संशोधन, २४ जानेवारी २०१८
दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी आणि त्या घटनेशी संबंधित प्रकाशाची नोंद घेण्याची घटना ताजी असतानाच याच न्यूट्रॉन ताऱ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या रेडिओ लहरीही पकडण्यात खगोलशास्त्रज्ञांना नुकतेच यश आले. या संबंधीचा रिसर्च पेपर गेल्या महिन्यात नेचर या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
पुणे आणि महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे या रिसर्च पेपरमधील प्रमुख संशोधक डॉ. कुणाल मुळे हा पुण्याचा आहे. कुणाल सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (कॅलटेक) कार्यरत असून, कॅलटेकमध्येच सध्या एका प्रोजेक्टसाठी गेलेल्या पुण्याच्या ध्रुव परांजपे याने कुणालशी मराठीतून थेट संवाद साधला.
पुण्यापासून ते कॅलटेक आणि गुरुत्वीय लहरींच्या घटनेशी संबंधित महत्वाच्या शोधापार्यंतचा कुणालचा प्रवास ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. खगोलशास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुणालने दिलेल्या ‘टिप्स’ही महत्वाच्या आहेत.
संबंधित संशोधनाविषयी..
१७ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) दोन वेधशाळांप्रमाणेच युरोपमधील व्हर्गो या वेधशाळेने गुरुत्वीय लहरींच्या साह्याने दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनाची घटना टिपली होती. या ताऱ्यांच्या धडकेतून निर्माण झालेला गॅमा किरणांचा प्रकाश गुरुत्वीय लहरींच्या नोंदीनंतर फक्त दोन सेकंदांनंतर खगोलशास्त्रज्ञांना दिसला होता. याच घटनेनंतर १६ दिवसांनी पुण्याजवळील जीएमआरटीसह न्यू मेक्सिको येथील कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज अॅरे आणि ऑस्ट्रेलिया टेलिस्कोप कॉम्पॅक्ट अॅरे या वेधशाळांनी संबंधित घटनेच्या रेडिओ लहरीही टिपल्या. या रेडिओ लहरींची तीव्रता पुढील सुमारे शंभर दिवसांच्या कालावधीत वाढत गेल्याची नोंद या वेधशाळांनी घेतली. या नोंदींचा अभ्यास केल्यावर न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनानंतर घडलेल्या घटनेचा नेमका उलगडा शास्त्रज्ञांना झाला आहे.
याबाबत कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) प्रा. ग्रेग हिलियन म्हणाले, ‘न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊर्जेतून गॅमा किरणांचे झोत तयार होतात. १७ ऑगस्टच्या घटनेतून काही सेकंद दिसलेले गॅमा किरणांचे झोत हे अपेक्षेपेक्षा दहा हजार पटींनी कमी तीव्रतेचे होते. त्या झोतांचा कोन पृथ्वीच्या दिशेने नसल्यामुळे ही तीव्रता कमी असेल असे सुरुवातीला मानले गेले. मात्र, पुढील काळात मिळालेल्या तीव्र रेडिओ लहरींच्या माध्यमातून नवे तथ्य समोर आले आहे. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या धडकेतून वायूंचा एक कोष निर्माण झाला आणि त्या कोषामुळे गॅमा किरणांच्या झोताची तीव्रता कमी नोंदली गेली. मात्र त्या कोषाला गॅमा किरणांपासून ऊर्जा मिळाली तीच पुढे रेडिओ लहरींच्या माध्यमातून नोंदली गेली.’
‘या संशोधनामुळे दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून पुढे घडू शकणाऱ्या घटनांची माहिती प्रथमच समोर आली आहे. गुरुत्वीय लहरींच्या घटनेशी संबंधित रेडिओ लहरी प्रथमच नोंदल्या गेल्या असून त्यामध्ये जीएमआरटीचा थेट सहभाग असल्याचा अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्समधील ( एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञ डॉ. पूनम चंद्रा यांनी दिली.
Please follow and like us: