अफवांवर विश्वास ठेवू नका.
– मयुरेश प्रभुणे, २१ जून २०२१
—————-
जूनमध्ये मॉन्सूनची केरळपासून उत्तर दिशेने प्रगती होत असताना दरवर्षी महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो असे नाही. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यावर नंतर दडी मारल्याच्या घटना अनेकदा होतात. त्यात नवीन असे काही नाही.
केरळनंतर मॉन्सूनची उत्तरेकडील प्रगती ही प्रामुख्याने तीन गोष्टी गृहीत धरून भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) जाहीर केली जाते (संदर्भ: आयएमडी)-
१) उपविभागांच्या (sub division) विविध जिल्ह्यांत झालेला पाऊस आणि या पावसाचे क्षेत्र टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत आहे का ते पाहिले जाते. (महाराष्ट्रात चार उपविभाग आहेत- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. पावसाचे वितरण असमान असल्यामुळे मॉन्सूनचे आगमन जाहीर होऊनही या चार उपविभागांमधील काही जिल्ह्यांमध्ये/ तालुक्यांमध्ये मोठ्या पावसाने हजेरी लावली नाही असे होऊ शकते) यंदा जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात अशा पावसाची राज्यभर नोंद झाली.
२) पश्चिम किनारपट्टीवर ढगांची सर्वाधिक गर्दी कोणत्या क्षेत्रावर आहे ते उपग्रहीय चित्रांवरून तपासले जाते. महाराष्ट्रात मॉन्सून आगमन जाहीर झाले असताना कोकण किनारपट्टीजवळ ढगांचे असे क्षेत्र दिसून तर आलेच, पण किनारपट्टीवर काही ठिकाणी मोठा पाऊसही नोंदला गेला.
३) नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत वातावरणात आलेले बाष्प (water vapour) कोणत्या प्रदेशापर्यंत पोचले आहे हे उपग्रहीय चित्रांवरून तपासले जाते.
हे सर्व निकष लक्षात घेतले तर देशाच्या बहुतांश भागांत मॉन्सून पोचला आहे हे लक्षात येते. मॉन्सूनचे आगमन जाहीर झाले म्हणजे त्या दिवसापासून सलग पावसाला सुरुवात व्हायला हवी असे नाही. ती फक्त मॉन्सून आगमनाची घटना असते. कमी दाबाची क्षेत्रे तयार व्हायला लागली की पुढे जुलै- ऑगस्टमध्ये मॉन्सून सक्रिय होतो. स्थानिक हवामान अनुकूल असेल तर जूनमध्येही काही दिवस पाऊस टिकूनही राहतो. जसे यंदा राज्याच्या काही भागांत बघायला मिळाले.
त्याच प्रमाणे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ) आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे देशाच्या बहुतांश भागांत मॉन्सून आल्याचे सर्वात मोठे निर्देशक (इंडिकेटर) आहेत. मॉन्सून काळात मोठ्या पावसाचे महिने जुलै आणि ऑगस्ट असतात. तेव्हाच सर्वदूर मोठा पाऊस होत असतो. याचा अर्थ फक्त जुलै आणि ऑगस्टमध्येच मॉन्सून असतो असे नाही. मॉन्सूनची प्रगती हा संक्रमण काळ असतो. त्यामुळे जूनच्या पावसात कायमच चढ – उतार बघायला मिळतात. ते मॉन्सूनचे वैशिष्ट्यच आहे.
‘मॉन्सूनचे आगमन झाले नसून, सध्या राज्यात सुरु असलेला पाऊस हा पूर्वमोसमी आहे,’ अशी एका हवामान अभ्यासकाच्या दाखल्याने प्रसिद्ध झालेली जुनी बातमी आज बरीच शेअर होत आहे. बातमी जुनी असली तरी ते चित्र सध्याचेच आहे, असा अनेकांचा समज होऊ शकतो. त्यामुळे सध्याचा पाऊस हा मॉन्सूनचा कसा आहे हे सर्वांना समजायला हवे. तसेच मॉन्सूनविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीवरच सर्वांनी विश्वास ठेवावा. अफवांपासून आणि अशास्त्रीय माहितीपासून सावध राहायला हवे.
——