संशोधन, २३ नोव्हेंबर २०२३
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, २६ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये वर्षातील सहावे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. याच दिवशी मध्य महाराष्ट्रात इतरत्र आणि कोकणातही पावसाचे प्रमाण जास्त असेल.
ढगाळ हवामान आणि पावसामुळे या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे झाल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचे आगमन होईल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
आयएमडीचा जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (२४ ते २७ नोव्हेंबर)
२४ नोव्हेंबर: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर
२५ नोव्हेंबर: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छ. संभाजीनगर
२६ नोव्हेंबर: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छ. संभाजीनगर
सहावे चक्रीवादळ?
उत्तर हिंदी महासागरातील चालू वर्षातील सहावे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधी या वर्षी मोखा (९-१५ मे), बिपरजॉय (६ ते १९ जून), तेज (२०-२४ ऑक्टोबर), हामून (२१-२५ ऑक्टोबर) आणि मिधीली (१४-१८ नोव्हेंबर) ही चक्रीवादळे निर्माण झाली होती. अंदाजानुसार येत्या काही दिवसांत चक्रीवादळ निर्माण झाले, तर त्याचे नाव मिचौंग असेल.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अंदमानच्या समुद्रात २६ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, २७ तारखेला त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे क्षेत्र वायव्येकडे सरकून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
———–