– टीम संशोधन
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) लघु उपग्रह प्रक्षेपकाचे (एसएसएलव्ही) तिसरे प्रायोगिक उड्डाण नुकतेच यशस्वी झाले. नियमित वापराआधी कोणत्याही रॉकेटच्या तीन चाचण्या पूर्ण व्हायला हव्यात, असा इस्रोचा नियम असल्याने एसएसएलव्ही आता अधिकृतपणे इस्रोच्या ताफ्यात दाखल झाले आहे असे म्हणता येईल. ५०० किलो वजनापर्यंतच्या छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हे रॉकेट नव्याने विकसित करण्यात आले आहे. डिजिटल युगात अवकाश तंत्रज्ञानही बदलत असताना लहान आकाराच्या आणि हलक्या उपग्रहांची बाजारपेठ वाढत आहे. अशा स्थितीत एसएसएलव्हीच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या मदतीने समर्थ पर्याय देण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
भारताला नव्या रॉकेटची गरज का भासली?
इस्रोने १९८० पासून सॅटेलाईट लाँच वेहिकल (एसएलव्ही ३), ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच वेहिकल (एएसएलव्ही), ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही), भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही) आणि नव्या श्रेणीतील भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही मार्क ३) किंवा लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या पाच रॉकेटची निर्मिती केली. यांपैकी एसएलव्ही ३ आणि एएसएलव्ही या रॉकेटचे कार्य थांबवण्यात आले. उपग्रहाची अपेक्षित कक्षा आणि उपग्रहाचे वजन या दोन बाबींना गृहीत धरून मोहिमेसाठी ठराविक रॉकेटची निवड करण्यात येते. कमी वजनाच्या उपग्रहांना, कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने एसएसएलव्ही या सहाव्या रॉकेटची निर्मिती केली आहे. या आधी पीएसएलव्ही किंवा जीएसएलव्हीच्या मोहिमांमधून अवकाशात जाणाऱ्या मोठ्या उपग्रहांसोबत उर्वरित जागेमधून लहान उपग्रह सोडले जात असत. मात्र, मोठ्या मोहिमांची वाट न पाहता लहान उपग्रहांसाठी असलेली व्यावसायिक मागणी लक्षात घेऊन स्वतंत्रपणे लहान उपग्रह मोठ्या संख्येने प्रक्षेपित करण्याचा पर्याय एसएसएलव्हीमुळे उपलब्ध झाला आहे.
एसएसएलव्ही रॉकेट कसे आहे?
इस्रोच्या तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्र आणि लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर या दोन केंद्रांच्या पुढाकाराने हे नवे रॉकेट विकसित करण्यात आले आहे. रॉकेटचे तीनही टप्पे हे घन इंधनाचे असून, अपेक्षित कक्षेत पोचल्यावर उपग्रहांना नेमकी गती देणाऱ्या व्हेलॉसिटी ट्रीमिंग मॉड्युल (व्हीटीएम) या यंत्रणेत द्रव इंधनाचा वापर करण्यात आला आहे. एसएसएलव्ही ३४ मीटर उंच आणि दोन मीटर व्यासाचे असून, रॉकेटचे वजन १२० टन आहे. १० ते ५०० किलो वजनाच्या उपग्रहांना जमिनीपासून ५०० किमी उंचीवरील कक्षेत पाठवण्याची या रॉकेटची क्षमता आहे. सोप्या रचनेमुळे मोजक्या अभियंत्यांच्या सहभागातून एका आठवड्याच्या कालावधीत या रॉकेटची जोडणी शक्य आहे. एसएसएलव्ही रॉकेटच्या उभारणीत उद्योगांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अवकाश विभागाची व्यावसायिक शाखा असणाऱ्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडकडे (एन्सिल) एसएसएलव्हीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
रॉकेटची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली?
इस्रोतर्फे सन २०१५ मध्ये सर्वप्रथम लघु उपग्रह प्रक्षेपकाची संकल्पना मांडण्यात आली. २०१८ मध्ये विक्रम साराभाई अवकाश केंद्राने एसएसएलव्हीचा आराखडा प्रसिद्ध केला. २०२० ते २२ या काळात रॉकेटच्या विविध भागांची निर्मिती होऊन त्यांच्या जमिनीवरील चाचण्या पार पडल्या. सात ऑगस्ट २०२२ ला एसएसएलव्ही डी १ हे रॉकेटचे पहिले विकसनशील उड्डाण पार पडले. या मोहिमेत ईओएस ०२ आणि आझादीसॅट या उपग्रहांचा समावेश होता. मात्र, अखेरच्या टप्प्यातील व्हीटीएम यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे एसएसएलव्हीचे पहिले उड्डाण अयशस्वी ठरले. फेब्रुवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या दुसऱ्या उड्डाणातून एसएसएलव्हीने यू आर राव स्पेस सेंटरने विकसित केलेला ईओएस ०७ हा १५६.३ किलो वजनाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह, अँटॅरीस सॉफ्टवेअरवर आधारित नव्या तंत्रज्ञानाची चाचणी करणारा दहा किलो वजनाचा जानस १ हा अमेरिकी उपग्रह आणि स्पेस किड्झ इंडियाच्या पुढाकाराने देशभरातील ७५० विद्यार्थिनींनी बनवलेल्या आझादीसॅट २ या ८.७ किलो वजनाच्या उपग्रहाला यशस्वीपणे अवकाशात सोडले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या प्रक्षेपणाचे वैशिष्ट्य काय?
एसएसएलव्हीची तिसरी आणि अंतिम चाचणी १६ ऑगस्टला यशस्वी झाली. एसएसएलव्हीच्या साह्याने अर्थ ऑबझर्वेशन सॅटेलाईटला (ईओएस ०८) अपेक्षित कक्षेत सोडण्यात इस्रोला यश आले. एसएसएलव्ही आता इस्रोच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल झाले असून, उत्पादनासाठी या रॉकेटचे तंत्रज्ञान खासगी उद्योगांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. एसएसएलव्हीची वजन वाहून नेण्याची क्षमता आणि आकार गृहीत धरून ईओएस ०८ या मायक्रोसॅटची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. १७५.५ किलो वजनाच्या या लघु उपग्रहावर अहमदाबादच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरने बनवलेल्या ईओआयआर आणि जीएनएसएस- आर या उपकरणांचा समावेश आहे. या उपग्रहाच्या निर्मितीत बॅटरी, अँटेना, सोलार पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्व यंत्रणा हलक्या आणि लहान करण्यात आल्या असून, त्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आगामी गगनयान मोहिमेमध्ये गगनयात्रींवर होणाऱ्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा परिणाम अभ्यासण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूव्ही डोसीमीटर या उपकरणाचाही ईओएस ०८ मध्ये समावेश आहे.
एसएसएलव्हीचा पुढील प्रवास कसा असेल?
एसएसएलव्हीचे संपूर्ण तंत्रज्ञान लवकरच खासगी कंपनीला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या या रॉकेटच्या निर्मितीपासून ते प्रक्षेपणापर्यंतची सर्व प्रक्रिया येत्या काळात खासगी कंपनी पार पाडणार असून, कंपनीची निवड लवकरच केली जाणार आहे. एसएसएलव्हीच्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासंबंधीची जाहिरात गेल्या वर्षी ११ जुलैला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातील २३ कंपन्यांचे अर्ज इनस्पेस या सरकारी संस्थेकडे आले. कंपनीची उत्पादन करण्याची क्षमता, तसेच इस्रोचे नियम व अटी मान्य असलेल्या एका कंपनीला व्यावसायिक तत्त्वावर एसएलएलव्हीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात येईल. खासगी कंपनीला रॉकेटचा संपूर्ण आराखडा आणि तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण असेल. केरळमधील थुंबा आणि आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटानंतर आता भारताच्या तिसऱ्या रॉकेट प्रक्षेपण केंद्राची तामिळनाडूमधील कुलशेखरपट्टणम येथे उभारणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण केंद्र खास एसएसएलव्हीच्या उड्डाणांसाठी उभारण्यात येत आहे.
————–