांची भेट सर अलेक्झांडर पेडलर आणि आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्याशी झाली. आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी त्यांना खूप प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्याचे ठरवले.
कलकत्ता वैद्यकीय विद्यापीठातून मेडिसिन आणि सर्जरी विषयात एमबी आणि पुढे डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी मिळवली आणि १९०४ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून फिजिओलॉजीमध्ये पीएचडी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. ब्रह्मचारी ढाका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांच्या कामाने सर गेराल्ड बॉमफोर्ड हे ब्रिटिश सर्जन खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ब्रह्मचारी यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. चार वर्ष ढाका मध्ये काम करून डॉ. ब्रह्मचारी १९०५ साली कलकत्त्याला कॅम्पबेल मेडिकल स्कूल येथे मेडिसिनचे शिक्षक आणि सर्जन म्हणून रुजू झाले आणि पुढे त्यांनी अनेक वर्षे तिथेच काम केले.
काला आजार
भारतात १८७० साली काला आजारची साथ पहिल्यांदा बंगाल आणि बिहार प्रांतात, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात नोंदवली गेली. प्रोटोझोआमुळे होणाऱ्या या आजाराने एकोणिसावे शतक संपेपर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला होता. या आजाराच्या संसर्गामुळे त्वचा काळी पडत असल्याने त्याला काला आजार असे नाव पडले. सँडफ्लायमुळे हा आजार पसरतो आणि अनियमित ताप, अशक्तपणा, यकृताचा आकार वाढणे ही त्याची लक्षणे आहेत. योग्य उपचार न मिळाल्यास त्याकाळी ९०% रुग्णांचा मृत्य होत असे. १९०३ साली विल्यम लीशमन आणि चार्ल्स डोनोव्हन यांनी कलकत्ता आणि मद्रास येथील दोन सैनिकांचे शवविच्छेदन करून पहिल्यांदा काला आजारचे कारण शोधून काढले. त्यानंतर सर रोनाल्ड रॉस यांनी या प्रोटोझोआचे नाव लीशमॅनिया डोनोव्हानी असे ठेवले.
१९१३ पासून टार्टर इमेटिक (potassium salt of antimonyl tartrate) या इंजेक्शनचा काला आजारावर उपचार म्हणून वापर सुरु झाला. परंतु, जास्त काळ टार्टर इमेटिकच्या वापराने अनेक दुष्परिणाम होते. हृदय आणि यकृतावर या इंजेक्शनचा गंभीर दुष्परिणाम दिसून येत होता. डॉ. ब्रह्मचारी यांनी अँटिमोनिअल टार्टरेटच्या पोटॅशिअमऐवजी सोडियम सॉल्टचा वापर करण्याचे ठरवले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अँटिमोनिअल टार्टरेटच्या सोडियम सॉल्टचे जास्त चांगले परिणाम दिसू लागले. काही काळ त्यांनी त्याचा वापर केला परंतु, हळूहळू जास्त वापराने होणारे सोडियमचे दुष्परिमाण देखील समोर यायला लागले आणि त्यांनी त्याचा वापर थांबवला. त्यांनी मेटॅलिक आणि कोलॉइड रूपातील अँटिमनीदेखील उपचार म्हणून वापरून पहिले. त्याचे परिणाम चांगले दिसून आले. परंतु त्यात देखील अडचणी होत्या. ते सगळीकडे उपलब्ध नव्हते. शिवाय ही पावडर साठवून ठेवता येत नसे आणि ती बनवण्याची प्रक्रिया देखील काहीशी किचकट होती.
मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या आजारावर असे काहीतरी औषध गरजेचे होते, जे सगळीकडे सहज उपलब्ध असेल, साठवून ठेवता येईल, स्वस्त असेल आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम नसतील. डॉ. ब्रह्मचारी यांनी असे औषध शोधून काढण्याचा ध्यास घेतला. यादरम्यान पॉल अर्लीच या जर्मन शास्त्रज्ञाने १९०५ मध्ये झोपेच्या आजारासाठी अटॉक्सिल अर्थात पॅरा-अमीनो आर्सेनिक ऍसिडचे सोडियम सॉल्टचा यशस्वीरित्या वापर करून दाखवला होता. डॉ. ब्रह्मचारी यांनी या अटॉक्सिलमध्ये अर्सेनिकऐवजी अँटिमनीचा वापर करायचा ठरवले. अर्थात हे काम इतके सोपे नव्हते. कॅम्पबेल रुग्णालयात काहीच सोयीसुविधा नसलेल्या एका लहानश्या खोलीत त्यांनी आपले संशोधन सुरु ठेवले.
अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये काम करत त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आणि अखेर १९२० मध्ये शोध लागला, युरिया स्टीबामाईनचा! युरिया स्टीबामाईनच्या शोधाने आधी ९०% असलेला मृत्युदर १९२५ पर्यंत १०% पर्यंत खाली आला. या औषधामुळे रुग्ण बरा होण्याचा दर ९५% वर गेला. त्यांनी भारतातील कितीतरी रुग्णालयांना युरिया स्टीबामाईन मोफत दिले. केवळ भारतच नव्हे, तर ग्रीस, चीन आणि फ्रांसमध्ये पुढे अनेक वर्ष काला आजारासाठी युरिया स्टीबामाईनचा वापर केला जात होता. युरिया स्टीबामाईनचा शोध लावून डॉ. ब्रह्मचारी यांनी जगभरात लाखो रुग्णांना संजीवनी दिली. आज भारतात काला आजारचे रुग्ण खूप कमी झाले आहेत. परंतु आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये काही प्रमाणात त्याचे रुग्ण आढळतात.
त्यांचे कार्य केवळ काला आजारपुरते सीमित नव्हते. तर त्यांनी मलेरिया, कुष्ठरोग, हत्तीरोग, सिफिलिस, डायबेटीस अशा अनेक आजारांवर संशोधन केले. याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक आणि संशोधन संस्थांना मोठ्या देणग्यादेखील देऊ केल्या. १९२९ साली त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. परंतु, त्यावर्षी आईकमन आणि फ्रेडरिक हॉपकिन्स यांची जीवनसत्वाच्या शोधासाठी नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली. १९१४ साली त्यांना ब्रिटिश साम्राज्यातर्फे ‘रायबहादूर’ ही पदवी आणि ‘नाइटहूड’ बहाल करण्यात आला.
————