असा मंगळ यानंतर २०३५ मध्ये दिसेल
संशोधन, ३१ जुलै २०१८
खग्रास चंद्रग्रहण आणि मंगळाची प्रतियुती ढगाळ हवामानामुळे महाराष्ट्रातून बहुतेकांना दिसू शकली नाही. मात्र, आकाश आता अंशतः ढगाळ असल्यामुळे पृथ्वीच्या जवळ आलेल्या मंगळाचे तेजस्वी दर्शन येत्या काही दिवसांत आकाशप्रेमींना मिळणार आहे. आज (३१ जुलै) दुपारी १:२० वाजता पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी अंतरावर (५.७६ कोटी किलोमीटर) होते. प्रतियुतीनंतर चारच दिवसांनी मंगळ पृथ्वीजवळ आल्यामुळे मंगळ नेहमीपेक्षा आकाराने मोठा दिसत असून, मंगळाचा पृष्ठभाग आणि सध्या त्यावर सक्रिय असणारी धुळीची वादळे छोट्या टेलिस्कोपमधूनही पाहता येणार आहेत. येत्या ४ ऑगस्टपर्यंत आकाशप्रेमींना -२.८ मॅग्निट्युडचा पृथ्वीजवळ आलेला मंगळ पाहता येईल.
मंगळाची प्रतियुती आणि पृथ्वीशी जवळीक
पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला एखादा ग्रह असल्यास या स्थितीला त्या ग्रहाची सूर्याशी प्रतियुती (ऑपोझिशन) म्हणतात. म्हणजेच पश्चिमेला सूर्यास्त होत असताना पूर्वेला संबंधित ग्रह क्षितिजावरून उगवताना दिसतो. मंगळाची सूर्याशी प्रतियुती ही साधारण दर २६ महिन्यांनी होत असते. मात्र, प्रतियुतीच्या दरम्यान मंगळ त्याच्या सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याजवळील बिंदूपाशी असण्याची घटना १५ ते १७ वर्षांनी घडते. या आधी ऑगस्ट २००३ मध्ये मंगळाची सूर्याजवळील बिदूपाशी असताना प्रतियुती झाली होती. तेव्हा मंगळ आणि पृथ्वीमधील अंतर गेल्या ६० हजार वर्षांतील सर्वात कमी (५.५७ कोटी किलोमीटर) होते. यंदा ३१ जुलै रोजी पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी अंतरावर म्हणजे ५.७६ कोटी किलोमीटरवर येत आहेत.
पृथ्वीजवळ आलेला मंगळ कसा दिसेल?
मंगळाची प्रतियुती नुकतीच (२७ जुलै) झाली असल्यामुळे सूर्यास्तानंतर तासाभराने पूर्वेला नारिंगी रंगाचा मंगळ साध्या डोळ्यांना सहज दिसून येईल. मंगळ सध्या चंद्र आणि शुक्रानंतर सर्वात तेजस्वी दर्शन देत आहे. त्याची तेजस्विता (मॅग्निट्युड) -२.८ इतकी असून त्याचा व्यास २४.३ कोनीय सेकंद (आर्क सेकंद) आहे. टेलिस्कोपमधून पाहिल्यास पिवळसर- नारिंगी रंगाचा मंगळ नेहमीपेक्षा मोठ्या आकारात दिसून येईल. मात्र, मंगळावर सध्या सुरु असणाऱ्या धुळीच्या वादळामुळे त्याच्या पृष्ठभागावरील भूरचना, दऱ्या स्पष्टपणे पाहता येणार नाहीत. पृथ्वीवरून सध्या मंगळाच्या दक्षिण गोलार्धाचा भाग अधिक दिसत असून, दक्षिण ध्रुवावर असणारी ‘आईस कॅप’ही चांगल्या टेलिस्कोप मधून दिसू शकते. ४ ऑगस्टपर्यंत पृथ्वीजवळ आलेल्या मंगळाचे तेजस्वी रूप आकाशप्रेमींना दिसणार असून, त्यानंतर त्याची मॅग्निट्युड आणि आकार पुढील काही महिन्यांत कमी होत जाईल.
मंगळावरील धुळीचे वादळ
गेल्या एक महिन्याहून जास्त काळ मंगळाच्या मोठ्या भागाला धुळीच्या वादळाने वेढले आहे. उन्हाळ्यात मंगळाच्या विषुववृत्ताजवळील वातावरणाचे तापमान वाढून वारे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत जमिनीवरील धूलिकणांचे लोट हवेत उंचावर उधळतात. वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले, की वातावरणाच्या त्या भागात उष्णताही अधिक साठते. आणखी ऊर्जा मिळाल्यामुळे वाऱ्यांचा जोर वाढून वादळांची निर्मिती होते. ही वादळे मग जवळ जवळ संपूर्ण मंगळाला व्यापतात. एरवी पृथ्वीवरून दिसणारी मंगळावरील गडद भूरूपे अशा धुळीच्या वादळांमुळे झाकोळली जातात. मंगळ पृथ्वीजवळ आला असतानाच, त्यावर धुळीचे वादळ सक्रिय असल्यामुळे आकाश निरीक्षकांमध्ये नाराजी आहे. मात्र, हे वादळ आता शमू लागल्याचे निरीक्षण नासाने नुकतेच नोंदवले आहे. मंगळावर धुळीचे वादळ निर्माण झाल्यामुळे सूर्याचा प्रकाश पुरेशा प्रमाणात जमिनीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे जमिनीवरील तापमानातही मोठी घट होते. नासाने २००४ मध्ये मंगळावर पाठवलेले ऑपॉर्च्युनिटी हे यान सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे धुळीच्या वादळाचा फटका या यानाला बसला आहे. १० जून पासून या यानाचे काम बंद असून, मोठा काळ यानाच्या बॅटरी बंद राहिल्या तर ते पुन्हा सुरु न होण्याचा धोका आहे.
मात्र, मंगळावर असणाऱ्या क्युरोसिटी या नासाच्या दुसऱ्या यानावर आण्विक इंधन आहे. त्यामुळे ते यान सध्या सक्रिय असून, मंगळावरील धुळीच्या वादळाचे निरीक्षण नोंदवत आहे. क्युरोसिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळावर आता जमिनीवरून धूळ वरच्या दिशेने उडणे बंद झाले असून, वातावरणातील धूळ जमिनीवर उतरू लागली आहे. पुढील काही आठवड्यांत वातावरणातील धुळीचे प्रमाण प्रमाण कमी होऊन मंगळाचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसण्यास सुरुवात होईल आणि ऑपॉर्च्युनिटी यानालाही सौरऊर्जा मिळू लागेल.
——
Please follow and like us: