संशोधन, ३१ मे २०१९
जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
तंबाखू वनस्पती
तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांन पासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे. निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो.
तंबाखूचा इतिहास
अमेरिकेमध्ये इसवीसनपूर्व ६००० मध्ये तंबाखूची शेती केल्याचे सर्वात जुने पुरावे सापडतात. तेथील आदिवासींनी धार्मिक आणि औषधी कारणासाठी तंबाखूचा वापर केला होता. १४९२ मध्ये क्रिस्तोफर कोलंबसला अमेरिकेतील स्थानिक आदिवासींनी भेट म्हणून तंबाखूची पानं दिली. कोलंबसमार्फत तंबाखूची युरोपला ओळख झाली. १५५६ मध्ये फ्रान्स, १५५८ मध्ये पोर्तुगाल, १५५९ मध्ये स्पेन आणि १५६५ मध्ये इंग्लंड या देशांमध्ये तंबाखूचे पीक दाखल झाले. पुढे १६५० मध्ये युरोपीय व्यापाऱ्यांनी तंबाखू आफ्रिकेतही नेली आणि तिथे या मोठे उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड सुरु झाली. १७५३ मध्ये स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ कॅरोलस लिनिअस यांनी नामांकित केलेल्या तंबाखूच्या प्रजाती – निकोटीयाना रस्टिका आणि निकोटीयाना टॅबॅकम यांना पहिल्यांदाच नाव देण्यात आले. १७९४ मधेय अमेरिकेत पहिल्यांदा तंबाखूवर कर लावण्यात आला. १८२६ मध्ये शास्त्रज्ञांना तंबाखूपासून निकोटीन वेगळे करण्यात प्रथमच यश आले. १९१२ मध्ये प्रथमच धूम्रपान आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संबंध जोडला गेला. १९९० च्या दशकात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंधने आली. भारतात तंबाखूचे पीक इसवीसन १६००च्या सुमारास पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणले. भारतात त्या आधीही तंबाखूच्या काही स्थानिक जाती होत्या. परकीय व्यापाऱ्यांसाठी भारत हे तंबाखूचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले. ब्रिटीश राजवटीत तंबाखू हे एक प्रमुख नगदी पीक होते.
तंबाखूचे प्राचीन पुरावे
भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे ‘तमाखू’ असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचेही दाखले मिळतात. काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतुन भारतात स्थलांतरीत झाली. भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून, सर्वप्रथम त्याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे, प्राचीन काळी तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी केला गेला. तसेच, पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे. पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन माया संस्कृतीच्या उत्खननात निकोटीनचे काही अंश सापडले. माया संस्कृतीतील ते अवशेष साधारण हजार वर्षे जुने आहेत. प्राचीन काळातील तंबाखूच्या वापराचा हा पहिला प्रत्यक्ष पुरावा मानला जातो. २०१८ मध्ये उत्तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांना ३५०० वर्षे जुन्या चुनखडीच्या (लाईमस्टोन) चिलीममध्ये निकोटिनचे अंश सापडले. आईस एज (हिमयुग) साईटच्या उत्खननदरम्यानही उत्तर अमेरिकेत सर्वात जुन्या तंबाखूचा पुरावा सापडला. हा पुरावा तंबाखूच्या बियांचा आहे. या बिया सुमारे १२००० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत.
तंबाखूचे उत्पादन करणारे देश
तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक येतो. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.
तंबाखूमुळे होणारे रोग
निकोटीनमुळे तंबाखूचे सेवन करण्याची सवय लागते. तंबाखूच्या सेवनाने घसा, फुफ्फुस, तसेच मुखाचा कॅन्सर होतो. सिगारेट हे प्रमुख तंबाखूजन्य माध्यम असून, जगभरात साधारण १.१ अब्ज लोक सिगारेट ओढतात असे डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते. त्यांपैकी ८० टक्के लोक हे कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत. दरवर्षी जगभरात साधारण ८० लाख लोकांचा तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्यू होतो. त्यांपैकी ८ लाख ९० हजार जणांचा मृत्यू धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) होतो.
तंबाखूचा समावेश असणाऱ्या उत्पादनांमध्ये निकोटिन, कार्बन मोनॉक्साईड आणि टार यांसह सुमारे ५००० विषारी पदार्थ असतात. आरोग्यासाठी अपायकारक असणाऱ्या या घटकांमुळेच तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो.
—–
Please follow and like us: