संशोधन, २६ ऑक्टोबर २०२३
येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री (२८ ऑक्टोबर) भारतासह संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांतून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रातून रात्री ०१:०८ ते ०२:१८ या तासाभराच्या कालावधीत चंद्रग्रहणाची खंडग्रास अवस्था दिसणार असून, यावेळी चंद्राच्या सुमारे पाच टक्के भागावर पृथ्वीची गडद सावली पडल्याचे दृश्य दिसेल.
चंद्रग्रहण कसे होते?
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्याभोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. तर, चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते.
२८ ऑक्टोबरला खंडग्रास चंद्रग्रहण कधी दिसेल?
महाराष्ट्रातून पाहताना शनिवारी (२८ ऑक्टोबर) रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या उपछायेला स्पर्श करील. एक वाजून आठ मिनिटांनी चंद्राचा पृथ्वीच्या गडद छायेला स्पर्श होऊन ग्रहणाची खंडग्रास अवस्था सुरू होईल. एक वाजून ४४ मिनिटांनी खंडग्रास अवस्थेचा मध्य येईल तेव्हा चंद्राच्या सुमारे पाच टक्के भागावर पृथ्वीची गडद छाया पडल्याचे दृश्य दिसेल. दोन वाजून १८ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून बाहेर पडल्यावर खंडग्रास अवस्था संपेल. पहाटे तीन वाजून ५४ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर पडल्यावर चंद्रग्रहण संपेल.
चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल का?
शनिवारचे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी पाहता येईल. चंद्राचा पृथ्वीच्या उपछायेतून होणारा प्रवास साध्या डोळ्यांना जाणवणार नसला, तरी चंद्रावर पृथ्वीची गडद सावली पडल्यामुळे घडणारी खंडग्रास अवस्था साध्या डोळ्यांनी पाहता येईल. टेलिस्कोप किंवा कॅमेराच्या साह्याने ग्रहणाच्या विविध अवस्था अधिक चांगल्या दिसू शकतील.
————