ग्रहणावस्था टाळण्यासाठी यानाची कक्षा बदलण्यात इस्रोला यश
संशोधन प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७
———-
भारताच्या मार्स ऑर्बायटर मिशनला (मॉम) आणखी कार्यकाळ देण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना यश आले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत मंगळयान रोज सुमारे आठ तास मंगळाच्या सावलीतून (ग्रहणावस्थेतून) प्रवास करणार होते. यामुळे यानाला सौरऊर्जा मिळण्यात अडथळा निर्माण होणार होता. यान मंगळाच्या सावलीच्या भागातून प्रवास करणार नाही अशा रीतीने त्याच्या कक्षेत नुकताच सुधार करण्यात आला. यानाकडे आणखी इंधन शिल्लक असल्यामुळे २०२० पर्यंत मंगळयान कार्यरत राहील असा विश्वास इस्रोच्या सूत्रांनी ‘संशोधन’शी बोलताना व्यक्त केला.
मंगळयान सध्या ज्या कक्षेतून मंगळाभोवती फिरत होते त्या कक्षेमध्ये असताना यानाला सप्टेंबर २०१७ पर्यंत रोज सुमारे आठ तास मंगळाच्या सावलीतून प्रवास करावा लागणार होता. या काळात बॅटरीला सौरऊर्जा मिळणे शक्य होणार नव्हते. मंगळयानावर बसवलेल्या बॅटरी या फक्त एक तास ४० मिनिटे इतका वेळ सौर ऊर्जेशिवाय टिकू शकतात अशाप्रकारे बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यानाची कक्षा बदलणे आवश्यक होते. १७ जानेवारी रोजी यानावर बसवलेले २२ न्यूटन क्षमतेचे आठही थ्रस्टर ४३१ सेकंदांसाठी प्रज्ज्वलित करण्यात आले. या प्रक्रियेतून यानाचा मंगळाभोवतीचा वेग ९७.५ मीटर प्रति सेकंदांनी बदलण्यात आला. या बदललेल्या वेगामुळे यानाला नवी कक्षा प्राप्त झाली, ज्या कक्षेमध्ये फिरताना यान आता मंगळाच्या सावलीच्या भागातून प्रवास करणार नाही.
कक्षा बदलण्याच्या प्रक्रियेत यानावरील २० किलो इंधन वापरण्यात आले. यानावर अद्याप १३ किलो इंधन शिल्लक आहे. यान मोठ्या काळासाठी मंगळाच्या सावलीतून प्रवास करण्याची घटना यापुढे २०२० मध्ये अपेक्षित असल्यामुळे तोपर्यंत तरी यानाला मोठ्या प्रमाणात इंधन वापरण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली. यानावरील सर्व उपकरणे आणि यंत्रणा सुरळीत काम करत असल्याचेही इस्रोने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आणखी किमान दोन वर्षे यानाचा कार्यकाळ वाढला असल्याचे मानले जात आहे. २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोचलेल्या मंगळयानाचा अपेक्षित कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा होता हे विशेष.
२०१९ मध्ये मंगळाभोवती दोन भारतीय याने?
एकीकडे मॉम-१ चा कार्यकाळ वाढला असतानाच दुसरीकडे इस्रोने दुसऱ्या मंगळमोहिमेची तयारी सुरु केली आहे. भारताची दुसरी मंगळ मोहीम पुढील दोन वर्षांत राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९ – २० मध्ये भारताची दोन याने मंगळाच्या कक्षेत एकाच वेळी कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (इसा) या दोनच संस्थांच्या एका पेक्षा अधिक मोहिमा एकाच वेळी मंगळावर कार्यरत आहेत.
—-
Please follow and like us: