भारतातील शास्त्रज्ञांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. विविध विज्ञान विषयांमध्ये मूलभूत (fundamental) किंवा उपयोजित (applied) संशोधन करणाऱ्या ४५ पेक्षा कमी वर्षे वय असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जनक मानल्या जाणाऱ्या डॉ. शांतीस्वरूप भटनागर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या (सीएसआयआर) स्थापनादिनी, म्हणजेच २६ सप्टेंबरला जाहीर करण्यात येतो. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इंजिनिअरिंग, गणित, औषधे आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या आठ ते दहा भारतीय शास्त्रज्ञांची या पुरस्कारासाठी दरवर्षी निवड केली जाते. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार मिळालेल्या शास्त्रज्ञाला वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत दरमहा १५,००० रुपये दिले जातात. पंतप्रधानांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
यावर्षी भटनागर पुरस्कारासाठी दहा शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली असून, पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्समधील (एनसीआरए) डॉ. निस्सीम काणेकर यांचा त्यांत समावेश आहे. यंदाचे भटनागर पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ खालीलप्रमाणे (विभागांनुसार)-

जीवशास्त्र – डॉ. दीपक थांकप्पन नायर (रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, फरिदाबाद), डॉ. संजीव दास (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, दिल्ली)
रसायनशास्त्र – डॉ. जी नरेश पटवारी (आयआयटी, मुंबई)
पृथ्वीविज्ञान– डॉ. एस. सुरेश बाबू (विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम)
इंजिनिअरिंग – डॉ अलोक पॉल (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू), डॉ. निलेश मेहता (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू), डॉ. अविनाश कुमार अग्रवाल (आयआयटी, कानपूर)
मेडिसिन – डॉ. अमित दत्त (टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई), डॉ. दीपक गौर (जेएनयू, दिल्ली)
भौतिकशास्त्र – डॉ. निस्सीम काणेकर (एनसीआरए, पुणे), डॉ. विनय गुप्ता (नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, दिल्ली), डॉ. सुधीर कुमार वेम्पाटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू)
गणित या विषयासाठी यंदा कोणत्याही शास्त्रज्ञाची निवड करण्यात आली नाही.
डॉ. शांतीस्वरूप भटनागर (२१ फेब्रुवारी १८९४ – १ जानेवारी १९५५)

– संशोधन, ३० सप्टेंबर २०१७
————————————-
Please follow and like us: