भारतीय क्रायोजेनिक इंजिन, १०४ उपग्रहांच्या विक्रमी उड्डाणाचे शिल्पकार
संशोधन, ११ जानेवारी २०१८
भारताचा अवकाश कार्यक्रम राबवणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) अध्यक्षपदी आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक डॉ. के. सिवन यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. ए. एस. किरण कुमार यांचा अध्यक्षपदाचा कालावधी येत्या १४ जानेवारीला पूर्ण होत आहे. इस्रोचे नववे अध्यक्ष म्हणून डॉ. सिवन पदभार स्वीकारतील.
थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येणाऱ्या अवकाश विभागाच्या अंतर्गत देशातील १९ वैज्ञानिक संस्थांचा समावेश होतो. त्यातील १३ संस्था इस्रोच्या अंतर्गत येतात. अवकाश विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून डॉ. सिवन यांच्याकडे पुढील तीन वर्षांसाठी या सर्व संस्थांची जबाबदारी राहील. इस्रोच्या स्थापनेपासून इस्रोचे अध्यक्ष हेच अवकाश विभागाचे सचिव असतात.
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून १९८० मध्ये डॉ. सिवन यांनी एअरोनॉटीकल इंजिनिअरींग विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर बेंगळुरू येथून १९८२ मध्ये त्याच विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २००६ मध्ये आयआयटी, मुंबई येथून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. १९८२ मध्ये इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच वेहिकल (पीएसएलव्ही) प्रकल्पात ते रुजू झाले. पीएसएलव्हीच्या उभारणीतील सर्व यंत्रणांचा त्यांना अनुभव असून, १०४ उपग्रह अवकाशात पाठवण्याच्या इस्रोच्या विक्रमाचे श्रेयही डॉ. सिवन यांना दिले जाते. पीएसएलव्ही प्रमाणेच जीएसएलव्ही मार्क -२, जीएसएलव्ही मार्क -३, रियुजेबल लाँच वेहिकल – टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (आरएलव्ही- टीडी) या प्रक्षेपकांच्या निर्मितीमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. देशांतर्गत क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी विकसित करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
इस्रोच्या सर्व रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या मार्ग अभ्यासण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी त्यांनी सितारा नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले असून, सर्व प्रक्षेपकांच्या उड्डाणांच्यावेळी त्याचा वापर केला जातो. याशिवाय उड्डाणाच्या वेळी हवामान अनुकूल नसले तरी, वाऱ्यांचा अडथळा पार करून रॉकेटला अवकाशात पाठवण्याची यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे. भारताच्या मंगळ मोहिमेच्या प्रक्षेपणातही त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करण्यात आला होता.
जीएसएलव्ही प्रकल्पाची डॉ. सिवन यांच्याकडे जबाबदारी असतानाच देशाला क्रायोजेनिक तंत्रज्ञानात यश मिळाले. तेव्हापासून जीएसएलव्हीने सातत्याने यशस्वी कामगिरी केली आहे. इस्रो अंतर्गत प्रशासनाचाही त्यांना मोठा अनुभव आहे. रॉकेटच्या निर्मितीतील विविध विभागांचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. लिक्विड प्रोपल्जन सिस्टिम्स सेंटर (एलपीएससी) आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक म्हणून काम करताना भारतीय रॉकेटना अत्याधुनिक स्वरूप देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. इस्रो मेरिट अॅवॉर्ड, विक्रम साराभाई रिसर्च अॅवॉर्डसह देशा विदेशातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल जवळील वल्लन कुमारन विलै या छोट्याशा गावात डॉ. सिवन यांचा जन्म झाला. सर्व शिक्षण भारतातच घेऊन इस्रोमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एकएक पायरी चढत त्यांचा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असाच आहे. इस्रोच्या पहिल्या पिढीतील अध्यक्ष हे डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रभावाने प्रेरीत झालेले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रभाव असणाऱ्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व डॉ. सिवन करतात. सश्रद्ध, शांत आणि अत्यंत साधे राहणीमान ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यांना भेटता क्षणी लक्षात येतात. दक्षिण भारतातील ग्रामीण पार्श्वभूमी ते आंतरराष्ट्रीय महत्व असणाऱ्या इस्रोसारख्या संस्थेच्या प्रमुखपदापर्यंत झालेला त्यांचा झालेला प्रवास भारताच्या सकारात्मक आणि सुप्त क्षमतेचे दर्शन घडवतो. आजच्या पिढीसाठी डॉ. सिवन यांच्या रूपाने आजच्याच पिढीतील मूर्तीमंत आदर्श भारतीयांसमोर आहे.
Please follow and like us: