संशोधन, ३० जानेवारी २०१८
सुपर- ब्ल्यू – ब्लड मून म्हणजे काय ?
३१ जानेवारीला चंद्राशी संबंधित तीन घटनांचा योग एकाच वेळी घडून येत आहे.
चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पृथ्वीपासून किमान अंतरावर असताना पौर्णिमा आल्यास त्या चंद्राला सुपरमून म्हणतात (चंद्राच्या सरासरी आकारापेक्षा सुपरमून चा आकार १४ टक्क्यांनी मोठा असतो).
एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास त्यातील दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यूमून म्हणतात (प्रत्यक्षात हा चंद्र निळा दिसत नाही).
चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत – एका प्रतलात आल्यावर चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, किंवा आपल्या कक्षेतून फिरताना चंद्राचा पृथ्वीच्या अवकाशातील सावलीमधून काही काळ प्रवास होतो. याला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्र जर पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला गेला असेल तर त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. खग्रास अवस्थेत चंद्र पूर्णपणे काळवंडला न जाता त्यावर पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित झालेले किरण पडतात. त्यामुळे खग्रास अवस्थेतील चंद्र लालसर दिसतो. म्हणून या चंद्राला ब्लड मून म्हणतात.
या तीनही घटना एकाच वेळी येणे हे दुर्मिळ असते. म्हणून ३१ जानेवारीचे चंद्रग्रहण विशेष आहे.
चंद्रग्रहण कोणकोणत्या भागांतून दिसेल?
बुधवारचे चंद्रग्रहण आशिया, उत्तर अमेरिका, प्रशांत महासागरातील देश, ऑस्ट्रेलिया या भागांतून दिसणार आहे. भारतात हे ग्रहण चंद्रोदयादरम्यान, तर अमेरिकेत ते चंद्रास्ताच्या वेळेस दिसेल. भारताच्या बहुतांश भागातून ग्रहणाचा पहिला (खंडग्रास) टप्पा दिसणार नाही. पश्चिम भारताच्या तुलनेत पूर्वेकडील भागांमध्ये ग्रहण अधिक काळ दिसेल. पश्चिम महाराष्ट्रात खग्रास अवस्थेतील चंद्रोदय होणार असून, ग्रहणाच्या मध्यापासून ग्रहण सुटेपर्यंतच्या अवस्था पाहता येतील.
चंद्रग्रहणाच्या विविध अवस्थांची वेळ
(सर्व वेळा संध्याकाळच्या)
खग्रास ग्रहणाची सर्वोच्च स्थिती (पृथ्वीच्या गडद छायेच्या मध्यावर चंद्र असेल तेव्हाची वेळ)
खग्रास अवस्थेचा शेवट (पृथ्वीच्या गडद छायेतून एका बाजूने चंद्र बाहेर पडण्यास सुरुवात)
खंडग्रास अवस्थेचा शेवट (पृथ्वीच्या गडद छायेतून चंद्र पूर्णपणे बाहेर पडेल तेव्हाची वेळ)
चंद्रग्रहणाचा शेवट (पृथ्वीच्या उपछायेतून चंद्र पूर्णपणे बाहेर पडेल तेव्हाची वेळ)
खग्रास ग्रहणाची सुरुवात – ६:२१:४७
खग्रास ग्रहणाची सर्वोच्च स्थिती – ६:५९:५१
खग्रास अवस्थेचा शेवट – ७:३७:५१
खंडग्रास अवस्थेचा शेवट – ८:४१:११
चंद्रग्रहणाचा शेवट – ९:३८:२९
महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ
मुंबई ६:२७, नागपूर ५:५८, पुणे ६:२३, नाशिक ६:२१, औरंगाबाद ६:१५, अहमदनगर ६:१९, सोलापूर ६:१६, नांदेड ६:०८, लातूर ६:१२, कोल्हापूर ६:२४, सातारा ६:२४, रत्नागिरी ६:२८, जळगाव ६:१२, धुळे ६:१६, अमरावती ६:०३
चंद्रग्रहण कसे पाहावे?
चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही फिल्टरची आवश्यकता नसून, साध्या डोळ्यांनी ते पाहता येते. मात्र, चंद्रोदयादरम्यान खग्रास अवस्था येत असल्यामुळे क्षितिजाजवळ काळवंडलेला / लालसर चंद्र डोळ्यांना सहज दिसणे अवघड आहे. टेलिस्कोप असल्यास त्याद्वारे ग्रहणाची ही अवस्था स्पष्टपणे पाहता येऊ शकेल. चंद्र क्षितिजापासून वर आला की, ग्रहण सुटेपर्यंतच्या अवस्था साध्या डोळ्यांनी व्यवस्थित दिसू शकतील.
ग्रहणाची खग्रास अवस्था पाहण्यासाठी पूर्व क्षितिज सहजतेने दिसू शकेल अशी जागा निवडावी. उंच इमारतीची गच्ची, जवळपास इमारती किंवा झाडे नसतील असे मोठे मैदान किंवा टेकडीवरून पाहिल्यास खग्रास अवस्थेतील चंद्र विना अडथळा पाहता येऊ शकतो.
चंद्र ग्रहणाची फोटोग्राफी कशी करावी?
मोबाईल कॅमेरा
मोबाईलचा कॅमेरा ‘वाईड अँगल’ असल्यामुळे त्यावरून फोटो काढल्यास चंद्राचा आकार लहान दिसेल. मोबाईलचे फोटो हे लँडस्केपसाठीच योग्य ठरू शकतात. फोटो क्लिअर राहावा यासाठी कमीत कमी झूम करावे. फ्रेम झूम करायची असल्यास मोबाईल स्टॅन्डवर बसवून मग फोटो घ्यावा. फोटो घेताना थेट क्लिक न करता दोन सेकंदांचा टायमर लावावा म्हणजे क्लिक करताना आपल्या हाताचे व्हायब्रेशन फोटोमध्ये येणार नाहीत
डीएसएलआर कॅमेरा
फक्त चंद्राचे फोटो घ्यायचे असल्यास १३५ एमएम किंवा त्यापेक्षा मोठी टेलीलेन्स वापरावी. ट्रायपॉडचा वापर करावा. खग्रास अवस्थेतील चंद्र टिपण्यासाठी ८०० किंवा त्यापेक्षा अधिक आयएसओ, साधारण अर्धा ते एक सेकंद एक्स्पोजर ठेवावा. अर्थात शहर आणि शहराबाहेरून फोटो घेताना सेटिंग वेगळे ठेवावे लागू शकते. महाराष्ट्रातून ग्रहण सुटण्याची अवस्था दिसणार असल्यामुळे, तसेच चंद्र क्षितिजापासून वर- वर येणार असल्यामुळे आयएसओ आणि एक्स्पोजर कमी- कमी करत न्यावा लागेल. फोटो काढताना व्हायब्रेशन टाळण्यासाठी दोन सेकंदांचा टायमर वापरावा.
आपण घेतलेले फोटो आम्हाला पाठवल्यास संशोधनाच्या वेबसाईटवर, तसेच फेसबुक पेजवर त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
खगोल विश्व, संशोधनचा कार्यक्रम
चंद्रग्रहणाची क्षितिजाजवळील खग्रास अवस्था व्यवस्थित दिसावी यासाठी तळजाई टेकडीवरील मैदानावर टेलिस्कोप, तसेच स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. खगोल विश्व, संशोधन, एज्युनीड्स आणि यशस्विनी महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत हा कार्यक्रमाचे होणार असून, प्रवेश सर्वांसाठी मोफत खुला आहे.
चंद्रग्रहणाविषयीचा हा लेख अधिकाधिक आकाशप्रेमींना शेअर करा.
Please follow and like us: