‘तितली’ उद्या ओडिशाला धडकणार; लुबान येमेनच्या दिशेने
संशोधन रिपोर्ट, १० ऑक्टोबर २०१८
भारताच्या दोन्ही बाजूंनी एकाचवेळी दोन चक्रीवादळे घोंघावत असल्याचे दुर्मिळ दृश्य सध्या सॅटेलाईट इमेजवर बघायला मिळत आहे. अरबी समुद्रातील लुबान हे चक्रीवादळ पुढील तीन ते चार दिवसांत (१४ ऑक्टोबर) येमेनच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, बंगालच्या उपसागरातील तितली हे चक्रीवादळ ११ ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम यांच्या दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तितली हे तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ असून, जमिनीवर आल्यावर त्याची तीव्रता पुढील काही तासांत कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीवर आल्यावर तितलीची दिशा ईशान्येकडे वळून, ते पश्चिम बंगाल, बिहारच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. तितली चक्रीवादळामुळे वादळी वारे आणि मोठ्या पावसाची शक्यता असून, त्यातून होणारे नुकसान पाहता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना जारी केली आहे. केंद्र आणि संबंधित राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनेही किनारपट्टीच्या भागांत खबरदारी म्हणून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील चक्रीवादळांसंबंधी माहिती देणारा विस्तृत लेख
हिंदी महासागरातील चक्रीवादळे
– मयुरेश प्रभुणे
भारतीय उपखंडातील चक्रीवादळांची निर्मि ती
भारतीय उपखंडाचे पावसाळ्यातील हवामान हे मुख्यतः विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि काही प्रमाणात अरबी समुद्रात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. उत्तर गोलार्धात सूर्याचा आकाशातील प्रवास हा २१ मार्च ते २२ सप्टेंबर (या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो) या कालावधीत होतो. २१ जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धातील आपली परिसीमा गाठतो (२३.५ अंश- कर्कवृत्त). या वेळी उत्तर गोलार्धात उन्हाळ्याने उच्चांक गाठलेला असतो. या कालावधीत भारतीय उपखंड आणि लगतच्या समुद्रावर सूर्याची किरणे अधिकाधिक लंबरूप पडल्यामुळे भारताला मान्सून अनुभवायला मिळतो (समुद्र आणि जमिनीतील दाबाच्या फरकामुळे समुद्रावरून बाष्पयुक्त वारे भूप्रदेशात वाहू लागतात). सूर्याचा दक्षिण दिशेने विषुववृत्ताजवळून प्रवास होत असताना (सप्टेंबरनंतर) त्या भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढून कमी दाबाची क्षेत्रे (१ हेक्टो पास्कल- दाबाच्या फरकाचे एकक) निर्माण होऊ लागतात. कमी दाबाच्या क्षेत्रात रिकामी झालेली जागा बाजूच्या जास्त दाबातील हवा भरून काढण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीच्या परिवलानामुळे त्या हवेला वक्राकार गती प्राप्त होते आणि कमी दाबाभोवती वारे चक्राकार गतीने फिरू लागतात (उत्तर गोलार्धात त्यांची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने). चक्राकार गती आणि कमी दाब यांच्या प्रभावामुळे उबदार समुद्राकडून मिळणारे बाष्प त्या क्षेत्रामध्ये वातावरणात वर वर सरकू लागते. या बाष्पाने १२ ते १५ किलोमीटरची उंची गाठली की त्याचे दवबिंदूत रुपांतर होते (कंडेन्सेशन). या प्रक्रियेत मुक्त होणारी ऊर्जा कमी दाबाच्या क्षेत्राला प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप आणखी विस्तारू लागते.
ही प्रक्रिया जितकी जास्त काळ चालेल तितके हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करते. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याच्या मध्य भागातील दाब ४.५ ते ८.५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो. तर त्याच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांची गती ताशी ६० ते ९० किलोमीटर इतकी होते. वादळ जर अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो आणि चक्रीवादळाचा घेरा शेकडो किलोमीटर पर्यंत पसरतो. ‘सुपर सायक्लोन’मध्ये तर दाब ६५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो, तर केंद्राभोवती फिरणारे वारे ताशी २५० किलोमीटरचा वेग गाठतात आणि या महाचक्रीवादळाचा घेरा तब्बल दोन हजार किलोमीटरपर्यंत विस्तारतो. (प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अशा महाचक्रीवादळांना ‘टायफून’, तर अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या महाचक्रीवादळांना ‘हरिकेन’ म्हणतात.)
याच काळात चक्रीवादळाच्या मधोमध ऊर्ध्वगामी बलामुळे (सेंट्रीफ्युजल फोर्स) मोकळी गोलाकार जागा निर्माण होते ज्याला ‘सायक्लोन आय’ (चक्रीवादळाचा डोळा) म्हणतात. त्याचा आकार साधारणपणे ३० ते ६० किलोमीटर इतका असतो. या ‘आय’ मध्ये वातावरण अगदी स्वच्छ असते (अगदी दिवसा निरभ्र आकाश, तर रात्री तारे पाहता येऊ शकतील इतकी) आणि तेथील तापमान बाजूच्या वातावरणाच्या तुलनेत आठ ते दहा अंशांनी अधिक असते. ‘सायक्लोन आय’च्या भोवती अतिशय वेगवान वाऱ्यांची आणि ढगांची फिरती भिंत असते, जिला ‘आयवॉल’ म्हणतात. चक्रीवादळामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या ‘आयवॉल’मुळेच होत असते. वाऱ्यांचा प्रचंड वेग (ताशी ९० ते २५०) आणि प्रचंड पाऊस (चोवीस तासांत ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक) यांमुळे या फिरत्या भिंतीची धडक ही प्रलय घडवून आणते. या भिंतीच्या बाहेर चक्रीवादळाला ढगांनी बनलेल्या काही शाखाही असतात. त्यांची घनता केंद्रापासून बाहेरील भागात कमी कमी होत जाते. त्यांच्या घनतेप्रमाणे त्या त्या भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त असते.
मान्सून आणि चक्रीवादळ
मान्सून काळात कमी दाबाची क्षेत्रे आणि तीव्र कमी दाबाची क्षेत्रे (डिप्रेशन) अगदी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जूनपासूनच निर्माण होऊ लागतात. मात्र त्यांची निर्मिती ही बंगालच्या उपसागराच्या मध्यापासून उत्तरेच्या भागात होत असल्यामुळे त्यांचे आयुष्य आठवडाभराचेच राहते. मात्र मान्सूनच्या उत्तरार्धात सूर्याचा विषुववृत्ताजवळून जसा प्रवास होऊ लागतो, तशी या कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती हिंदी महासागराच्या उत्तर भागात किंवा अंदमानच्या समुद्रात होऊ लागते. अशा कमी दाबाच्या क्षेत्रांना समुद्राकडून जमिनीकडे प्रवास करण्यासाठी तुलनेने अधिक कालावधी मिळाल्यामुळे त्यांची तीव्रता वाढून चक्रीवादळांची निर्मिती होते. म्हणूनच भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर हा चक्रीवादळांचा काला वधी मानला जातो. मान्सून काळात समुद्रपृष्ठावरून नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्यामुळे समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरी २६.५ अंश इतके असते. तसेच, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर पाच ते बारा किलोमीटर पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय असतो. या दोन वाऱ्यांच्या प्रवाहाची रचना आणि समुद्रपृष्ठाचे सरासरी २६.५ अंश हे तापमान यांमुळे मान्सून सक्रीय असताना चक्रीवादळांची निर्मिती होऊ शकत नाही.
भारतात सर्वसाधारणपणे वर्षाला पाच चक्रीवादळे निर्माण होतात (जगभरात ८०). त्या पाचपैकी चार चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात, तर एक अरबी समुद्रात निर्माण होते. बंगालच्या उपसागरात अनेकदा प्रशांत महासागराकडून अतिरिक्त बाष्प येत असल्यामुळे त्यांपासून या भागात चक्रीवादळे तुलनेने अधिक निर्माण होतात, तर अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागाराकडून क्वचितच मिळणाऱ्या अतिरिक्त बाष्पाच्या आधारे तयार होतात. त्याच प्रमाणे अरबी समुद्राच्या पृष्ठाचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा कमी असल्यामुळेही तिथे तुलनेने कमी वादळे निर्माण होतात.
भारतीय उपखंडात १९७० पासून १३ विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक होता. १९७० मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये १५ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
‘लँडफॉल’ आणि प्रलय
पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते दोन हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी दोनशे किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळांचा लँडफॉल म्हणतात. चक्रीवादळाला समुद्रा कडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. एवढी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते. चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात. दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त (पुण्यातील हंगामातील सरासरीइतका) पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते. चक्रीवादळ तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत देते. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे लँडफॉलदरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेकडो हेक्टरची जमीन काही काळ नापीक होते. वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्याचे, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे असते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.
आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे तीन ते चार दिवस आधीच चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाज देण्यात येत असल्यामुळे किनारपट्टीच्या भागात प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळतो. सध्याच्या अंदाजांमुळेही देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना झाल्या. आज हे घडू शकले याला कारण भारताकडे असणारे कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणारी मॉडेल. या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात आले. यांमुळे या आधीच्या चक्रीवादळांच्या तुलनेत नुकसान कमी करणे भारताला शक्य होत आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचे स्वरूप——————- वाऱ्यांचा ताशी वेग
कमी दाबाचे क्षेत्र———————– ——– ३२ किलोमीटरपेक्षा कमी
डिप्रेशन —————————— ———- ३२-५०
डीप डिप्रेशन —————————— —– ५१- ५९
सायक्लोन —————————— ——- ६०- ९०
सिव्हिअर सायक्लोन———————- —- ९०- ११९
व्हेरी सिव्हिअर सायक्लोन—— ————– ११९-२२०
सुपर सायक्लोन———————- ——— २२० पेक्षा अधिक
भारतात ‘सुपर सायक्लोन’ दुर्मिळच
भारतीय उपखंडातील समुद्रांची रचना पाहता कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन त्यांच्या जमिनीवरील प्रवेशाचा कालावधी तुलनेने कमी असतो त्यामुळे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात ‘सायक्लोन’ पातळी पर्यंतची कमी दाबाची क्षेत्रेच निर्माण होतात. मात्र क्वचित प्रसंगी कमी दाबाची क्षेत्रे अधिक काळ समुद्रावर राहिल्यास सिव्हिअर सायक्लोन किंवा व्हेरी सिव्हिअर सायक्लोन पातळीही गाठली जाते. या आधी १९७१ आणि १९९९ मध्ये सुपरसायक्लोन भारतीय किनारपट्टीला धडकले होते. सुपर सायक्लोनमुळे होणारी हानी चक्रीवादळापेक्षा कित्येक पटींनी अधिक असते.
चक्रीवादळांचे नामकरण
जगभरात निर्माण होणाऱ्या सर्व चक्रीवादळांना एक विशेष नाम दिले जाते. नुकत्याच होऊन गेलेल्या चक्रीवादळाचे नाव ओखी होते, ज्याचा बंगाली भाषेत अर्थ डोळा असा होतो. हे नाव बांगलादेशाने सुचवले होते. चक्रीवादळांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्याच्याशी संबंधित बातम्या आणि सूचना तळागाळापर्यंत पोचाव्यात, एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाल्यास नेमके चक्रीवादळ ओळखता यावे यासाठी चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात झाली. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्याची प्रथा २००४ पासून सुरु आहे. हिंदी महासागराच्या लगत असणाऱ्या बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड या आठ देशांकडून आगामी चक्रीवादळांसाठी आठ नावे मागवली जातात. संबंधित देशांच्या भाषेत असणाऱ्या या नावांमधून निसर्गातील विविध घटक किंवा संस्कृतीची झलक दिसत असते. चक्रीवादळांना दिलेले नाव छोटे असावे, उच्चार सोपा असावा आणि ते सहजतेने लोकांमध्ये प्रचलित होणारे असावे अशी अपेक्षा असते. एकापाठोपाठ निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना बांगलादेशपासून थायलंडपर्यंत आठ देशांनी सुचवलेली नावे ओळीने देण्यात येतात. पहिल्या आठ नावांचा संच संपला कि पुढील आठ नावांचा संच वापरण्यात येतो. अशा रीतीने लुबान या ओमानने दिलेल्या नावानंतर पाकिस्तानचे तितली हे नाव त्यापाठोपाठ आलेल्या चक्रीवादळाला दिले गेले. यानंतर श्रीलंकेने सुचवलेले ‘गिगम’ आणि थायलंडने सुचवलेले ‘पायती’ हे नाव पुढील चक्रीवादळाला देण्यात येईल. सध्याची यादी या दोन नावांनंतर संपत असून, पुढील संभावित नावांची यादी लवकरच जारी करण्यात येईल.
————–
Please follow and like us: